छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र (लेख)

छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र
       महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला अस्मिता व अभिमान मिळवून देणारे छ. शिवराय हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. शून्यातून विश्व निर्माण करण्याचा पराक्रम त्यांनी केला. एका पराक्रमी जहागीरदाराच्या मुलगा म्हणून सुरुवात केली आणि स्वतःचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हे करताना राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या प्रेरणेचा आणि राजे शहाजी महाराजांच्या संकल्पाचा त्यांना उपयोग झाला. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची ठरली त्यांची विचारसरणी त्यांचे दृष्टिकोन. अठरापगड जातीचे गोळा केलेले मावळे, त्यांच्यामध्ये भरलेला आत्मविश्वास, या बळावरच शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.   
          शिवराज्याचे वैशिष्ट्य असे की ते आधुनिक कालखंडातील लोकशाही व्यवस्थेत महत्त्वाचे वाटत आहे. शिवाजी महाराजांनी घेतलेले निर्णय स्वराज्यासाठी घालून दिलेले नियम आणि त्यांची राजनीती आजही आपणास मार्गदर्शक ठरावी अशीच आहे. या राजनीतिच्या आधारे पुढे मराठ्यांनी राज्य केले. आपले स्वराज्य अटकेपार पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत मराठी शिवसूत्रात बांधले होते, तोपर्यंत ते यशस्वी होत गेले. शिवरायांनी घालून दिलेली चौकट मोडल्यामुळे नंतर स्वराज्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले.
       छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती आपणाला त्यांनी काढलेले फर्मान, केलेले कायदे, त्यांचा पत्रव्यवहार यामधून पहावयास मिळते. परंतु त्याहीपेक्षा एक महत्त्वाचे साधन आपणासाठी उपलब्ध आहे, ते म्हणजे रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेले 'अाज्ञापत्र' होय. हे आज्ञापत्र राजाराम महाराजांचे सुपुत्र संभाजी (दुसरे) यांच्या आज्ञेने लिहिण्यात आले आहे. ते इसवी सन१७१५ मध्ये लिहिण्यात आले आहे. अाज्ञापत्रा विषयी डॉ. विलास खोले म्हणतात, "आज्ञापत्र हा कोणत्याही प्राचीन राज्यशास्त्रपर ग्रंथाचा अनुवाद असण्याऐवजी तत्कालीन राजनीतीचा प्रतिध्वनी आहे. स्वराज्याच्या उभारणीच्या प्रसंगी शिवछत्रपतींनी जी धोरणे अवलंबिली, जे मार्ग अनुसरले, जी तंत्रे विकसित केली त्या सा-यांचे प्रतिबिंब आज्ञापत्रात पडले आहे. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, हा ग्रंथ शिवाजीराजांची कर्तबगारी, गुणवत्ता, योग्यता व महत्ता इत्यादी दृष्टीसमोर ठेवून लिहिलेला ग्रंथ आहे."
       आज्ञापत्र म्हणजे शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श वस्तुपाठ! कसा विचार करावा, कसे निर्णय घ्यावेत, कशी माणसे पारखावीत याचे उत्तम उदाहरण, मार्गदर्शन आपणास आज्ञापत्रातून घडते. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ सूत्रबद्ध शैलीत लिहिलेला आहे. एकेक वाक्य काळजावर कोरून ठेवावे असे आहे. सर्व काळात, सर्वत्र आदर्श ठरेल असा राजनीतीचा विचार या ग्रंथाच्या सगळ्या प्रकरणांमधून डोकावतो आहे. पहिली दोन प्रकरणे प्रास्ताविक स्वरूपाची आहेत. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतर घडलेला मराठ्यांचा इतिहास आहे. तिसरे प्रकरण राजकर्तव्ये सांगणारे आहे. राजा हाही मर्त्य माणूस आहे. त्याने आपल्यावर एक ऐतिहासिक जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, याचे भान बाळगून राजकारभार करावा, असे महाराजांचे मत होते. यासंदर्भात आलेली वेगवेगळी विधाने आपणास विचार प्रवृत्त करणारी आहेत. उदाहरणार्थ, 'सकल कार्यांमध्यें अपकीर्तीचे भय बहुत वागवावे."
       राजाने परंपरागत धर्माचे पालन करावे, असे आज्ञापत्र सांगते. असे करताना, "तपस्वी, शीघ्रकोपी यांचा सहवास न करितां दुरूनच त्यांचा परामृष करून ते संतोषरूप राहत, आशीर्वाद देत, ते करावे. अंध, पंगु, आतुर, अनाथ, अनुत्पन्न जे असतील त्यांचे ठाई भूतदया धरून  ते जिवंत असती जों, तों त्यांचा जीवनोपाय करून देऊन चालवीत जावे," असे म्हटले आहे. आज आपण सहिष्णू असण्याला महत्त्व देतो. मानवाधिकार याला महत्त्व देतो. त्याची बीजे आपणास येथे पहावयास मिळतात.
       राजाने वैयक्तिक जीवनात कसे असावे, ते सांगताना त्याविषयी आज्ञापत्र सांगते, "भोजन, उदकपान यांचा समय नेमून त्यास अन्यथा होऊं, न द्यावें. उन्मत्त द्रव्य सर्वथैव भक्षूं नये, जवळील लोकास भक्षूं देऊं नये, सर्वकाळ हत्यारविरहित खालीं हात राहूं नये." राजाने कलांचे रसिक असावे, परंतु दरबारात नाचगाणी करू नयेत. त्यात आसक्त राहू नये. विनोद प्रवृत्ती नसावी, असेही आज्ञापत्र सांगते. बुद्धिमान लोकांचा सल्ला राजाने घ्यावा, अशी शिवाजी महाराजांची अाज्ञा होती. आपणच शहाणे या अविर्भावात राहू नये. "कार्यभागी बुद्धिमंत असतील त्यास पुसावें. ज्याची जी अधिक युक्ती असेल ती घेऊन जेणेंकरून योजिलें कार्य सिद्धीस जाय तें करावें."
       'संपादिले पाठीशी घालून नित्य नूतन संपादावें,' असाही राजांचा आदेश आहे. सेवकांना वेळच्या वेळी व पुरेसे वेतन द्यावे म्हणजे ते फितूर होणार नाहीत. एखाद्याच्या चांगल्या कामाचा गौरव करावा, पण त्याला पगारवाढ न देता बक्षीस द्यावे, म्हणजे खजिन्यावर बोजा पडणार नाही, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. चांगली विश्वासू पराक्रमी माणसे सहजासहजी मिळत नाहीत, म्हणून राजाने सतत माणसांची पारख करावी. गड किल्ल्यांवर व प्रदेशात फिरताना माणूस पारखावे. उत्तम मनुष्य पदरी ठेवावा. त्याचा वकूब बघून काम द्यावे. कामचुकारपणा आढळल्यास प्रथम समजूत काढावी. मग समज द्यावी किंवा त्याची नेमणूक अन्यत्र करावी. शिक्षायोग्य वर्तणूक असेल तर शिक्षा द्यावी. असा बारकाव्यांचा विचार येथे करण्यात आला आहे. राजाने गरजेपुरते बोलावे. कमी बोलावे. संतापी असू नये. सहिष्णू असावे. हाताखालील लोकांमध्ये दोष असतातच. त्यांच्या गुणांवर लक्ष देऊन त्यांच्याकडून काम करवून घ्यावे, असे सांगण्यात आले आहे.
       अाज्ञापत्राने प्रधानाला फार महत्त्व दिले आहे. प्रधान हा जणू काही दुसरा राजाच असतो. तो राजाचा उजवा हात असतो. "प्रधान म्हणजे नृपसत्ताप्रसारक. प्रजापालनधर्मसंरक्षणाचे अध्यक्ष, राजमदजनित अन्यायसागराची मर्यादा. प्रधान म्हणजे हस्तीचे अंकुश," असे सांगण्यात आले आहे. आणि म्हणूनच अत्यंत चांगली पारख करून, अनुभवी, गुणवंत, विश्वासू माणसाचीच प्रधान पदी नेमणूक करावी, असे म्हटले आहे.
        शिवाजी महाराज अष्टप्रधानमंडळातील मंत्र्यांना फार समजूतदारपणे वागवत असत. प्रसंगी त्यांच्या  दोषांकडे दुर्लक्ष करत व त्यांच्या गुणांचा वापर स्वराज्यासाठी व्हावा यासाठी प्रयत्न करीत. त्यामागील भूमिका आपणास अाज्ञापत्रात सापडते.
       शिवरायांनी व्यापाराला फार महत्त्व दिले होते. व्यापारी म्हणजेच साहुकार हे राज्याची व राजश्रीची शोभा आहेत. त्यांच्यामुळेच राज्य आबादान होते. दुर्मीळ वस्तू राज्यात येतात. राज्य श्रीमंत होते. संकट प्रसंगी त्यांच्याकडून कर्ज घेता येते. त्यामुळेच साहुकारांच्या संरक्षणामध्ये बहुत फायदा आहे, असे महाराजांचे मत होते. व्यापार उद्योगधंदे यांचे महत्त्व आज  जगभर मान्य झाले आहे. मात्र दूरदृष्टीच्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळातच व्यापाराचे महत्त्व जाणले होते, याचा प्रत्यय आपणास येथे येतो. शिवरायांनी वेगवेगळ्या व्यापाऱ्यांशी वेगवेगळ्या पद्धतीने वागण्याचा आदेश दिलेला दिसतो. इंग्रज डच, पोर्तुगीज अशा जलमार्गाने प्रवास करणाऱ्या व्यापा-यांविषयी राजे जागरूक होते. हे लोक फक्त व्यापारी नाहीत, त्यांना स्थळ लोभ आहे. व्यापार करता करता राज्य बळकावण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना समुद्रकिनारी व्यापाऱ्याला जागा देऊ नये, तर समुद्र किनाऱ्यापासून गाव दोन गाव अलीकडे जागा द्यावी. त्यामुळे त्यांची वखार मध्यवस्तीत येईल. त्यांच्याभोवती आपले राज्य असेल. स्वराज्यास धोका  उद्भवणार नाही, असा दूरदृष्टीचा विचार शिवाजी महाराजांनी केलेला दिसतो.
       आज्ञापत्रात वतन आणि वृत्ती याविषयी दोन स्वतंत्र प्रकरणे आहेत. शिवाजी महाराज परंपरेने चालत असलेले वतन व वृत्ती कायम ठेवत असत, परंतु नवीन वतने, वृत्ती न देण्याकडे त्यांचा कल होता. कारण त्यामुळे स्वराज्याच्या खजिन्यात तूट येते. शिवाजी महाराज रयत आणि प्रदेश यांच्या रक्षणासाठी लढत होते. या दोन्हीचे रक्षण कसे करावयाचे, याबाबत ते सतत विचार करीत. त्यामुळेच स्वराज्यात दुर्ग म्हणजे किल्ले यांना फार महत्त्व होते. "गडकोट म्हणजे राज्याचे मूळ. गडकोट म्हणजे खजिना. गडकोट म्हणजे सैन्याचे बल. गडकोट म्हणजे राजलक्ष्मी. गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळें, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार. किंबहुना गडकोट म्हणजे आपलें प्राण संरक्षण", असे राज्यांचे मत होते. त्यामुळे गडाचे संरक्षण डोळ्यात तेल घालून केले पाहिजे. फितुरी किंवा शत्रूच्या आक्रमणावेळी दाखवलेली नामर्दी, यामुळे किल्ला आणि त्या भोवतालचा प्रदेश शत्रूच्या ताब्यात जातो. म्हणून किल्ल्याचा बंदोबस्त यथायोग्य पद्धतीने करावा. किल्ल्यावरील माणसे मर्दाना, विश्वासू आणि कर्तबगारीची असावीत, असा राजांचा आदेश होता. किल्ल्यावरील अधिकारी सतत बदलावेत. किल्ल्याच्या जवळच्या प्रदेशातील  लोक किल्ल्यावर नेमू नयेत. शेजारी शेजारी असणाऱ्या किल्ल्यांवर भावाभावांची नेमणूक करू नये. फितुर लोकांना शासन करावे. किल्ल्याची पडझड बांधून घ्यावी,  अशा आज्ञा आहेत.
       "गडावर फणस, चिंचा, वड, पिंपळ आदिकरून थोर वृक्ष, लिंबे, नारिंगे आदिकरून लहान वृक्ष, तसेंच पुष्पवृक्ष वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जे झाड होत असेल तें गडावर लावावें, जतन करावे. समयीं तितकेही लांकडाचे तरी प्रयोजनास येतील, "अशी आज्ञा होती. गडावर पाण्याची उत्तम सोय असावी. उन्हाळ्यात आणि शत्रूचा वेढा पडल्यावर पुरेल इतके पाणी असावे, असा आदेशच राजांचा होता.
       छत्रपती शिवाजी महाराजांनी व पुढे संभाजी राजांनी आरमाराचे महत्त्व ओळखले. कारण आपला शत्रू समुद्रमार्गेही येऊ शकतो आणि स्वराज्यात लुटालूट करू शकतो, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे स्वतंत्र आरमार उभे करणे, त्यावर विश्वासू माणूस नेमणे, समुद्रात जाबता ठेवणे, समुद्री व्यापारी सांभाळणे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात आरमारातील तरांडे, गुराबा, गलबते समुद्रकिनारी आणावे लागतात. मात्र ते प्रतिवर्षी एकाच किनारपट्टीवर आणू नयेत. वेगवेगळ्या बंदरात मुक्कामाची सोय करावी. जेणेकरून रयतेस त्रास होणार नाही. इतकेच काय तर आरमार उभे करण्यास मजबूत व हलके लाकूड लागते. असे लाकूड किनारपट्टीत मिळू शकते. परंतु ही झाडे रयतेने आपल्या मुलाप्रमाणे जतन केलेली असतात. त्यामुळे त्यांचे मन वळवून योग्य मोबदला देऊन घ्यावीत, हे स्पष्ट करताना अाज्ञापत्रकार लिहितात, "स्वराज्यातील आंबे, फणस आदिकरून हेही लांकडे आरमाराच्या प्रयोजनाचीं, परंतु त्यास हात लावूं देऊं नये. काय म्हणोन कीं, हीं झाडें वर्षा दोन वर्षांनी होतात असे नाही. रयतांनी हीं झाडें लावून लेकरांसारखीं बहुत काळ जतन करून वाढवलीं. ती झाडें तोडल्यावर त्यांचें दुःखास पारावार काय? एकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल तें कार्य करणारासहित  स्वल्पकाळात बुडोन नाहींसेच होतें; किंबहुना धन्याचे पदरीं प्रजापीडण्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावें हानीही होते. याकरितां हे गोष्टी सर्वथैव होऊं न द्यावी."
       शिवराज्य म्हणजे खऱ्या अर्थाने प्रजाहितदक्ष कल्याणकारी राज्य होते, याचे स्पष्ट प्रतिबिंब आज्ञापत्रात  पडलेले आढळते. राजकारण धुरंधर आणि दूरदृष्टीचा राजाच अशा पद्धतीने नियम घालून देऊ शकतो. जगाला आदर्श वाटेल असे राज्य निर्माण करू शकतो. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने हे रयतेचे राज्य निर्माण केले. बहुजन प्रतिपालक राजा म्हणून त्यांचे धोरण आदर्श स्वरूपाचे होते. आजच्या काळातही आपण हे शिवराज्य प्रत्यक्षात उतरवलेले नाही, हे आपणास मान्य करावे लागेल.

                                 - डॉ. श्यामसुंदर मिरजकर

टिप्पण्या

  1. अतिशय महत्त्वाची माहिती आहे.आज्ञापत्रे ही शिवरायांच्या
    कार्याचे मर्म जाणून घेण्याचे महत्त्वाचे साधन आहे.त्या आज्ञापत्राचे केलेले विश्लेषण भारीय.

    उत्तर द्याहटवा
  2. महाराजांचे कार्य किती मौलिक होते हे जाणून घेण्यासाठी आज्ञापत्रे हे महत्वाचे साधन आहे. आपलं विवेचन सुंदर आहे. श्रीकांत देशमुखांनी ही त्याच्या कुळवाडी भूषण शिवराय या पुस्तकात याचे विवेचन केले आहे.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. श्रीकांत देशमुख यांचे वरील पुस्तक माझ्या वाचनात आलेले नाही. पाहावे लागेल. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर!

      हटवा
  3. हा विचार आजच्या राजकारणी लोकांनी अनुसरावा

    उत्तर द्याहटवा
  4. अत्यंत दुर्लक्षित परंतु महत्वाचा विषय आपण चिंतनास खुला केलात त्याबद्दल आपणास साधुवाद! 💐 यावरील अजून सखोल चिंतन पुस्तक रूपात येऊ दे. प्रतिक्षा राहील.

    उत्तर द्याहटवा
  5. शिवरायांच्या सत्ताकरणाचे मर्म व त्यांच्या राजनीतीचे तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी आज्ञापत्र चा तार्किक विश्लेषणात्मक अभ्यास करण्यासाठी आपण विषयाची सुरवात केली आहे. आजच्या वैश्विक शाश्वत विकासाची उद्दीष्ठे या संदर्भाने आज्ञापत्राचे महत्व याबाबतही विश्लेषण करता येईल.

    उत्तर द्याहटवा
  6. आजच्या राजकीय मंडळीनी या तत्वानुसार राजकारण केले तर बरीचशी अराजकता कमी होईल

    उत्तर द्याहटवा
  7. आज्ञापत्र ही शिवरायांनी घालून दिलेली अचारसंहिता होती, जी आजही मार्गदर्शक ठरते. आपण त्यावर टाकलेला प्रकाश गरजेचा होता.

    उत्तर द्याहटवा
  8. आजच्या लोकशाहीत पण ह्या काही तव्वांचा समावेश करायला हवा.

    उत्तर द्याहटवा
  9. Love action moments? The car crash games experience on Khelraja keeps you engaged with strong visuals, quick reactions, and nonstop fun.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप