संतसाहित्याचे अध्ययन आणि विविध अभ्यासपद्धती

संत साहित्याचे अध्ययन आणि विविध अभ्यास पद्धती

       मराठी साहित्याचा प्रारंभबिंदू हा संतसाहित्याचा आहे. साधारणतः अकराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत मराठीत मोठ्या प्रमाणात संतसाहित्य लिहिले गेले. महानुभाव, वारकरी व समर्थ या तीन संप्रदायात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली. या बरोबरच शैव, नाथ, जैन अशा परंपरेतूनही काही प्रमाणात साहित्य निर्मिती झाली. या सर्व प्रवाहातील सर्वात प्रभावी साहित्य परंपरा ही वारकरी आहे. ती प्राधान्याने पद्य साहित्याची आहे. त्या खालोखाल महानुभाव साहित्य प्रभावी आहे. ते गद्य-पद्य या दोन्ही स्वरूपात आहे.
       सुमारे सातशे वर्षे मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह हा संतसाहित्याने व्यापला होता. त्यानंतर पंडित कवी व शाहिरांची परंपरा सुरू झालेली दिसते. पुढे एकोणिसाव्या शतकात इंग्रजीच्या प्रभावातून मराठीत अर्वाचीन गद्य-पद्य साहित्याला प्रारंभ झाला, असे म्हणता येते. इंग्रजांनी शिक्षणाच्या माध्यमातून भारतीयांच्या मनामध्ये नवी मूल्यदृष्टी रुजविली. तसेच ख्रिश्चन धर्माचा पुरस्कार करताना हिंदू परंपरेतील दोष दाखविले गेले. वर्णव्यवस्था, जातिभेद, स्त्रियांची दु:स्थिती व अनिष्ट प्रथा परंपरेतून जन्मलेल्या अंधश्रद्धा यावर नेमके बोट ठेवत धर्मचिकित्सा सुरू झाली. त्यामुळे अव्वल इंग्रजी कालखंडात नवशिक्षित मराठी माणूस संतसाहित्याकडे 'लौकिक जीवनापासून दूर असलेले चमत्कारांनी भरलेले भरताड' या नजरेने पाहू लागला. परिणामी वि. का. राजवाडे प्रभृतींनी 'टाळकुट्यांचे साहित्य' अशा शब्दात संतसाहित्याची संभावना केली. पुढे रा.श्री.जोगांना संत तुकाराम अभिरुचीहीन वाटले, तर दुसऱ्या बाजूला दि. पु. चित्रे यांनी तुकारामांना विश्वकवी संबोधले. म्हणजेच समीक्षेचा लंबक मोठ्या आयामात हेलकावत राहिला. म्हणूनच र.बा.मंचरकर एके ठिकाणी म्हणतात, "संत साहित्याची समीक्षा संख्येने विपुल आहे. तिच्यात परिश्रम आणि व्यासंग यांचे दर्शन घडते. रसिकतेला ही समीक्षा पारखी आहे, असेही नाही. तरी संत साहित्याचे सर्वांगीण निदान यथार्थ आकलन त्यातून होत आहे, असे जाणवत नाही. या खुरटेपणाची कारणे नव्या युगमहिम्यात आणि आपल्या वाङमयीन संस्कृतीत आहेत."
       या पार्श्वभूमीवर आज संतसाहित्याचा अभ्यास करताना कोणता दृष्टिकोन स्वीकारावा, कोणती अभ्यास पद्धती योजावी, असा प्रश्न बहुतेकांना  पडलेला असतो. वास्तविक पाहता आज घडीला सदानंद मोरे, म.वा.धोंड, दि.पु. चित्रे, भालचंद्र नेमाडे, सतीश बडवे, आ. ह. साळुंखे, रा.चिं.ढेरे आणि तारा भवाळकर आदी अभ्यासकांनी संतसाहित्य अभ्यासाच्या काही दिशा आपणा समोर ठेवल्या आहेत. तरीही नव्याने संतसाहित्याचा अभ्यास करताना एक नेमका विचारव्यूह आपणासमोर असणे गरजेचे आहे.

अभ्यासक आणि त्यांचे हेतू
       संत साहित्याचा अभ्यास कोण करत आहे आणि का करत आहे, याचा आपणास प्रथम विचार करावा लागेल. सामान्यतः संत साहित्याचे वाचन त्या-त्या संप्रदायातील लोक मोठ्या प्रमाणात श्रद्धेय भावनेने करतात. त्यामध्ये चिकित्सेला थारा नसतो. तरीही काही अध्यात्मनिष्ठ, धर्मनिष्ठ अभ्यासकही पुढे येतात. ते एक प्रकारे स्वतःच्या पंथातील संतविचार अधिक स्पष्ट करण्यासाठी किंवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभ्यास व लेखन करताना दिसतात. शंकर अभ्यंकर, दीपक भागवत अशांचे लेखन या पद्धतीचे आहे. समाजशास्त्रज्ञ, नीतिशास्त्रज्ञ, दैवतशास्त्र व धर्मशास्त्राचे अभ्यासक, अर्थशास्त्रज्ञ, स्त्रीवादी अभ्यासक, तत्त्वज्ञ, पर्यावरणशास्त्रज्ञ असे अभ्यासकही संत साहित्याचे अध्ययन करताना दिसतात. परंतु त्यांचा अभ्यास हा त्यांच्या अभ्यासविषयातील गृहितकांच्या पुष्ट्यर्थ झालेला असतो. उदाहरणार्थ, 'लीळाचरित्राच्या आधारे तत्कालीन समाज जीवनाचा अभ्यास' किंवा 'लीळाचरित्रात ग्रंथित झालेली स्त्रीजीवन' यामध्ये साहित्य अभ्यास फारच कमी असतो आणि समाजशास्त्रीय आकलनावर भर दिलेला असतो.
       आपण जेव्हा वाङ्मयीन परिप्रेक्ष्यातून संतसाहित्याचा अभ्यास करू, तेव्हा आपणाला काही गोष्टी नीटपणे समजून घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे आपण संतांकडे कवी, साहित्यिक या दृष्टिकोनातून पाहतो व त्यांचे लेखन हे आपल्या दृष्टीने साहित्यकृती किंवा संहिता असते ('साहित्यकृती' या संज्ञेत लेखकाचा प्रत्यक्ष सहभाग, सहेतुक कृती, कलात्मकता यांना महत्त्व येते, तर 'संहिता' ही संज्ञा बाह्य दबाव घटकांपासून मुक्त असणारी 'शाब्द संघटना' या अर्थाने येते. [थोरात हरिश्चंद्र: 2005]) मात्र कवी असणे हा संतांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू असतो. त्यांनी आरंभलेल्या सांप्रदायिक कार्यातील हेतुपूर्वक केलेली कृती म्हणजे त्यांचे लेखन असते. विशेष म्हणजे संतकवी हा विशिष्ट संप्रदायाच्या तात्त्विक विचारविश्वाच्या जडणघडणीतील भागीदार असतो. म्हणजेच संप्रदाय, संतकवी व संतसाहित्य या परस्परावलंबी गोष्टी असतात. म्हणून आपण संतांकडे केवळ कवी म्हणून पाहू शकत नाही. त्यांच्या लेखनाकडे केवळ काव्य म्हणून पाहू शकत नाही. तर सांप्रदायिक संदर्भात संतकार्य, कवित्व व संतसाहित्य यांचा अभ्यास करावा लागतो.
       संतसाहित्याची निर्मिती प्राय: दोन कारणांनी होत असते. संप्रदायाचे आचार-विचार, संप्रदायाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करण्यासाठी प्रथम लेखन केले जाते. अशा लेखनातून संप्रदायाची जडणघडण होत राहते. विशेषतः प्रारंभ काळातील विशिष्ट संप्रदायातील महत्त्वाचे कवी साहित्यिक यांच्यावर ही जबाबदारी पडते. उदा. नामदेव, ज्ञानदेव, म्हाईंभट इत्यादी. तर संप्रदायाचे भरण पोषण करणे, संप्रदायाला दृढत्व देणे या कारणाने प्रभावळीतील इतर कवी व उत्तरकालीन कवी लेखन करतात. उदा. जनाबाई, नामदेव कुटुंबातील इतर कवी, परिसा भागवत, बहिणाबाई, महदंबा इत्यादी. याबाबतीत र.बा.मंचरकरांनी धर्म संप्रदायाचा मध्ययुगीन मराठी वाङ्मयावर पडलेला प्रभाव संशोधनपूर्वक मांडला आहे, तो आवर्जून अभ्यासला पाहिजे.

संतसाहित्य अभ्यासाचे विविध प्रकार
       संतसाहित्याचा अभ्यास विविध प्रकारांनी केला जातो. अभ्यास विषय म्हणून कोणता 'एकक' निवडणार यावर तो अवलंबून असतो. तो सामान्यतः चार पातळींवर असतो.
१. एका साहित्यकृतीचा अभ्यास: - संतसाहित्यात ओवी-अभंगापासून टीकात्मक दीर्घ भाष्यग्रंथापर्यंत अनेक प्रकारचे लेखन केलेले आढळते. म्हणजेच तुकोबांच्या गाथ्यातील प्रत्येक अभंग हा अभ्यास विषय होऊ शकेल असा सुटा एकक असतो किंवा एकनाथांचे 'भागवत' हा दीर्घ भाष्यग्रंथ देखील एक एकक म्हणून अभ्यासता येतो. अशा सुट्ट्या एककाचा साहित्यकृती म्हणून अभ्यास केला जातो, तेव्हा कवीचे व्यक्तिमत्त्व, निर्मिती प्रेरणा, सांप्रदायिक प्रभाव अशा सगळ्या अंतर्बाह्य प्रक्रियांच्या परिप्रेक्ष्यात साहित्यकृतीचे विश्लेषण, अर्थनिर्णयन, मूल्यमापन होत असते. तर अशा सुट्या एककाकडे केवळ एक शब्दसंहिता म्हणून पाहिले जाते, तेव्हा भाषिक संरचना, शैली, त्यातून निर्माण होणारी अर्थवलये व प्रक्षेपित विचारव्यूह यांच्यावरच लक्ष केंद्रित केले जाते. शब्दांची कलात्मक मांडणी, त्यातून होणारी नाद-लय व सौंदर्य निर्मिती याकडे लक्ष दिले जाते. हा दुसरा अभ्यास रूपवादी, संरचनावादी व चिन्हमीमांसेच्या पद्धतीने होत असतो.

२. एका लेखकाचा अभ्यास :- विशिष्ट संप्रदायातील, विशिष्ट काळातील एका लेखक-कवीचा समग्र अभ्यास या दृष्टिकोनातून हा अभ्यास होतो. असा अभ्यास करताना समाजशास्त्रीय, ऐतिहासिक, चरित्रात्मक, मानसशास्त्रीय अशा अभ्यास पद्धतींचा सुटा किंवा एकात्म अभ्यास केला जाऊ शकतो. म्हणजेच चोखामेळा या एका कवीचा अभ्यास करायचा असेल तर त्यांचा ऐतिहासिक कालखंड, तत्कालीन सामाजिक परिस्थिती, त्यांचे चरित्र यांचा अभ्यास करावा लागतो. चोखामेळांची होत गेलेली जडणघडण व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास उपलब्ध प्रमाणांच्या आधारे मांडावा लागतो. वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची संकल्पना लक्षात घेऊन चोखोबांची कवी म्हणून झालेली वाटचाल तपासावी लागते.

३. भक्ती संप्रदायाचा अभ्यास
       भक्ती संप्रदायाचा अभ्यास हा बृहद् प्रकल्प ठरणारा अभ्यास आहे. असा अभ्यास हा जितका साहित्याचा तितकाच तो साहित्य बाह्य घटकांचा अभ्यास असतो. उदाहरणार्थ, रामदासी संप्रदायाचा अभ्यास करावयाचा झाल्यास सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातील त्याची निर्मिती, संप्रदायाचे आराध्य दैवत, तीर्थस्थळे, प्रभावक्षेत्र, संप्रदायातील आचार्य या सगळ्यांचा सखोल विचार करावा लागेल. दुसऱ्या बाजूला रामदासस्वामी, दिनकरस्वामी, आत्माराम महाराज, गिरीधर, रामीरामदास, मेरुस्वामी, माधवस्वामी, हरिबुवा भोंडवे यांच्यापासून एकोणिसाव्या शतकातील हंसराजस्वामी यांच्या पर्यंतची कवी-ग्रंथकार यांची परंपरा तपासावी लागेल. त्या प्रत्येकाचे चरित्र व कार्य यांचा स्वतंत्र अभ्यास करावा लागेल. गुरु-शिष्य परंपराही तितकीच महत्त्वाची असते. मुख्य कवी आणि प्रभावळ, मुख्य ग्रंथ आणि त्याचे प्रतिध्वनी असणारे पूरक भाष्यग्रंथ असा हा अभ्यास असतो. त्याचबरोबर या परंपरेतील महत्त्वाच्या साहित्यकृतींचा तत्त्वज्ञान व शैली या पातळीवरही विचार करावा लागतो. असा सर्वांगीण व्यापक स्थल-काल व कार्यपट उलगडल्यावर संप्रदायाचा अभ्यास पूर्ण होतो.

४. तौलनिक अभ्यास
         संत साहित्याचा तौलनिक अभ्यास ही साठोत्तरी कालखंडात विकसित झालेली अभ्यास पद्धती आहे. हा अभ्यास एकाच संप्रदायातील दोन किंवा अधिक अशा साहित्यकृती, तसेच दोन भिन्न साहित्यिक असा करता येतो. तो भिन्न संप्रदायातील साहित्यकृती किंवा साहित्यिक असाही करता येईल. उदाहरणार्थ, संत नामदेव व संत ज्ञानदेवकृत पसायदानांचा अभ्यास किंवा संत जनाबाई व संत बहिणाबाई यांच्या अभंगवाणीचा तौलनिक अभ्यास. किंवा महदंबेचे धवळे आणि नरेंद्राचे रुक्मिणीस्वयंवर यांचा तौलनिक अभ्यास. किंवा रामदास आणि तुकाराम यांच्या काव्याचा अभ्यास, इत्यादी.
        दोन भिन्न भाषेतील साहित्यकृती किंवा साहित्यिक यांचा तौलनिक अभ्यास करता येतो. उदा. महिपती बुवा ताहराबादकरकृत 'भक्तविजय' व पूरणदासकृत 'जनमसाखी' मधील नामदेव चरित्राचा  तौलनिक अभ्यास किंवा बहिणाबाई व मीराबाई यांच्या काव्याचा तौलनिक अभ्यास, इत्यादी.

संतसाहित्याभ्यास आणि विविध अभ्यास पद्धती
           अलीकडच्या काळात बरेचसे अभ्यासक हे संतसाहित्याचा अभ्यास प्राय: शोधनिबंध लेखन किंवा प्रबंध लेखनाच्या व्यावसायिक हेतूने करीत आहेत. असा अभ्यास आभासी असतो. अभ्यासार्थ योजिलेला साहित्यिक किंवा साहित्यकृती यांच्यासोबत अभ्यासकाचा आत्मीय अनुबंध असणे आवश्यक असते. तसे क्वचितच आढळते. जरी व्यावसायिक प्रयोजनार्थ संशोधन होत असले, तरी ते परिपूर्ण, साहित्यिक आणि साहित्यकृती यांच्या अंतरंगाचे योग्य आकलन घडविणारे, नेमके अर्थनिर्णयन करणारे असणे गरजेचे आहे.
       दुसऱ्या बाजूला काही अभ्यास हा न्यूनत्वबोधक, विशिष्ट गृहितकांवर बेतलेला आढळतो. उदा. संतांनी जातिव्यवस्था व वर्णव्यवस्था मोडली नाही, ते जातिव्यवस्थेचे समर्थक होते; हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी संतांच्या लेखनातील अनेकविध अवतरणे घेऊन संतांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे लेखन केले जाते. संतांनी जातिभंजन का केले नाही, असा जाबही विचारला जातो. हे सर्वथा गैर आहे. हेत्वारोप करणारी समीक्षा ही मुळात समीक्षाच नव्हे.
       मग संतसाहित्याचा अभ्यास कसा करावा लागेल? तर त्यासाठी आपणाला दोन गोष्टी उपलब्ध आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आज उपलब्ध असणारे संतांचे मूळ लेखन आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजात आजही अखंड प्रवाहित असणारे संप्रदाय. संतसाहित्याचा अभ्यास करताना सांप्रदायिक धारणा व मान्यता लक्षात न घेता केलेला अभ्यास हा अपुरा ठरण्याची शक्यता असते. कारण संतसाहित्याचा सांप्रदायिकांशी जैविक सहसंबंध असतो. याचा अर्थ असा नव्हे की संप्रदायात रूढ असलेल्या गोष्टी जशाच्या तशा स्वीकारून अर्थनिर्णयन करावे, विश्लेषण करावे. उदाहरणार्थ, वारकरी साहित्यात गुरू या संस्थेविषयी खूप लिहिले आहे. ज्ञानेश्वरीतील गुरुगौरव तर सुप्रसिद्ध आहे. पण इतरही संतांनी गुरुगौरव, गुरुपदेश यावर भाष्य केले आहे. असे असले तरी नामदेव, तुकाराम आदी संतांना गुरू ही संस्था अपरिहार्य आहे, असे वाटत नव्हते. नामदेवांच्या एका अभंगात विठ्ठल असे म्हणतो की 'तुझा तूंचि गुरु तुझा तूंचि शिष्य। तुझा तूं उपदेश घेई नाम्या।।' म्हणजेच नामदेवांनी विठ्ठलाच्या तोंडून एक स्वतंत्र वाट दाखविली आहे. ती अनुभवावर आधारलेली आहे. तर संत तुकाराम एका अभंगात असे म्हणतात की 'गुरुशिष्यपण हे तो अधम लक्षण।।' तर दुसऱ्या एका अभंगात म्हणतात 'मेघवृष्टीने करावा उपदेश। परी गुरूने न करावा शिष्य।।' वारकरी संप्रदायाचे अनेक फड आहेत, परंतु त्यांपैकी आजरेकर फडात विठ्ठलमूर्ती ऐवजी ग्रंथाची पूजा होते आणि या ग्रंथाला स्पर्श करून गळ्यात माळ घालून वारकरी होता येते. या सगळ्याच्या आधारे आपणास वारकरी संप्रदायातील गुरू संस्थेवर वेगळा प्रकाश टाकता येऊ शकतो.

काळाची संदर्भचौकट
       संत साहित्याचे आकलन अध्ययन करताना आपण काळाची संदर्भचौकट कोणती वापरतो, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. संतकवी ज्या काळात जन्मले, ज्या समाज-सांस्कृतिक पृष्ठभूमीवर त्यांची जडणघडण झाली आणि ज्या वाङ्मयीन पर्यावरणात ते लिहिते झाले, ते लक्षात घेतल्याशिवाय आपणाला योग्य निर्णयन करता येणार नाही. नामदेव 'वैकुंठ कोपट जुनाट झोपडी' असे म्हणतात किंवा ज्ञानदेव 'स्वधर्म अधिकार जातीपरत्व भेद। उचित ते शुद्ध ज्याचे तया।।' असे म्हणतात त्याचा अन्वयार्थ काळाच्या संदर्भ चौकटीत लावावा लागेल. म्हणजेच एका अर्थाने संतसाहित्याचे नेमके आकलन व्हावयाचे असेल, तर समाज-सांस्कृतिक संदर्भातून अभ्यास गरजेचा ठरतो.
       मराठीत दि. के. बेडेकरांनी साहित्य आणि संस्कृतीचा सहसंबंध स्पष्ट करताना म्हटले होते की, साहित्यावर नेहमीच संस्कृतीचा प्रभाव असतो आणि चांगले साहित्य संस्कृतीची जडणघडण करत असते. याच संदर्भात सुधीर रसाळ 'संस्कृती आणि वाङमय निर्मिती' या लेखात म्हणतात, "प्रत्येक लेखकाला त्याच्या संस्कृतीतील वाङ्मय प्रकारांच्या स्वरूपाची आणि त्यातील वाङ्मयीन संकेतांची सुप्तासुप्त जाणीव असते. प्रत्यक्ष निर्मिती करताना प्रस्थापित संकेतांच्या उपयोजनेतील त्याचे प्रभुत्व प्रकट होत असते. संस्कृतिनिर्मित वाङ्मय प्रकार आणि त्यांची संकेतव्यवस्था यांवर संस्कृतीचा घटक असणाऱ्या लेखकाची मालकी असते. म्हणून त्यांची मोडतोड करणे, त्याच्या कक्षा कमी-अधिक करणे, वाङ्मयप्रकारांचे मिश्रण करणे आणि नवे वाङ्मयीन संकेत निर्माण करून एकूण संकेतव्यवस्थेत त्याची भर घालणे हा त्याचा अधिकार असतो." (सुधीर रसाळ: २०१०)
         वरील दोन्ही संदर्भात आपण संतसाहित्याचा अभ्यास करू शकतो. तत्कालीन संस्कृतीचा संप्रदायावर असणारा प्रभाव आणि संप्रदायाचे संस्कृतीच्या जडणघडणीतील योगदान, असा विचार करता येतो. याला संस्कृतिनिष्ठ आकलन म्हणता येते. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राचा लोकधर्म घडविला. सात्त्विक जीवनाचा पुरस्कार केला. त्यामुळे गावागावात वाङ्मयाची जाण असणारी व विशिष्ट मूल्यनिष्ठा असणारी लोकसंस्कृती रुजली, हे स्पष्टपणे दिसते.
       लोकसाहित्याच्या अंगानेही संतसाहित्याचे आकलन करून घेता येते. दुर्गा भागवतांनी 'पैस' या लेखसंग्रहात पंढरीच्या विठोबाचा शोध धनगरी ओव्यांमधून घेतला आहे. त्याच्याच पुढे जाऊन आदिबंधात्मक समीक्षेचा वापर करून संतांच्या चमत्कार कथांमधील मिथकांची  उकल करता येते. संतांनी लोकपरंपरेतून अनेक रचनाबंध घेतले आहेत. त्याचाही विचार करता येईल.
       संत साहित्याचे स्त्रीवादी पुनर्वाचन करून काही नवे निष्कर्ष हाती येऊ शकतात. जी जनाबाई आपल्या प्रत्येक अभंगात 'म्हणे नामयाची जनी' अशी नाममुद्रा वापरते, त्या जनाबाईचा उल्लेख नामदेवांच्या फक्त एका अभंगात होतो. यावरून नामदेवांच्या लेखी जनाबाई दुय्यम होती, असे वाटू लागते. नामदेवांनी तरुण स्त्रियांवर अविश्वास व्यक्त केला आहे. 'सुंदर आणि पतिव्रता.....हे दुर्लभ जी दातारा।।' असे त्यांनी म्हटले आहे. शरयू बाळांच्या मते नामदेवांचे हे अनुदार उल्लेख वाचकांना धक्का देणारे असेच आहेत. दुसऱ्या बाजूला 'स्त्री जन्म म्हणोनि न व्हावे उदास।' म्हणणारी आणि 'डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी।।' असे म्हणत संघर्षसिद्ध झालेली जनाबाई अभ्यासताना तिच्या अभंगांकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहण्याचा मोह आवरत नाही.
        संतसाहित्याचा शैलीविज्ञानाच्या दृष्टीनेही आपणास अभ्यास करता येईल. 'विराणी' लिहिताना भावव्याकुळ होणारे ज्ञानदेव श्री विठ्ठलाचे रूप गुण वर्णन करताना थोडे तटस्थ होतात. याउलट असेच श्री विठ्ठलाचे वर्णन करताना नामदेव मात्र भावविभोर होतात, तर त्यांची समकालीन जनाबाई अधिकच मृदू , लयतत्त्व, जपणारी अभिव्यक्ती करते हा शैलीभेद विशेष अभ्यासण्याजोगा आहे.
       याशिवाय संतसाहित्याचे आकलन संरचनावाद, देशीवाद अशा विविध पद्धतिशास्त्रांचा वापर करूनही करता येईल. काही अभ्यासक फुले-आंबेडकरी दृष्टिकोण किंवा संवैधानिक मूल्यनिकषांच्या प्रकाशझोतात संतसाहित्याचे आकलन करू पाहतात. असा अभ्यास परिपूर्ण असणार नाही. पण उद्बोधक निश्चितच असेल, असे मला वाटते.

संदर्भ
१. थोरात हरिश्चंद्र, साहित्याचे संदर्भ, मौज, २००५
२. रसाळ सुधीर, वाङमयीन संस्कृती, मौज २०१०

                        डॉ. श्यामसुंदर मिरजकर
                कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी
                ता. खटाव, जि. सातारा.
                दूरभाष: ९४२१२१२३५२


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)