वैशाखाचे देणे (ललित लेख)


*वैशाखाचे देणे*

      नवे धान घरात आल्यामुळे कुणबी कास्तकारांच्या चेहऱ्यावर पसरलेली खुशी आणि अंगाची लाहीलाही करणारा दाहक उन्हाळा अशी वैशाखाची दोन रूपे मला दिसतात. पर्यावरणाच्या बिघडलेल्या संतुलनामुळे अलीकडे उन्हाळा भयावह दाहक वाटू लागला आहे. वाढत्या उष्णतामानामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळले आणि तेथे हजारो वर्षे शीतनिद्रेत असणारे विषाणू जलस्रोतात मिसळले, तर भविष्यात मानवाला नव्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा धोक्याचा इशारा आत्ताच शास्त्रज्ञ देऊ लागले आहेत. यावरचा एकच उपाय आहे, तो म्हणजे पृथ्वीवरचे हिरवे आच्छादन वाढविणे.
      वैशाखात उन्हाची दाहकता असह्य होते. वैशाखवणवा असा शब्दप्रयोग त्यासाठी केला जातो. तो दोन अर्थांनी सयुक्तिक आहे. एक तर या काळातले उन्ह त्वचादाह (सनबर्न) विकार निर्माण करते. काही भागात उन्ह इतके तीव्र असते की अनेकांचे डोळे लालभडक होतात. कडक उन्हाने भोवळ येणे, अपस्मार होणे, क्वचित मृत्यूला सामोरे जावे लागणे असेही प्रकार घडतात. दुसर्‍या बाजूला निसर्गातले जलस्रोत वाटू लागतात. प्राणी पक्षी तहानेने व्याकूळ होऊन मरू लागतात. त्यामुळे जलस्रोतांचे जतन आणि संवर्धन काळाची गरज बनते. केनियामध्ये वातावरणातील बदलामुळे उन्हाळा वाढून जलस्रोत  आटले. तेव्हा पॅट्रिक नावाचा एक सामान्य माणूस प्रतिवर्षी पदरमोड करून जंगली प्राण्यांसाठी दहा हजार लिटर पाण्याचा टँकर नियमितपणे घेऊन जाऊ लागला. गेली पाच वर्षे उन्हाळ्यातल्या त्याच्या परिश्रमामुळे हजारो जंगली प्राण्याचे प्राण वाचले आहेत. आपण इतके नसले तरी किमान परिसरातील मुक्या प्राणी पक्षांसाठी आवर्जून पाणी ठेवण्याचे काम करू शकतो.
       एकीकडे उन्ह असे दाहक असले तरी या उन्हातच निसर्गाचे खरे वैभव खुलू लागते. पळस फुलतो. पांगिरा रक्तवर्ण फुले आणि मधुकणाने कीटक व पक्षांना खुणावतो. काटेसावरीचा फुलसडा झाडाखाली दिसू लागतो. ही फुले अस्थिविकारात आश्चर्यकारक गुणकारी ठरतात. शिरीष, कांचन, मोगरा, बोगनवेल, जाई-जुई अशा अनेक वृक्षलतांचा हा बहराचा काळ असतो. या सर्वांमध्ये लक्षवेधक ठरतो तो नीलमोहर, म्हणजेच जॅकरन्डा! शहरांमध्ये रस्त्याकडेला शोभिवंत झाड म्हणून लावलेला नीलमोहर फुलला म्हणजे त्याच्या सौम्य निळसर रंगाने पाहणार्‍याच्या मनावर जादू केली नाही तरच नवल! निळ्या फुलांनी गच्च भरलेला नीलमोहर पहायला मिळणे म्हणजे भाग्यच! त्याच्या जोडीला फुलतो महाराष्ट्राचे राज्यपुष्प असणारा जांभळ्या फुलांचा ताम्हण. शिवाय गुलमोहर, बहावा, अनंत, स्वस्तिक, जास्वंद हे तर जोडीला असतातच. हे निसर्गातले रंगांचे वैभव, नाजूक पाकळ्या, विविध प्रकारची फुले, आकर्षक रंगसंगती हे सगळे या काळात रसरशीतपणे बाहेर येते. कारण हा काळ असतो वसंत ऋतूचा! जरी वसंत पंचमी माघ महिन्यात साजरी केली जात असली, तरी खरा वसंताचा कालखंड हा चैत्र वैशाखाचाच. या ऋतूला गीतेत 'ऋतुनाम् कुसुमाकर:।' असे गौरविले आहे. यौवन हा मानवी जीवनातील वसंत ऋतू, तर वसंत हे सृष्टीचे यौवन होय! 


        वैशाखाच्या प्रारंभीच पंजाब हरियाणा प्रांतात बैसाखी उत्सव असतो. शेतकरी नव्या पिकाचा आनंदोत्सव साजरा करतात. गंगेत स्नान, मेळा, भांगडा आणि गिद्दा नृत्य, 'गुरुग्रंथसाहेब'चे पठण आदींनीही बैसाखी म्हणजे वैशाखाचा पहिला दिवस साजरा होतो.
     अक्षय तृतीया हा वैशाखातला आणखी एक महत्त्वाचा दिवस. या दिवशी शेतकरी वर्ग शेताच्या बांधाला वेलवर्गीय बी टोकतात आणि थोडे थोडे पाणी घालून त्यांना जगवतात. 'आकितीचा पेरा, मोत्याचा तुरा!' किंवा 'आकितीचं आळं, बेंदराची फळं!' अशा अक्षय तृतीयबद्दलच्या दोन म्हणी लोकमानसामध्ये आढळतात. अक्षय धान्य देणारा पेरणीचा मुहूर्त असणारा हा दिवस. याच दिवशी संत बसवेश्वरांची जयंती साजरी होते.
       वैशाखातला आणखी महत्त्वाचा दिवस  म्हणजे वैशाखी पौर्णिमा! जगाला कारुण्याची, समतेची शिकवण देणारे महामानव भगवान बुद्ध यांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण या तिन्ही गोष्टी वैशाख पौर्णिमेलाच झालेल्या. त्यामुळेच ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. मला बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीची घटना महत्त्वपूर्ण वाटते. बिहार मधील बोधगया येथे एका पिंपळवृक्षाखाली ते ध्यानस्थ बसलेले असताना इ.स.पू.५२८ मध्ये वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांना ही ज्ञान प्राप्ती झाली. हा वृक्ष पुढे बोधीवृक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. सम्राट अशोकाने आपली मुलगी संघमित्रा हिला धर्मप्रसारासाठी श्रीलंकेत पाठविले, तेव्हा या वृक्षाची फांदी तिला दिली गेली होती. तिने श्रीलंकेतील अनुराधापुरा येथे ती लावली. म्हणजेच भरपूर प्राणवायू देणारा हा वृक्ष एका ज्ञाननिर्मिती क्षणाचा साक्षीदार झाला. म्हणूनच आज हा पिंपळ ज्ञानवृक्ष म्हणून ओळखला जातो आणि सर्वत्र आदराने रक्षिला, पूजिला जातो. 'इथल्या पिंपळ पानांवरती अवघे विश्व तरावे',  असे एका गीतात मंगेश पाडगावकर म्हणतात, ते किती अर्थपूर्ण आहे. हाच पिंपळ अश्‍वत्थ म्हणूनही ओळखला जातो. 'अश्वत्थ सर्व वृक्षानाम्।' अशी त्याची थोरवी गीतेत वर्णिली आहे. दरवर्षी याच बुद्ध पौर्णिमेला जंगलात मचाण सेन्सस होतं. म्हणजे जंगलातील वन्यजीवांची गणना होते.
        भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण शाल वृक्षाच्या सावलीत झाले. यावेळी शोक करणाऱ्या शिष्योत्तम आनंदाला बुद्ध म्हणाले होते, "आनंद, मृत्यू सुंदर आहे! या सुंदर क्षणी हा शालवृक्ष देखील बहरून आला आहे." जातक कथांमध्ये बुद्धाचा संबंध सप्तपर्णी, जांभुल, पळस, पाटला, पिम्पर्णी, नागचाफा, अशोक, कदंब आदी वृक्षांशी आल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातील अनेक देवदेवतांच्या नावे देवराया संरक्षित आहेत. हा उन्हातही फुलण्याचा आणि वृक्षांशी ऋणानुबंध जपण्याचा वसा वारसा आपणही अखंड जपायला काय हरकत आहे!

                               डॉ. श्यामसुंदर मिरजकर
              कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र (लेख)