विठ्ठल आणि मी : अनोखा अनुबंध

*विठ्ठल आणि मी*

Ours' is a strained relationship; isn't it? 
विठ्ठला, तुला मान्य आहे ना? 
का इथेही - 'नाही. मला नाही मान्य'
शेवटी तू सगळ्यांचा देव 
आणि 
मी नास्तिक.
So, there was and is a disconnect --
though not absolute! 

पण ते ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी 
आणि तुकाराम वोल्होबा आंबिले 
- Our common friends! 
त्यांनी सगळा घोळ घातला 

कधी-कधी येते शंका, दाट अशी की 
कुलकर्णी आणि आंबिलेंनी वापरून घेतलं तुला 
जसे सगळेच प्रेषित वापरून घेतात ईश्वराला 

बघ जरा डोळे उघडून 
मोझेस एक दगड घेऊन आला दहा अाज्ञांचे 
येशू आणि पैगंबर एकेक पुस्तक देऊन गेले कुलकर्णी आणि अंबिलेंनी तरी काय वेगळे केले? 
गेले की पळून ज्ञानेश्वरी आणि गाथा हातात देऊन 
एकाने घेतली समाधी आणि 
दुसरे तर विमानात बसून उडून गेले म्हणे सदेह! 

ज्यांच्या परसातली झाडे फुलांनी वाकून जातात 
त्यांना पडत नाहीत प्रश्न 
फुले वेचण्यात आयुष्य संपून जाते रे त्यांचे 
पण ज्यांच्या झाडांना श्रद्धेची फुलंच लागत नाहीत 
अशा माझ्यासारख्यांचे 
आणि अनंत काळ विटेवर उभे राहणाऱ्या तुझे 
काय हाल होतात, हे ह्यांना कसे कळेल? 

पांडुरंगा, विठ्ठला 
आता तरी पटतं ना रे की 
Ours' is a strained relationship! 

                               -  *गणेश कनाटे*

ही मला आवडलेली गणेश कनाटे यांची आणखी एक कविता. 'सेक्सोफोन हे वरातीत वाजवायचे वाद्य नाही' या काव्यसंग्रहातील. चोविसावेगळा आणि सहस्राआगळा असणाऱ्या विठ्ठलाने त्याच्या भक्तांना नादावले आहेच, परंतु नास्तिकांना आणि संदेहवाद्यांनाही वेडावले आहे. ज्याप्रमाणे नामदेवांची आई गोणाई म्हणाली, तसा हा देव प्रेमपिसे लावणारा असून घरघेणा आहे. पुंडलिकाने ही विवसी (हडळ) पंढरपुरी आणली. (असे दस्तुरखुद्द नामदेवांनी लिहून ठेवले आहे.) 
        
या विवसीने मराठीतल्या जाणत्या लेखक-कवींना आणि अभ्यासकांना स्वतःच्या मायावी प्रभावकक्षेत आणले आहे. गणेश कनाटे हे त्यापैकीच एक. सख्यभक्तीचे सुख अनुभवायला आलेला हा विठ्ठल. सगळ्या संतांनी त्याला सखा सवंगडी केले. त्याचे मानुषीकरण केले आणि चंद्रभागेच्या वाळवंटात नवा खेळ मांडला. कवी स्वतः नास्तिक. परंतु तरीही तो या सावळ्या सुंदराच्या खेळात सामील झालाय. 

म्हणूनच कवी विठ्ठलाला म्हणतो की, 'आपले हे ताणलेले नातेसंबंध आहेत. थोडेसे संपर्क तुटल्यासारखे, परंतु संपूर्णतः न तुटलेले.' 

कारण विठ्ठल आणि कवी यांचे दोन कॉमन मित्र आहेत. ते म्हणजे ज्ञानेश्वर आणि तुकाराम. आणि त्यांनीच तर खरा घोळ घातलाय. या दोघांनी इतक्या लडिवाळ शब्दांत आणि तरल अनुभूतीने आपल्या कविता लिहिल्या की, वाचणारा नकळतच  त्या भावविश्वात खेचला जातो. कवीला कधी कधी शंका येते की, जसे इतर प्रेषित देवाला वापरून घेतात, तसे या दोघांनी विठ्ठलाला वापरून घेतले आहे. ज्याप्रमाणे मोझेसने १० आज्ञा, येशू व पैगंबराने एक एक धर्मग्रंथ दिले अनुयायांच्या हातात, तसेच या दोघांनी ज्ञानेश्वरी आणि गाथा हातात देऊन निरोप घेतला सगळ्यांचा. ज्ञानेश्वरांनी घेतली समाधी आणि तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, म्हणे! 'म्हणे' शब्द वापरून कवी 'सदेह' बद्दल संदेह व्यक्त करतोय. 

पुढचे कडवे अफलातून आहे. कवी म्हणतो, 'ज्यांच्या परसातील झाडे फुलांनी वाकून जातात त्यांना प्रश्न पडत नाहीत. फुले (सुखद क्षण) वेचण्यात त्यांचे आयुष्य संपून जाते.' फुले म्हणजे ईश्वरार्पण करायची सुंदर व निर्दोष गोष्ट. म्हणजेच जे आपली प्रत्येक गोष्ट ईश्वरार्पण करण्याच्या श्रद्धेय भावनेने जगत असतात त्यांना फारसे प्रश्न पडत नाहीत. 
 
कवीला मात्र अनेक प्रश्न पडतात. म्हणजेच तो संदेहवादी आहे. म्हणूनच कवी म्हणतो, 'परंतु ज्यांच्या झाडांना श्रद्धेची फुलेच लागत नाहीत अशा माझ्यासारख्या लोकांचे आणि अनंतकाळ विटेवर उभे राहणाऱ्या विठ्ठलाचे काय हाल होत असतील, ते या दोन संतांना कसे कळणार?'

एका बाजूला नास्तिक किंवा संदेहवादी असणारा माणूस विठ्ठलाच्या बाबतीत मात्र प्रेमाचे भरते येऊन बोलतो, वागतो. (हा दुतोंडीपणा नव्हे.) असे होण्यातला पेच कवीने इथे नेमका पकडला आहे. त्यामुळेच हे नाते थोडेसे तणावाचे strained relationship आहे. 

विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचे नेमके काय हाल होत असतील? तर कदाचित अत्यंत श्रद्धेने, भावभक्तीने येणाऱ्या भक्तांच्या लौकिक जीवनात आपण फारसा बदल करू शकत नाही, याबाबतची अगतिकता त्याला जाणवत असेल. इच्छा नसताना अनेक प्रकारचे दैनंदिन षौडोपचार सहन करावे लागत असतील. भक्तिसुखाला लालचावलेला विठ्ठल भावभोळ्या भक्तांपासून दूर ठेवला जात असेल. बडवे-पुजारी यांच्या ताब्यात तो आहे, याचेही वैषम्य असेल. 

शेवटी कवी म्हणतो, 'हे विठ्ठलापांडुरंगा, आता तरी तुला पटले ना की, आपले नाते ताणलेले आहे?'

विठ्ठलाने भाविक भक्तांना स्वतःकडे खेचून घेणे हे तर सहज स्वाभाविकच आहे. परंतु नास्तिक, अज्ञेयवादी आणि संदेहवादी यांना देखील विठ्ठलाने प्रभावित केले आहे. वेड लावले आहे. वर्तमानात ज्यांच्या झाडांना श्रद्धेची फुले लागत नाहीत, त्यांना मोठ्या अस्वस्थतेला सामोरे जावे लागते.   विचारपूर्वक स्वीकारलेली नास्तिकता ही बुद्धिप्रामाण्यावर आधारित असते. तिथे चमत्कार, अवतार, अलौकिक शक्ती यांना थारा नसतो. हे नास्तिक लोक देवाचे धर्मग्रंथप्रणीत अस्तित्वच नाकारतात. तरीही विठ्ठलाने मात्र त्यांना वेडावलेले असते. कारण संतांशी जिवलग मैत्री केल्यावर संतांचा सखा असणाऱ्या पांडुरंगाशी मैत्री जडावी यात नवल ते काय! 

'ऐसा विटेवर देव कोठे!' पुस्तक लिहून विठ्ठलाचे व वारकरी भक्तीचे वेगळेपण स्पष्ट करणारे  म. वा. धोंड हे स्वतः संदेहवादी. तरीही मोठ्या आस्थेने त्यांनी हा प्रभावाचा पैस उलगडला आहे. तशीच गणेश कनाटे यांची ही कविता मला वाटते. 

                          - श्यामसुंदर मिरजकर

टिप्पण्या

  1. डॉ. सुलभा पाटील, संगमनेर१० मार्च, २०२३ रोजी १:१७ AM वाजता

    परीक्षण खूप छान.आस्तिक व नास्तिक दोघांनाही आकर्षित करणारे संत,त्यांची महनियता ही कविता दर्शवून जाते...ते आपण नेटकेपणाने आपल्या लेखनात आणतांना अनेक अव्यक्त गोष्टीही जाणवून जातात.खूपच यथार्थ लेखन.

    उत्तर द्याहटवा
  2. वाचला लेख..
    विचारमंथन करायला लावणारा..
    कवीचे आणि विठ्ठलाचे ताणलेले नाते..ज्यांच्या झाडाला श्रद्धेची फुलेच लागतं नाहीत त्यांची अस्वस्थता...
    फारच गुंतागुंत आहे.. पण खरंय हे..
    थोडक्यात संपूर्ण मांडणी केलीय..
    खळबळ मजते डोक्यांत...

    उत्तर द्याहटवा
  3. फारच सुरेख समीक्षण. अप्रतिम उदहरण. ते म्हणजे ज्याच्या झाडाला श्रद्धेची फुलं...

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच वैचारिक परीक्षण आस्तिक नास्तिकतेच्या हिंदोळयावर झुलणारा वेगळा पण मननीय विचार !
    धन्यवाद डॉ. मिरजकर सर
    महेशकुमार सोनावणे, बारामती

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र (लेख)