स्त्री मनाच्या खोल गाभाऱ्यात प्रवेशणाऱ्या कथा : आत आत आत

स्त्रीमनाच्या खोल गाभाऱ्यात प्रवेशणाऱ्या कथा : आत आत आत मराठी साहित्यात विभावरी शिरूरकरांपासून निरजा किंवा प्रज्ञा दया पवार पर्यंत अनेक लेखिकांनी स्त्रीविश्वाचे आतील पदर व्यक्त केले आहेत. तरीही अद्याप स्त्रीजीवनातील अनेक अनुभव आणि त्यांच्या भावविश्वावर होणारे परिणाम अस्पर्शित आहेत. अमृता देसर्डा यांनी आपल्या कथांमधून अशा अस्पर्शित अनुभवविश्वाचे दर्शन घडविले आहे. कथेच्या प्रांतात भाऊ पाध्ये, प्रकाश नारायण संत, किरण गुरव सारख्या कथाकारांनी बालमानस प्रगल्भपणे चित्रित केले आहे. मात्र बालिका मानस क्वचितच आलेले आढळते. अमृताच्या अनेक कथांमधून हे बालिका मानस चित्रित झाले आहे. खरे तर, आपल्याकडे बाल संगोपनाकडे म्हणावे तितके गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. आपल्या मुलांशी सुसंवाद राखण्या ऐवजी त्यांना उपदेशाचे डोस पाजणे किंवा दोष देणे यातच पालक मश्गुल झालेले असतात. त्यामुळे अनपेक्षितपणे लैंगिक अनुभवाला सामोरे जावे लागणाऱ्या मुलींना नीटपणे समजून घेतले जात नाही. त्यातून गंभीर पेच प्रसंग किंवा समस्या निर्माण होतात. त्याचे चित्र अमृताच्या अनेक कथांमधून आ...