स्त्री मनाच्या खोल गाभाऱ्यात प्रवेशणाऱ्या कथा : आत आत आत

स्त्रीमनाच्या खोल गाभाऱ्यात प्रवेशणाऱ्या कथा : आत आत आत

       मराठी साहित्यात विभावरी शिरूरकरांपासून निरजा किंवा प्रज्ञा दया पवार पर्यंत अनेक लेखिकांनी स्त्रीविश्वाचे आतील पदर व्यक्त केले आहेत. तरीही अद्याप स्त्रीजीवनातील अनेक अनुभव आणि त्यांच्या भावविश्वावर होणारे परिणाम अस्पर्शित आहेत. अमृता देसर्डा यांनी आपल्या कथांमधून अशा अस्पर्शित अनुभवविश्वाचे दर्शन घडविले आहे. कथेच्या प्रांतात भाऊ पाध्ये, प्रकाश नारायण संत, किरण गुरव सारख्या कथाकारांनी बालमानस प्रगल्भपणे चित्रित केले आहे. मात्र बालिका मानस क्वचितच आलेले आढळते. अमृताच्या अनेक कथांमधून हे बालिका मानस चित्रित झाले आहे. खरे तर, आपल्याकडे बाल संगोपनाकडे म्हणावे तितके गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. आपल्या मुलांशी सुसंवाद राखण्या ऐवजी त्यांना उपदेशाचे डोस पाजणे किंवा दोष देणे यातच पालक मश्गुल झालेले असतात. त्यामुळे अनपेक्षितपणे लैंगिक अनुभवाला सामोरे जावे लागणाऱ्या मुलींना नीटपणे समजून घेतले जात नाही. त्यातून गंभीर पेच प्रसंग किंवा समस्या निर्माण होतात. त्याचे चित्र अमृताच्या अनेक कथांमधून आलेले दिसते.
      'पायजमावाला' या कथेत एका आठ-दहा वर्षांच्या मुलीचा पाठलाग करणारा व तिच्यासमोर लिंग प्रदर्शन करणारा विकृत प्रौढ माणूस येतो. कदाचित असा माणूस संधी साधून अत्याचारही करू शकतो. परंतु त्या छोट्या मुलीला आई वडील भाऊ समजावून घेत नाहीत. त्यामुळे एका भयंकर अनुभवाला तिला जावे लागते.
      'प्रिय मीनास...' या कथेत पाचवीत शिकणारी मीना आणि सहावीच्या वर्गातील राकेश नावाचा टारगट मुलगा यांची कहाणी आली आहे. मीनाला वडील नाहीत आणि आई कुठेतरी काम करून दोघींचे पोट भरते आहे. अशा वेळी शाळेतील राकेश हा मुलगा सतत तिचा पाठलाग करतो. प्रेमपत्रे देतो. ती त्याला प्रतिसाद देत नाही. पण गृहपाठाच्या वहीतून त्याने दिलेले पत्र आईला सापडते. ती निरागस मीनालाच मार देते. तिची असाहाय्यता समजून घेत नाही.
       'घर घर' या कथेत उमलत्या वयातील मुली आपल्या आई-वडिलांचे वागणे बघून घर-घर खेळ खेळताना नवरा बायको होतात आणि एकमेकींना प्रेमाने कुरवाळतात. या शारीर अनुभूती त्यांना विलक्षण वेगळा आनंद देतात. याचे संवेदनशील व प्रांजळ कथन या कथेत आलेले दिसते. 'नीराची प्रश्नावली' या कथेत स्वप्नात आलेल्या देवाला निराने अनेक प्रश्न विचारणे येते. त्यावेळी तो देवही निरुत्तर होतो. देव सर्वशक्तिमान व दीनदुबळ्यांचा पाठीराखा आहे या भ्रामक कल्पनेला छेद देणारी ही प्रश्नावली आहे. 'रेवाची रोजनिशी' या कथेत रोजनिशीच्या लेखन तंत्रातून रेवा म्हस्के या मुलीची कौटुंबिक कथा येते. प्रामाणिकपणे दररोज डायरी लिहा असे सांगितल्यानंतर तिने लिहिलेले कुटुंब कलहाचे प्रसंग तिच्या शिक्षिकेलाही अस्वस्थ करून सोडतात. आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समजून घेणे किती गरजेचे असते, ते येथे चित्रित होते.
      'देवघरातलं गुपित' कथेत पाचवीतील स्नेहा आई-वडिलांच्या प्रणयाची नकळत साक्षीदार होते. मुलींची झोप लागली असे समजून देवघरात झोपणारे आई-वडील व त्यांचे ऐकू येणारे चित्कार तिच्या बालमनात अनेक प्रश्न निर्माण करून जातात.
      आई-वडिलांचा आधार नसलेल्या पोरक्या मुलीला पहिल्या पाळीच्या अनुभवाला कसे सामोरे जावे लागते आणि तिला सांभाळणारा मामा शेवटी तिला वेगळ्याच नजरेने पाहू लागतो याचे अस्वस्थ करणारे चित्र 'पाळी' कथेत येते, तर 'चिठ्ठी' कथेत मोठ्या बहिणीच्या अधुऱ्या प्रेम कहानीची साक्षीदार छोटी बहीण होते. तिच्या दप्तरात तिला सापडणाऱ्या चिठ्ठ्या तिच्या मोठ्या बहिणीला दिल्या गेलेल्या असतात. त्यामुळे या छोट्या मुलीचे भावविश्व ढवळून निघते.
     'तिऱ्हाईत' कथेत तरुणपणी विधवा झालेली आई विवाहबाह्य संबंधात गुरफटून जाते आणि तिच्या मुलीला त्याची हळूहळू चाहूल लागते. त्यामुळे जे तणावपूर्ण संबंध कुटुंबात तयार होतात त्याचे चित्र आलेले दिसते. 'निरीची मिनी' या कथेत विवाहपूर्व शरीर संबंधातून गर्भवती होणे या वेगळ्याच समस्येचा वेध घेतला आहे. याशिवाय 'अचूक नेम', 'कणीस', 'हातम' अशा कथांमधून तरुण स्त्रियांना विविध प्रकारे जाळ्यात पकडू पाहणारे पुरुष येतात.
         'तहानभूक' कथेत एकीकडे लग्न जुळू न शकलेली पस्तीस-छत्तीस वर्षांची मुलगी आणि साठी नंतर ही घरात मुलगी आहे याचे भान न बाळगता कामजीवनाचा आनंद लुटणारे तिचे आई-वडील यांची कहाणी येते. 'मंगळसूत्र' कथेत अविवाहित प्रौढा मंगळसूत्र घालून विवाहित असल्याचा दिखावा करताना दिसते, तर 'अंशुल' कथेत मुल नको असणारी पत्नी आणि तिचा डॉक्टर पती यांच्यातील मतभेदांमुळे निर्माण झालेली दरी आणि त्यामुळे नातेसंबंध तुटणे याचे चित्र येते. तर 'मोहोर' या दुसऱ्या कथेत विसंवाद असलेले निवृत्त जोडपे एकमेकांपासून दूर दूर राहतात. त्यामुळे त्यांच्या जीवनातील मोहर हरवतो. सुगंध नाहीसा होतो, असे दिसते.
       अमृता देसरडा यांच्या कथा अनेक वळणाच्या समस्या घेऊन येतात. मुली/स्त्रिया दररोज अग्निदिव्यातून जात असतात, त्याची जाणीव फारच थोड्या लोकांना असते. कारण स्त्रियांना खूपसे गृहीत धरले जाते. जोपर्यंत मुली स्त्रिया स्पष्टपणे स्वतःच्या समस्या भावना बोलून दाखवत नाहीत, तोपर्यंत त्या इतरांना त्या तीव्रतेने कळत नाहीत. दुसऱ्या बाजूला पालकच मुलींना विश्वासात घेऊन जवळ करत नाहीत, त्यांच्या अडचणी समजून घेत नाहीत, म्हणूनही काही प्रश्न तयार होतात. स्त्रियांना बाहेरच्या परपुरुषांची जितकी भीती असते, तितकीच भीती विविध नातेसंबंधातील पुरुषांची देखील असते. ती कधी शारीरिक, तर कधी मानसिक पातळीवरील असते, याचे नेमके भान हा कथासंग्रह देतो. यातील बहुसंख्य कथा प्रथम पुरुषी आत्मनिवेदन करतात. पत्रे, डायरी अशा लेखन तंत्रांचा वापर करत या कथा आलेल्या दिसतात. अमृता देसर्डा यांनी मोठ्या धाडसाने स्त्री मनातील 'आत आत आत' असणारे अनेक अनुभवांचे पदर उलगडले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे.

                      आत आत आत
                      अमृता देसर्डा
                      सारद मजकूर, पुणे
                      प्रथमावृत्ती डिसेंबर २०२१

                       डॉ. श्यामसुंदर मिरजकर
               कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी

 

टिप्पण्या

  1. खूप सुंदर लिहिले आहे.खरोखरच विभावरींना ख-या अर्थाने समजून घेणाऱ्या कथालेखिकांचा प्रवाह मराठीत येणे आशादायी आहे.अमृता यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ll

    उत्तर द्याहटवा
  2. शोभा श्रावस्ती१ मे, २०२३ रोजी १०:०२ PM

    "आत आत आत," या कथासंग्रहाचे खूप छान परीक्षण केले आहे. कथासंग्रह वाचल्याची अनुभूती होते. कथा खूप वास्तवाचा वेध घेणा-या वाटतात .👌👌👍👍

    उत्तर द्याहटवा
  3. डॉ. गोरख बनसोडे१ मे, २०२३ रोजी १०:०४ PM


    अतिशय सुदंर समीक्षा केली आहे.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय मार्मिक पण प्रभावी टिप्पणी 👍👍

    उत्तर द्याहटवा
  5. डॉ. रूपाली शिंदे१ मे, २०२३ रोजी १०:०७ PM

    वाचलाय छान आहेत कथा.

    उत्तर द्याहटवा
  6. अगदी नाजूक विषयावरील कथासंग्रहाचा छान सविस्तर परिचय करून दिला आहे. पुस्तक वाचायला हवं असं वाटायला लावणारं लेखन...
    संग्रहाचं मुखपृष्ठ फार सुंदर आणि समर्पक आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

मी रात टाकली...

#जिहाल-ए-मस्कीं मकुन-ब-रन्जिश (लेख)