प्रियाराधन
*प्रियाराधन*
प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. अवघं जीवन सौंदर्यपूर्ण आणि सुखावह करण्याचं सामर्थ्य या भावनेत असतं. तरल आणि संवेदनशील मन, अखंड उत्साह हे प्रेमाचं खरं अधिष्ठान! जगण्यावरचा आणि स्वतःवरचा विश्वास अनंत पटीने वाढविण्याचं काम हे प्रेम करतं. त्यामुळेच भारतीय काव्यशास्त्रातील रसविचारात शृंगाररसाला रसराज म्हटलं आहे.
तो आणि ती यांच्यामध्ये प्रथम आकर्षण वाटतं. मग सहवास वाढतो. नंतर प्रेमभावना दृढ होत जाते. निसर्गातही अनेक ठिकाणी या प्रेमभावनेचे सुरेख आणि हृदयंगम दर्शन घडत असतं. निसर्गात म्हणजेच प्राणी, पक्षी, झाडं, वेली यांच्यामध्ये विणीचा विशिष्ट हंगाम असतो. तो काही प्रजातींमध्ये वर्षातून एकदा किंवा दोनदाही असतो. या विणीच्या हंगामात प्राणीपक्षी अधिक सुंदर, आकर्षक, सामर्थ्यवान दिसू लागतात. अंतरंगात उसळून आलेल्या प्रेमाच्या उर्मी त्यांच्या जगण्या वागण्यात नवचैतन्य निर्माण करतात. त्यामुळे मदमस्त होऊन हे प्राणीपक्षी प्रियवराच्या शोधार्थ फिरू लागतात. सजगपणे निसर्गाचे अवलोकन केले तर एक गोष्ट आपणास जाणवेल की बहुसंख्य प्राणीपक्ष्यांच्या प्रजातींमध्ये नर हे अधिक सुंदर आणि सामर्थ्यवान असतात. त्यांच्याकडे विशेष क्षमता असतात. निसर्गाने हा भेदभाव केला आहे जरूर, पण त्यामागे एक योजकता आहे. हे जादाचे सौंदर्य, सामर्थ्य, क्षमता यांचा वापर मादीला आकर्षित करून घेण्यासाठी प्रियाराधनात करावयाचा असतो. प्रियाराधन ही एक कला असते. त्याद्वारे तिचे प्रेम आणि विश्वास संपादन करायचा असतो.
सिंहाला आयाळ असते, हत्तीला सुळे असतात, काळवीटाला डौलदार शिंगे असतात, तर गवे, हुप्पे हे अधिक सामर्थ्यवान दिसतात. या सर्व प्राण्यांना स्वतःची योग्यता सिद्ध करावी लागते. तरच मादी त्यांचा स्वीकार करते. म्हणूनच मादीचे प्रेम जिंकण्यासाठी सगळ्या नरांमध्ये सतत स्पर्धा आणि संघर्ष चाललेला असतो. गवे, काळवीट, मेंढा असे अनेक प्राणी एकमेकांना भिडतात. टकरा देतात. पराभूत नराला पळवून लावतात आणि मादीचे प्रेम संपादन करतात. तिच्यावरचा हक्क प्रस्थापित करतात. माद्या कौतुकाने हे द्वंद्व न्याहाळतात. कारण Power is the beauty of male हे निसर्गतः त्यांच्यामध्ये रुजलेले असते. सुदृढ वंश निर्मितीसाठी ते गरजेचेही असते.
जिंकलेल्या नराला कधी एक सहचारिणी मिळते किंवा कधी माद्यांचा अख्खा कळपच मिळतो. वर्षातील विशिष्ट काळात हे प्रियाराधन चालते. विशेषतः पावसाळ्या पूर्वीचा काळ म्हणजेच वसंत ऋतूचा काळ हा प्रेमपर्व म्हणून ओळखला जातो. याच काळात सगळे वृक्ष बहरतात. फुलतात. फुलांतील स्त्रीकेसर आणि पुंकेसर यांचे मधमाशा, भुंगे, इतर कीटक, पक्षी यांच्या माध्यमातून परागीभवन घडते. मगच झाडांना फळं लागू लागतात. पावसाच्या आगमनामुळे सर्वत्र हिरवाई उगवते. अनेक छोटे जीवजंतू जन्मतात. त्यामुळे पक्षी व प्राण्यांना मुबलक अन्न उपलब्ध होते. म्हणूनच तत्पूर्वीचा वसंत हा मीलन काळ असतो. मादीचे मन जिंकणे, प्रेम जिंकणे सोपे नसते. त्यासाठी नराला सगळे कसब, कौशल्य, सामर्थ्य पणाला लावावे लागते. प्रतिद्वंद्वी नराच्या वरचढ ठरावे लागते. या संघर्षात कधीकधी जायबंदी होणे किंवा प्राणहानी वाट्याला येते. परंतु त्याची तमा न बाळगता हे भिडू स्पर्धेत उतरतात. साहस, कौशल्य आणि सौंदर्य यांच्या बळावर प्रेम जिंकतात. विविध जीवांचे हे प्रियाराधन पाहण्यासारखे असते.
प्राण्यांच्या जगात डौलदारपणा आणि सामर्थ्य याला महत्त्व असते, तर पक्ष्यांच्या जगात सौंदर्य आणि कौशल्य याला महत्त्व असते. प्राणी एकमेकांना आपले अंग घासून, जिभेने चाटून किंवा एकमेकांसोबत आनंदाने बागडून आपला प्रेमभाव व्यक्त करतात. तसेच प्रेमदर्शक आवाज काढून ते आपली पसंती परस्परांपर्यंत पोहोचवतात.
पक्ष्यांचा राजा मोर हा डौलदार पिसाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो प्रियाराधन करताना पंख आणि पिसारा फुलवून नाचतो. पदन्यास करतो. रानात/जंगलात 'मोरनाची' अशी विशिष्ट जागा असते. तिथे इतर लांडोरी गोलाकार उभ्या राहतात आणि मध्ये रिकाम्या जागेत मोरनृत्य चालते. त्या नृत्यावर भाळलेली लांडोर मोराचा अनुनय करते. त्याच्याशी जुगते. विशेषतः चांदण्यारात्री ही रासक्रीडा चालते. जंगलातील रानकोंबडे आपल्या शेपटीचा छोटा पिसारा, डोक्यावरचा तुरा यांचे प्रदर्शन करत उंच फांदीवर बसून मोठ्याने आरवतात. माद्यांचे लक्ष वेधून घेतात, तर कबुतरे मादी भोवती फेर धरून घुमत राहतात. त्यांची अदाकारी आणि मानेभोवती असणाऱ्या पिसांची झाक पाहण्यासारखे असते.
काही पक्षी सुस्वर गायनाने मादीवर प्रभाव पाडतात कोकीळ, दयाळ, पर्वत कस्तुर, सुभग हे या प्रकारचे पक्षी आहेत. कोकिळा गाते हा गैरसमज आहे. काळ्या रंगाचा कोकीळ नर कुहू कुहूच्या ताना घेऊन सारे रान जागे करतो. त्यावेळी जवळपास स्पर्धक नर असेल तर तोही आपले कौशल्य दाखवितो. ही चढाओढ कबऱ्या रंगाची म्हणजेच राखी-पांढऱ्या रंगाची मादी पानांच्या झुबक्यातून पाहत असते. नंतर ज्याचे गाणे आवडते त्याच्या जवळपास ती रेंगाळू लागते. असाच प्रकार सगळ्याच गायक पक्षांमध्ये दिसतो. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, पण रातकिड्यांचे किरकिरणे हेसुद्धा एक प्रकारचे प्रियाराधन असते. झुडपातील थोड्या उंच ठिकाणी बसून पंखांवर पाय घासून ते मादीसाठी खुलं आमंत्रण देत असतात. त्या आवाजाला भुलून एखादी मादी त्यांच्या जवळ आली की हे किरकिरे थांबते.
सुगरण नर घरटे बांधण्याचे कौशल्य दाखवून मादी पटकावतो. तो प्रथम एक मजबूत आणि देखणे घरटे बांधायला घेतो. अर्धवट बांधलेले घरटे पाहण्यासाठी घरट्यावर बसून माद्यांना साद घालतो. मादी येते. घरटे पसंत किंवा नापसंत करते. जर पसंत पडले, तर दोघे मिळून घरटे पूर्ण करतात. माद्यांनी नाकारलेले अपुरे घरटे नर तसेच सोडून देतो. ज्यांना घरटे बांधता येत नाही, असे सुगरण नर बिचारे ब्रह्मचारीच राहतात.
मादी भोवती नाच करणारे नाचरा, चिरक, बुलबुल हे पक्षी आवर्जून पहावेत. इतर काही पक्षी आपले पंख, गळ्याजवळचे रंग, शेपटीचे तुरे आणि सुरेल आवाजाने मादीचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करतात. क्रौंच पक्षी हे आपल्या प्रियाराधनेसाठी प्रसिद्ध आहेत. लांबसडक मान व चोच उंचावून त्यांनी केलेला नाच हा अाऩदाचा परमोच्च बिंदू असतो. त्यावेळी त्याचा आनंददर्शक आवाज बेधुंद करणारा असतो.
या सगळ्या पक्षांत अद्भुत प्रियाराधन असते ते बॉवर पक्षाचे! गवत, काटक्यांनी तो एक छोटीशी झोपडी तयार करतो. त्या झोपडीला विविधरंगी फुले, किडे, रंगीबेरंगी वस्तू यांनी सजवतो. सजावट पूर्ण झाली की तिथूनच मादीला साद घालतो. मादीही अलगद त्याच्या अंगणी उतरते. आतून-बाहेरून सजावटीचे परीक्षण करते. रंगसंगती, रचना आवडली नाही तर निघून जाते. आवडली तर अंगोपांगी फुलून येते आणि त्यांचे मीलन होते.
प्राणी पक्षी प्रेमासाठी इतकी रसिकता दाखवतात, प्रियेचे मन जिंकण्यासाठी आराधना करतात, आपले सर्वस्व पणाला लावतात, तर माणसाने अरसिक होऊन कसे चालेल? शरीराच्या आधी मनाला स्पर्श करता आला पाहिजे, तरच नंतरची भेट ही काळजात जपून ठेवावी अशी होईल. सुळे नसलेला हत्ती, पिसारा नसलेला मोर आणि कर्तृत्व, संवेदनशीलता नसलेला माणूस यांना 'मुकना' म्हणतात. त्यांना कोणतीच मादी प्रेमाने स्वीकारत नाही. कदाचित हा निसर्गाचाच एक नियम असावा.
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी (सातारा)
९४२१२१२३५२
पूर्वप्रसिद्धी : स्वप्ननगरी दिवाळी अंक २०२३
ललित सुंदर आहे.पक्षांचे विश्वही.प्रेम आणि प्रियाराधन आप्रतिम.सर...
उत्तर द्याहटवामिरजकर सर अप्रतिम लिखाण....बऱ्याच गोष्टी आज नव्याने माहित झाल्या.अभिनंदन.
हटवाअभ्यासपूर्ण लेख आहे.. प्राणी जगात काय चालते हे खरंच इंटरेस्टिंग आहे...
उत्तर द्याहटवाफारच छान लेख...
उत्तर द्याहटवाKhup Sundar. Sir. Marute chitampali yanchi. Athvan. Aali sir
उत्तर द्याहटवासर,
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख आहे. अजून दीर्घ हवा होता असं वाटत. ज्या साजिवात पुरुष दादागिरी करणारा असतो, त्यात तो कुरूप असतो, आणि ती सुंदर असते...
पण लेख सुंदरचं
अतिशय सुंदर निसर्ग प्रेमाची मांडणी आहे 👌🙏
उत्तर द्याहटवाअप्रतिम....माहितीपूर्ण लेख....बऱ्याच गोष्टी आज नव्याने समजल्या.... नर किंवा पौरुषत्व म्हणजे काय याची उकल मस्तच.👌🏻💐
उत्तर द्याहटवा