महापरिनिर्वाण

महापरिनिर्वाण

         मित्रहो, बौद्ध तत्त्वज्ञानात निर्वाण व महापरिनिर्वाण या दोन भिन्न भिन्न संकल्पना आहेत. निर्वाण या अर्थाने पाली भाषेत निब्बाण असा शब्द वापरला जातो. सर्वप्रथम आपण या दोन संकल्पनांमधील भेद समजून घेऊ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकात निर्वाण प्राप्ती संदर्भात सविस्तर भाष्य केलेले आहे. 
      निर्वाणप्राप्ती ही मनुष्याने जीवित असतानाच करावयाची गोष्ट आहे. तर परिनिर्वाण म्हणजे निर्वाण प्राप्त झालेल्या व्यक्तीचा सुखकर मृत्युसोहळा होय. निर्वाण प्राप्त करणे हाच धम्म आहे. निर्वाणासारखे सुखकर काहीही नाही, असे बुद्धांनी सांगितले आहे. बुद्धांनी सांगितलेल्या सर्व सिद्धांतांच्या केंद्रस्थानी निर्वाण सिद्धांत आहे. ‘निब्बाणं परमं सुखं’ असे धम्मपदात (२०३-२०४) म्हटले आहे व ह्यालाच बुद्ध सर्वांत श्रेष्ठ (अवस्था) असे मानतात. ‘निब्बाणं परमं वदन्ति बुद्धा’ (धम्मपद १८४). बुद्धांनी सांगितलेले निर्वाण हे पूर्वसुरींनी सांगितलेल्या निर्वाणापेक्षा अर्थ आणि आशयदृष्ट्या भिन्न आहे. बुद्धांच्या पूर्ववर्तींनी निर्वाण म्हणजे आत्म्याला झालेला मोक्ष लाभ किंवा आत्म्याची मुक्ती असे म्हटले आहे. पूर्वी निर्वाणाच्या चार संकल्पना मांडल्या होत्या. १.लौकिक (म्हणजे खाणे, पिणे, मौज करणे) २. यौगिक ३. ब्राह्मणी ४. औपनिषदिक. 
        ब्राह्मणी आणि औपनिषदिक निर्वाणाच्या संकल्पनेत आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले होते. बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व अमान्य केल्यामुळे हे पूर्व सिद्धांतही आपोआपच खंडित झाले. लौकिक निर्वाण ही संकल्पना भौतिकवादी आहे. माणसाच्या इंद्रियजन्य वासनांची पूर्ती म्हणजे निर्वाण असे मानणे अध्यात्मिक नव्हे. त्यामुळे बुद्धांनी तेही नाकारले आहे. उलट इंद्रियजन्य वासनांची तृप्ती ही वासनांचा अग्नी अधिकच प्रज्वलित करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे जीवनात कदापिही सुख लाभत नाही. यौगिक निर्वाण ही नकारात्मक सुखाची संकल्पना आहे. ही सर्वथा अस्थायी अवस्था आहे. यामध्ये यथार्थ जगाशी, जीवनाशी असलेला संबंध तोडणे आणि योग अवस्था धारण करणे गृहीत आहे. यामुळे दुःख निवारण होऊ शकते, परंतु सुख प्राप्ती होऊ शकत नाही. तसेच योगाची अवस्था कायम असेपर्यंतच हे निर्वाण टिकते आणि म्हणूनच ही संकल्पना देखील बुद्धांनी नाकारली आहे.
       बुद्धांच्या निर्वाणात आत्म्याच्या सुखाऐवजी प्राणिमात्रांचे सुख हे तत्त्व केंद्रवर्ती आहे. बुद्धांच्या निर्वाणात कामवासना नियंत्रित करणे, तृष्णाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नी नियंत्रित करणे महत्त्वाचे मानले आहे. या विविध अग्नीमुळे मानवी जीवन जळते. त्यात दुःख निर्माण होते. याचे ज्ञान व जाणीव झाल्यानंतर चित्तात उपेक्षा आणि विरक्ती उत्पन्न पावते. असे झाले की तृष्णा शांत होते. त्यानंतरच तो जीव मुक्त होतो. लोभ, द्वेष, मोह यांचा समूळ उच्छेद झाला, तर माणूस दुःखी होणार नाही. त्याला मानसिक वेदना किंवा पीडा अनुभवावी लागणार नाही. अशा प्रकारे निर्वाण हे याच जीवनात प्राप्त होणे शक्य आहे. 
       एकदा जेतवनात तथागतांच्या उपदेशानंतर तेथील भिक्खूंनी सारीपुत्ताला विचारले निर्वाण म्हणजे काय? त्यावेळी सारीपुत्त म्हणाले, "भिक्खूंनो, हे जाणून घ्यावे की लोभ वाईट आहे. क्रोध वाईट आहे. लोभापासून क्रोधापासून मुक्त व्हायचे असेल तर मध्यममार्ग स्वीकारावा. हा मध्यममार्ग दृष्टी व ज्ञान देणारा आहे. हा मार्ग शांतीचा व अंतर्दृष्टी देणारा मार्ग आहे. हा मार्ग बोधी देणारा आणि निर्वाणाप्रत नेणारा मार्ग आहे. हा मध्यममार्ग म्हणजे अष्टांगिक मार्गाव्यतिरिक्त काहीही नाही. सम्यकदृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक अजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी यांचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय. बुद्धाच्या ह्या मार्गाला ‘मध्यम मार्ग’असे म्हटले जाते. ह्याचे कारण बुद्धाने शाश्वतवाद व उच्छेदवाद ही दोन्हीही आत्यंतिक मते टाळली आहेत. तसेच कामोपभोग व देहदंडन हीही दोन्ही टोके टाळून मधला मार्ग पत्करला आहे.
     याचा अर्थ इतकाच की, अष्टांगिक मार्ग अनुसरून काम, क्रोध, मोह, लोभ यांना नियंत्रित ठेवणे आणि सुखमय अवस्था प्राप्त करणे म्हणजेच निर्वाण होय. 
परिनिर्वाण
       बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग अनुसरणारी व्यक्ती निर्वाण प्राप्त करते. अशी व्यक्ती अरहत असते. अरि म्हणजे शत्रू. शत्रूला पराभूत करणारा या अर्थाने अरहत (किंवा जैन परिभाषेत अरिहंत) हा शब्द वापरला जातो. काम, क्रोध, लोभ, मोह हे विकार म्हणजे मानवी जीवनाचे शत्रू आहेत. त्यांच्यावर विजय प्राप्त करून सम्यक आजीविका करणारा अरहत असतो. अरहत हा स्थिर व शांत चित्ताने जीवन कंठतो. तो प्रसन्न राहतो व इतरांनाही मनाची प्रसन्नता बहाल करतो. तो योग्य मार्गदर्शन करतो. अशा अरहताचा अंतिम काळ म्हणजेच मृत्यू हा परिनिर्वाण म्हणून ओळखला जातो. 

बुद्धांचे महापरिनिर्वाण
       तथागत गौतम बुद्धांना ८० वर्षांचे दीर्घ आयुष्य प्राप्त झाले. त्यांनी लाखों लोकांना धम्मदेशना दिली. भिक्खू म्हणून संघात स्थान दिले. जीवन जगण्याचा सर्वात सुंदर असा मध्यममार्ग जगाला सांगितला. जीवनाच्या अंतिम पर्वात एक दिवस गौतम बुद्ध आणि आनंद यांनी वैशाली नगरात भिक्षाटन केले. जवळच्या जंगलात भोजन करून ते विश्रांतीसाठी चपला विहाराकडे आले. रस्त्यात विविध ठिकाणी थांबून अत्यंत सुंदर अशी नैसर्गिक दृश्ये पाहून घेतली. आनंदांनी बुद्धांची विश्रांतीची व्यवस्था केली व ते चलित ध्यान करण्यासाठी बाहेर पडले. त्याच वेळी त्यांना भूकंपाचा जोरदार धक्का अनुभवावयास आला. त्यांचे चित्त आणि शरीर कंपित झाले. ते लगबगीने विहारात आले. त्यांनी पाहिले बुद्ध शांतपणे बसून आहेत. 
       आनंदांनी बुद्धांना सांगितले, आत्ताच एक भूकंप होऊन गेला. बुद्ध शांतपणे म्हणाले, "आनंद, तथागतांनी निश्चय केला आहे, तथागत तीन महिन्यात शरीर त्यागतील." हे ऐकताच आनंदना असे वाटू लागले की, स्वतःचे हात पाय थंडगार पडू लागले आहेत. शरीर कंपित होऊ लागले आहे. बुद्धांसमोर लोटांगण घालत ते म्हणाले, "तथागत, एवढी घाई करू नका. कृपया आपल्या शिष्यांवर दया करा." बुद्ध म्हणाले, "आनंद, जर माझ्यावर तुझी निष्ठा असेल, तर तुला लक्षात येईल की, माझे निर्णय योग्य वेळेलाच होतात. आनंद, या भागातल्या सर्व भिक्खूंना महावनातल्या कुटागार धम्मकक्षात एकत्र बोलव." 
      सात दिवसानंतर दीड हजार भिक्खू आणि भिक्खुनी कुटागार धम्मकक्षात जमले आणि बुद्धांनी त्यांच्या जीवनातील शेवटची धम्मदेशना दिली. ते म्हणाले, "माझ्या भिक्खू आणि भिक्खुंनी हो, आतापर्यंत तथागताने जी देशना दिली आहे, त्यानुसार तुम्ही सर्वांनी समजून उमजून अध्ययन केले पाहिजे. त्याला निरखले पारखले पाहिजे. साधना अभ्यास केला पाहिजे. तुम्ही त्या मार्गाचे, त्या देशनेचे स्वतः परीक्षण केले पाहिजे, की जो मार्ग आपण भावी पिढ्यांकडे सोपवणार आहोत. सद्धम्माच्या मार्गानुरूप जीवन जगा. साधना अभ्यास करून समस्त प्राणिमात्राला शांती, आनंद आणि हर्षोत्फुल्लता प्रदान करा. 
       तथागतांच्या शिकवणुकीचे सार सचेतनाचे चार चरण, चार सदप्रयास, आत्मशक्तीचे चार आधार, पाच स्कंद, पाच शक्ती, संबोधीचे सात सोपान आणि अष्टांगिक मार्ग यांची साधना करा आणि त्याची अनुभूती घेऊन इतरांपर्यंत ते पोहोचवा. 
     माझ्या भिक्खू आणि भिक्खुंनींनो, सर्व धर्म म्हणजेच सर्व वस्तू अनित्य आहेत. ते जन्मतात आणि मरतात. त्यांचा विकास होतो आणि विलय होतो. स्वमुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तथागत तीन महिन्यात शरीर त्याग करतील."
      सर्वांनी बुद्धांची देशना शांतपूर्वक ऐकली. त्यांचे हे शेवटचे दर्शन आहे, हे कळून त्यांचे मन हेलावले. दुसऱ्या दिवशी बुद्ध वैशाली नगरात भिक्षाटनास गेले. वनात येऊन शांतपणे भोजन केले. नंतर वैशाली नगरीस निरोप देऊन ते बाहेर पडले. भंडग्राम, मट्टीग्राम, अंबग्राम, जम्बुग्राम या गावातील लोकांना भेटी दिल्या. ठिकठिकाणी लोकांना देशना दिली. 
      नंतर ते पावा इथे आले. तिथे त्यांना चंड नावाच्या उपासकाने भोजनाचे आमंत्रण दिले. तिथे चंदनवृक्षाच्या फुलांपासून 'सुकर मद्दव' पदार्थ तयार करून बुद्धांना देण्यात आला. भोजन झाल्यावर बुद्ध म्हणाले, "चंड, तू शिल्लक राहिलेले भोजन जमिनीत गाडून टाक. कोणाला खायला देऊ नकोस." 
       त्या रात्री बुद्धांच्या पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या. सकाळी सकाळी त्यांनी पावा सोडले आणि ते कुशिनाराच्या दिशेने चालू लागले. वाटेत त्यांना वेदना होतच होत्या व ते अतिसाराने बेजार झाले. एके ठिकाणी त्यांनी आनंदला पिण्यासाठी पाणी मागितले. जवळच पाणी होते, परंतु ते अतिशय गढूळ होते. तरीही बुद्धांनी ते प्राशन केले. नंतर ते कुकुथ नदीच्या तीरावर पोहोचले. तेथे त्यांनी स्नान केले. जलप्राशन केले. थोडी विश्रांती घेतली. पुन्हा चालू लागले.
       त्यानंतर हिरण्यवती नदी पार करून साल वृक्षाच्या वनात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हे वन मल्ल राज्यात होते. ते कुशिनाराचे जणू प्रवेशद्वारच होते. तथागत बुद्ध त्या वनात पोहोचले, तेव्हा संध्याकाळ होत आली होती. दोन साल वृक्षांच्या मध्ये त्यांनी आसन करायला सांगितले. उत्तर दिशेला डोके करून ते पहुडले. सर्व भिक्खू त्यांच्या चारी बाजूंना बसले होते. सर्वांना कळून चुकले की, आज रात्री तथागत महानिर्वाण प्राप्त करतील. 
      साल वृक्षांकडे पहात बुद्ध म्हणाले, "आनंद, पहा अजून वसंत ऋतू यायचा आहे. परंतु हे साल वृक्ष अवेळीच फुलले आहेत. तुला दिसतं का की, या फुलांच्या पाकळ्या तथागत आणि भिक्खूंच्या चीवरावर पडत आहेत. हे वन वास्तवात किती सुंदर आहे! पश्चिमेकडे झुकणाऱ्या सूर्याची लालिमा किती सुंदर आहे! साल वृक्षांच्या फांद्यांमधून लहरणारी शीतल मंद हवा किती सुखद आहे! तथागताला हे सर्व प्रिय आणि आत्मविभोर करणारे वाटत आहे." 
       इथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, बुद्धांना स्वतःचा अंतिम क्षण जवळ आला आहे, याची पूर्णतः जाणीव झालेली होती. तरीदेखील त्यांचे मन प्रसन्न होते. आनंदी होते. निसर्गाच्या सानिध्यात सालवृक्षाखाली मंद वारा वाहत असताना फुलांची पखरण होत असताना प्रसन्न निळ्या आकाशाकडे पाहत आपल्याला मृत्यू यावा, ही एक सुंदर आणि रमणीय गोष्ट आहे, या भावनेने तथागत गौतम बुद्ध स्वतःच्या मृत्यूला सामोरे जात होते. म्हणूनच त्यांच्या मनात कसलाही शोक, कसलेही दुःख निर्माण झाले नाही. 
      यावेळी बुद्धांचा प्रिय शिष्य आनंद अतिशय दुःखी झाला होता. तो एका वृक्षाच्या मागे रडत होता. आपण अजून आध्यात्मिक लक्ष्य प्राप्त केले नाही, तोवरच गुरुदेव आपला निरोप घेत आहेत, अशी भावना त्याच्या शब्दांतून व्यक्त होत होती. तेव्हा त्याला जवळ बोलावून बुद्ध म्हणाले,"आनंद, दुःखी होऊ नकोस. तथागतांनी पुन्हा पुन्हा सांगितले की, सर्व धर्म अनित्य आहेत. विकासा बरोबर ऱ्हास आणि मिलना बरोबर ताटातूट जोडली गेली आहे. मृत्यू नसेल तर जन्म कसा संभव आहे? ऱ्हासाविना विकास कसा होईल? ताटातुटी शिवाय मिलन कसे घडेल? आनंद, तू तन मन लावून हृदयपूर्वक कित्येक वर्षांपासून माझी सेवा करत आला आहेस. मला मदत करायला तू सारी शक्ती पणाला लावत आला आहेस. त्यासाठी मी तुझा अत्यंत आभारी आहे. आनंद, तुझ्यात अनेक गुण आहेत. परंतु त्याच्याही पुढे तू जाऊ शकतोस. थोडा अजून प्रयत्न करशील, तर जन्म मृत्यूचे बंधन तू तोडू शकतोस. तू स्वमुक्ती प्राप्त करू शकतोस. मला माहीत आहे की, तू हे करण्यास सक्षम आहेस. असे झाल्यावर मला सर्वाधिक प्रसन्नता लाभेल."
       बुद्धांच्या महानिर्वाणाची गोष्ट मल्ल लोकांना कळाली, तेव्हा ते सर्व ताबडतोब तिथे आले. त्यामध्ये सुभद्र नावाचा एक संन्याशी सुद्धा होता. त्याने बुद्धांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. बुद्धांनी त्याला अनुमती दिली. सुभद्राने, आपल्या विचारानुसार कुणाला संबोधि प्राप्त झाली आहे का? हा आपल्या मनातील प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना बुद्धांनी सुभद्राला अष्टांगिक मार्गाची देशना दिली व ते म्हणाले,"सुभद्र, जिथे कुठे अष्टांगिक मार्गाची निष्ठेने साधना केली जाईल, तिथे लोकांना संबोधी प्राप्त होईल. सुभद्र, जर तुम्ही या मार्गानुसार साधना कराल, तर तुम्हाला सुद्धा संबोधी प्राप्त होईल." ते ऐकून सुभद्राचे हृदय फुलून आले. त्याने तथागतांनी प्रवज्ज्या द्यावी, अशी विनंती केली. बुद्धांनी त्याला आपला अंतिम शिष्य म्हणून स्वीकारले. तेव्हा पुन्हा एकदा तथागतांनी तेथे जमलेल्या भिक्खू संघाला विचारले की, तुमच्या मनात काही शंका असल्यास विचारा. अर्थातच कोणीही काहीही विचारले नाही. शेवटी बुद्धांनी शांतपणे भिक्खू समुदायाकडे पाहिले आणि ते उद्गारले, "भिक्खू आणि भिक्खुनी हो, तथागत आता काय म्हणतात ते ऐका. जर जन्म आहे, तर मृत्यू सुनिश्चित आहे. तो येणारच. आळस न करता उद्दिष्ट प्राप्त करा."
     बुद्धांनी आपले डोळे मिटून घेतले. त्यांनी अंतिम वचन उच्चारले होते. त्या क्षणी पृथ्वी हलली. साल वृक्षांच्या फुलांचा जणू वर्षाव झाला. प्रत्येकाला वाटले की त्याचे शरीर आणि चित्त कंपायमान होत आहे. बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले. बुद्धांनी शरीर त्यागले होते. काही भिक्खू हात पसरून जमिनीवर कोसळले आणि करूण स्वरात बोलू लागले, "बुद्ध आमच्यातून गेले. भगवानांचे निधन झाले. जगाचे डोळे बंद झाले. आता कोण आम्हाला शरणागत म्हणून घेईल. सारा काळोख दाटला आहे." तर काही भिक्खू शांतपणे बसले होते. त्यांनी आपल्या श्वसनक्रियेवर ध्यान केंद्रित केले. बुद्धांनी दिलेल्या शिकवणुकीवर लक्ष केंद्रित केले. यावेळी तेथे असलेले अनिरुद्ध सर्व भिक्खूंना म्हणाले, "बंधूंनो, असे करूण होऊन रडू नका. कृपया उठा. प्राणायाम करूया. आपण मौन धारण करूया." त्यांच्या आवाहनानुसार भिक्खू त्यांना कंठस्थ असणाऱ्या सुत्तांचे पठण करू लागले. प्रज्ञा, करुणा, सद्गुण, ध्यान साधना, समत्व भाव या सर्वांबद्दल प्रशंसा करू लागले. भन्ते आनंद यांनी बुद्धांच्या जीवनातील अनेक घटना प्रसंगांची उजळणी केली. रात्रभर सर्व उपासक या दोन मान्यवरांचे बोलणे ऐकत राहिले. हळूहळू मंगल प्रभात झाली. भिक्खूंच्या मनातील अंधार कमी होऊन 'अत्त दीप भव!' असा प्रकाश उगवू लागला. 
      सकाळी भन्ते आनंद नगरामध्ये गेले आणि त्यांनी तेथील नगर अधिकाऱ्यांना तथागतांच्या महानिर्वाणाची वार्ता दिली. सर्वांना अति दुःख झाले. त्यांनी बुद्धांच्या अंतिम संस्काराची चर्चा सुरू केली. दुपारपर्यंत सर्व कुशिनारा मध्ये बुद्धांच्या निधनाची वार्ता पसरली. अनेक लोक धाय मोकलून रडू लागले. आक्रोश करू लागले. बुद्धांचे विचार एकमेकांना सांगू लागले. गणपरिषदेच्या संकेतानुसार लोक पुष्पमाला, सुगंधित द्रव्य, संगीत वाद्य आणि कपडे घेऊन शालवनात जमू लागले. त्यांनी बुद्धांना नमन केले. हातातील पुष्प, पुष्पमाला तथागतांच्या पार्थिवावर ठेवू लागले. त्यांच्या शरीरावर सुगंधी द्रव्याचा शिडकाव करू लागले. आसपासचा परिसर रंगीबेरंगी कपड्यांनी सजवून टाकला. लोक पाचशे भिक्खूंचे भोजन घेऊन आले. थोड्याच वेळात सालवन एका महोत्सवात रूपांतरित झाले. 
      भंते अनिरुद्धनी विशाल घंटानाद केला. एकत्र जनसमुदायाला शांत केले आणि सूक्त पठण सुरू केले. सहा दिवस आणि सहा रात्री कुशिनारा व जवळच्या नगरातील लोक पुष्पांजली, सुगंधी द्रव्य अर्पण करीत राहिले. नृत्यगाण होत राहिले. दोन साल वृक्षांच्या मध्ये फुलांचे ढीगच्या ढीग लागले. सातव्या दिवशी मल्ल लोकांच्या अधिकाऱ्यांनी सुगंधी द्रव्ययुक्त पाण्याने अंघोळी केल्या. समारंभासाठी वापरतात तसे वस्त्र धारण केले. बुद्धांचे पार्थिव नगरात आणले. नगराला प्रदक्षिणा घालून ते पार्थिव मुख्य माकुत बंधन विहारात आणले गेले. 
     नगर अधिकाऱ्यांनी राजोचित संस्काराची व्यवस्था केली. बुद्धांचे पार्थिव कपड्यांच्या अनेक घड्यांमध्ये गुंडाळण्यात आले. ते एका लोखंडी पेटीत ठेवले गेले. त्या पेटीला दुसऱ्या एका पेटीत ठेवले. नंतर त्या पेटीला चितेवर ठेवण्यात आले. चंदनाच्या लाकडांची चिता रचण्यात आली. चितेला भडाग्नी देणार इतक्यात एक अश्वारोही वेगाने तिथे पोहोचला. त्याने थोडा वेळ थांबण्याची विनंती केली. भन्ते महाकाश्यप ५०० भिक्खूंना घेऊन अंतिम संस्कारात सामील होण्यासाठी पावा नगरातून येत असल्याची वार्ता दिली. दुपारपर्यंत भन्ते महाकाश्यप व पाचशे भिक्खू माकुद विहारात पोहोचले. त्यांनी अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर अग्नी दिला गेला. भन्ते अनिरुद्ध यांनी घंटानाद केला व सर्वांकडून सुत्त पठण करून घेतले. नंतर चिता थंड झाली तेव्हा सुगंधित जलाचा त्यावर शिडकावा केला गेला. पेटी उघडून तथागतांच्या शरीराच्या अस्थी आणि राख सुवर्णकलशात ठेवल्या गेल्या. बुद्ध अवशेषांचे आठ भाग करण्यात आले आणि विविध राज प्रतिनिधींना वाटण्यात आले. मगध, वैशाली,शाक्य, कोलिय, पावा आणि पेठ राज्यांचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी ते अवशेष घेऊन राजगृह, वैशाली, कपिलवस्तू, वेठदीप, कुशिनारा व पावा येथे स्तूप बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व भिक्खू आणि भिक्खूनींनी आपापल्या भागात धम्मप्रसारासाठी प्रस्थान केले.भन्ते महाकाश्यप, अनिरुद्ध आणि आनंद यांनी बुद्धांचे भिक्षापात्र वेळूवनात आणले. त्यांचीही बुद्ध बनण्याची निरंतर प्रक्रिया पुढे चालू झाली. वैशाख पौर्णिमेच्या मध्यरात्री तथागतांनी प्राणत्याग केला. तथागतांचे हे महापरिनिर्वाण इसवीसन पूर्व ४८३ मध्ये झाले. 
      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झाले. मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर त्यांना शेवटची वंदना देण्यात आली. तेव्हापासून ६ डिसेंबर हा दिवस सर्वत्र महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी लाखो अनुयायी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जमतात. तेथे पुस्तकांचे शेकडो स्टॉल मांडण्यात आलेले असतात. त्यावेळी अभिवादन करून परत येणारा प्रत्येक अनुयायी ग्रंथ खरेदी करतो. काही कोटी रुपयांची ग्रंथखरेदी करून महापरिनिर्वाण दिन संपन्न होतो. हे भारतभूमीतील एक अद्भुत आश्चर्य म्हणावे लागेल. 

संदर्भ ग्रंथ 
१. बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. बी. आर. आंबेडकर 
२. मृत्यू सुंदर आहे!? - डॉ. रवींद्र श्रावस्ती 
३. मराठी विश्वकोशातील बौद्ध धर्म ही नोंद - लेखक पु. वि. बापट

डॉ. श्यामसुंदर मिरजकर 
प्राध्यापक, मराठी विभाग 
कला व वाणिज्य महाविद्यालय, मायणी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र (लेख)