चैत्रपालवीची शोभा (ललितबंध)
चैत्रपालवीची शोभा मराठी नववर्ष म्हणजे चैत्रारंभाचा दिवस. वर्षाचा पहिलाच दिवस सणसमारंभासारखा साजरा करावा असे जनसामान्यांना वाटणे स्वाभाविकच. त्यामुळेच गुढीपाडव्याचा सण हा निसर्गाच्या सर्जनशीलतेचा, सृजनसोहळ्याचा म्हणून साजरा होत असला पाहिजे. निसर्गाच्या दृष्टीने विचार केल्यास हे दिवस चैत्रपालवीचे असतात. काही झाडं पानांत असतात, काही फुलांत, तर काही फळा ं त असतात. एकंदर हा नव्या बहराचा ऋतू असतो. शिशिर नुकताच संपला आहे आणि वसंताचे आगमन झाले आहे, असा हा कालखंड. निसर्गात घडणाऱ्या नवपरिवर्तनापासून आपली कालगणना सुरू करावी, अशी कल्पना ज्याच्या मनात सर्वप्रथम आली असेल, तो थोर पुरुषच म्हटला पाहिजे. या निसर्गात घडणाऱ्या सृजन सोहळ्यास पाहून माझ्या मनात कवितेच्या ओळी फेर धरू लागतात, नव पल्लव नव आशा बहरून ये दशदिशा पानांतून तानांतून गाण नवे अभिलाषा मधुर गंध मंद मंद गुंजारव भ्रमर छंद ...