संत त्रिलोचन भक्ती परंपरांना जोडणारा दुवा
भक्ती ही द्रविडी परंपरा असून ती दक्षिणेकडून उत्तरेकडे गेली, असे मानले जाते. दक्षिण उत्तरेच्या मध्यावर पंढरपूर अर्थात वारकरी भक्तिपरंपरा आहे. मध्ययुगातील महत्त्वाचे जागते भक्तिकेंद्र म्हणून पंढरपूर उभे राहिले आणि येथे भक्तीचा मेळा जमला. वारकरी संतांनी दक्षिण व उत्तर भारतात यात्रा केल्या. आपल्या भक्तिमार्गाचा प्रचार प्रसार केला. भक्तीचे पसायदान ठिकठिकाणी वाटले. त्यातूनच नवे संत कवी पुढे आले. संत त्रिलोचन हे त्यापैकीच एक. त्रिलोचन म्हणजे तीन डोळे असणारा. परंतु येथे त्रिलोचन म्हणजे त्रिकाल ज्ञानी! भूत, भविष्य आणि वर्तमानाचे लख्ख ज्ञान असणारा तो त्रिलोचन! संत त्रिलोचन यांचे लौकिक चरित्र उपलब्ध नाही. ते संत नामदेवांचे समकालीन होते. बाबा पूरणदास कृत 'श्री नामदेव चरित्रा'मध्ये त्रिलोचनाची कथा आलेली आहे. प्रियादासाने 'भक्तमाल' मध्ये त्यांच्यासंबंधी कथा नोंदवून त्यांना श्रेष्ठ भक्तांच्या पंगतीत बसविले आहे. श्री महिपती बुवा रचित 'संतलीलामृत' ग्रंथात सत्ताविसाव्या अध्यायात त्रिलोचन व ...