कुंडीतली माती
कुंडीतली माती सकाळच्या प्रसन्न वातावरणात फिरत असताना त्याचं लक्ष एका कुंडीतल्या रोपाकडे गेलं. तो अचंब्याने थांबला. कौतुकाने न्याहाळू लागला. दोन छानसे गुलाब फुलले होते. 'इतक्या दिवसात कधी लक्षातच आलं नाही, या रोपाचं अस्तित्व!' तो स्वतःशीच म्हणाला. इतक्यात त्या घराच्या मालकाने आवाज दिला, "काय हो काय बघताय? काय पाहिजे तुम्हाला?" आवाजात थोडा कठोरपणा होता आणि स्वामित्वाची भाषा. "काही नाही, सहजच रेंगाळलो. खूप चांगलं आहे रोप. चांगली फुलं आलीत त्याला. हेच जर जमिनीवर सुपीक मातीत असतं तर अजून फुललं असतं." तो सहजपणे उत्तरला. "काही नको. कशाला हवीत जास्तीची फुलं आणि टवटवी. जास्त वाढलं रोप तर काटेही बोचतील येता जाता. त्यापेक्षा छोटं आहे तेच बरं. घराची शोभा वाढली की पुष्कळ झालं. असं व्हायचं की झाड आमचं अन् फुलांवर डोळा शेजाऱ्यांचा. नकोच ती कटकट," मालक म्हणाला. या उत्तराने पांथस्थ हसला अन् रोपाकडे एक कटाक्ष टाकून आपल्या वाट...