पोस्ट्स

कविता लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दैनंदिनी

त्याने वर्षारंभी ठेवली तिच्या हातावर  नवीकोरी दैनंदिनी  आणि म्हणाला,  "लिहीत जा स्वतःच्या अक्षरांनी  प्रत्येक दिवसाची कहाणी!" वर्ष उलटल्यावर  उत्सुकता म्हणून  त्याने चाळली तिची रोजनिशी  अनेक पानांवर दिसला  दूध किराण्याचा हिशेब कुणाकुणाचे वाढदिवस   लाईट बिल दूध बिल रिचार्ज  कामवालीचा हिशेब  घरादाराचे आजारपण  आणि प्रिस्क्रिप्शनच्या नोंदी  प्रारंभीच्या पानांवर पसरला होता उत्साह नंतर असंख्य पाने कोरीच  मध्येच काही थेंब पडून ओघळत गेलेली अक्षरे  दोन चित्रे फुरसतीच्या वेळात काढलेली काटेरी निवडुंगाला फुललेले अस्सल फूल एकात,  क्षितिजाचा काळानिळा पडदा भेदून  वर सरसरणारी आभा दुसऱ्यात...  इतर काहीच लिहिले नव्हते त्यात  विचारलं तर म्हणाली,  "वेळच नसतो रे...!  आता नव्याने सुरू करते लिहायला   नक्की..."                    - श्यामसुंदर मिरजकर

आभाळधून (कविता)

आभाळधून  शुभ्र जराशा कोमल प्रहरी  उंच उडाले आभाळपक्षी  दर्शनमात्रे घन ओथंबून  काळजात अन् सुरेल नक्षी.  पहाटवारा फुलाफुलांतून  पेरीत गेला जाग जराशी  कुठे न विझली, शाबूत आहे  त्वचेखालती आग अधाशी.  अनघड वाटा साद अनामिक  जीव धपापे स्पंदित गंधित  स्पर्शांमधल्या जादूने अन्  शब्द थरारे, मन रोमांचित!                       - श्यामसुंदर मिरजकर

पायाखालून हळूहळू निसटत चालली भूमी (कविता)

पायाखालून हळूहळू निसटत चालली भूमी ------------------------------------------------------- श्वास सुटून चालले आहेत हातातून आणि मित्रही नुसत्याच ख्यालीखुशालीच्या गप्पा मोबाईलची रिंगटोनही धडकी भरविते उरात अभद्र बातमीच्या आशंकेने बाहेरून घरी परतल्यावर मुलं धावत येत नाहीत आताशा आठवणीने सॅनिटायझरचा स्प्रे पुढे करतात बिलगत नाहीत आनंदाने की कुशीत विसावतही नाहीत चुकून गेलोच मित्राच्या घरी तर मन कावरेबावरे ऐसपैस रेलून बसता येत नाही की मनसोक्त गप्पांची मैफल रंगत नाही बसून राहतो अंग चोरून पटकन निघण्याच्या तयारीत चहापाणी नाकारून भिववितात रात्रंदिवस वाजणारे ऍम्ब्युलन्सच्या सायरनचे स्वर आलेच कोणी बाहेरून तर आतल्या खोलीत जायला सांगतो आई-वडिलांना दारकोंडी करत कित्येक दिवस झाले मरणाऱ्यांना घरातूनच वाहतो आहे श्रद्धांजली चुटपुटतो जीव सांत्वनाचे शब्द घशातच अडकतात हुंदकाच पडतो बाहेर अन् डोळे पावसाळतात सारख्या सारख्या सूचना जपून राहा, काळजी घ्या, हे करा, ते करा इतरांना आणि स्वतःलाही पायाखालून हळूहळू निसटत चालली भूमी अंदाज चुकत आहेत सगळेच व्यवहाराचे, आमदनीचे घरं, दुकानं, शाळा,...

शाळेच्या परिसरातच सापडताहेत फुगे (कविता)

इमेज
*शाळेच्या परिसरातच सापडताहेत फुगे* शाळा आता आतील रंगरूपासह बदलत आहे मूल्यांना धरून ठेवणाऱ्या आउटडेटेड म्हातार्‍यांना काढायचंय भंगारात  "मास्तर करतीलच की पास  गरज कोणालाय? आमाला का त्यान्ला?"  नव्या राजकुमारांचे बेफिकीर प्रश्न.  वेगळ्याच चिंता सतावत आहेत विद्यार्थ्यांना  गळणारे/रंग बदलणारे केस, मुरमं, त्वचेचा पोत फिगर, इम्प्रेशन आणि पर्सनॅलिटीच्या.  अभ्यासात लक्षच लागत नाही त्यांचं  की लाज वाटत नाही थोडीही  स्वतःला न येणाऱ्या गोष्टींविषयी  कॉपी-पेस्टच्या आधारानं पोरं प्रोजेक्ट बनवताहेत समृद्ध जीवनाचा.  फर्निचरच्या आतून वाळवी पोखरत नेते आख्खं घर  तशी सडवलीय ही व्यवस्था अभद्र विचारांनी.  एज्युकेशन इंडस्ट्रीतल्या शिक्षणसम्राटांनी  सुरू केली आहे नागवणूक गुरुदेव कार्यकर्त्यांचीच अन्  भुकटीत मिसळलेले पाणी दूध समजून पिताहेत अश्वत्थामे.  प्रपोज कार्ड देऊन पोरं करताहेत विचारणा प्रेमाची पोरी धडाधड उतरताहेत "आय एम यंगेज!" किंवा  हातावर मिरवत आहेत अनेक 'फ्रेंडशिप बँड'. आता मुलींनाही मोबाईलवर हव्या आहेत 'तसल्य...

शेवटचा श्वास असेपर्यंत... (कविता)

इमेज
शेवटचा श्वास असेपर्यंत...  कुठून कसा प्रवेश करतो व्हायरस शरीरात...मनात...मेंदूत... कळत नाही पण गती रोखून धरतो जगण्याची अचानक समोर असणाऱ्या सप्तरंगी दृश्यात कुणीतरी काळा रंग भरून टाकावा गडद तसे होते काळजाची स्पंदने, हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा मोठेच वाटू लागतात नजरेसमोर तरळतात प्रिय प्रिय चेहरे वाटते, या प्रियजनांना आता मी कुठे आणि कसा भेटणार की वेळ आली आहे निरोप घेण्याची...? राहून गेल्या आहेत बऱ्याच गोष्टी करायच्या एकत्र अनेकांचं कर्ज आहे माझ्या नावावर तेही फेडायच ं य जसं जमेल तसं प्रामाणिकपणे अजून खूप सारं जगणंच जगायचं आहे इतक्यातच काळोखाने काळ होऊन दात विचकून कसे चालेल...! दूरवरून ऍम्ब्युलन्सच्या सायरनचे स्वर ऐकू येतात रात्री-अपरात्री मी धडपडत जागा होतो जीव दपडतो... श्वास गुदमरत राहतो रक्तातून...प्राणातून मी जिवाच्या आकांताने हात पुढे करतो मदतीसाठी लांबूनच माझ्यावर लक्ष ठेवून असणारा डॉक्टर मित्र सतत बजावत राहतो आहे... मी आहे... घाबरू नकोस आणि सोडत राहतो माझ्या धमनीत संजीवनी सलाईन खूप दुरून कुठून कुठून येत आहेत संदेश आपुलकीचे...मायेने ओथंबलेले कानावर पड...

न संपलेला माणूस (कविता)

 न संपलेला माणूस                 -१- बातमी शहरभर धुक्यासारखी पसरली डॉक्टर गेले कुणीतरी गोळ्या झाडल्या त्यांच्यावर. सर्वत्र सन्नाटा मग कुजबुज.....चर्चा. ज्योती म्हणाली, "आज रक्षाबंधन नाही. गेलं पाहिजे मला साताऱ्याला कार्यकर्त्यांसोबत. " एक उत्तेजित गृहस्थ म्हणाले, ''सारखी सारखी टीका करायची आमच्या धर्मावर किती सहन करायचं? पापाचा घडा भरला होता त्यांचा मुक्ती मिळेल त्यांना धर्मरक्षकाच्या हातून मृत्यू म्हणजे बाकीच्यांनी शहाणं व्हावं आता.'' कार्यकर्ते जमून होते एकत्र राख पांघरून धुमसत होते आतल्या आत.                               -२- तीन छोट्या मुली खेळत होत्या मध्येच एक म्हणाली, ''डॉक्टर मेले.....म्हणजे मारले त्यांना कुणीतरी म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यांना मरायचं नव्हतं, तरी ते मेले त्यांच्या अनेक इच्छा बाकी असतीलच ना! मग ते आता भूत होतील की ...

एक सेल्फी मित्रासोबत (कविता)

 एक सेल्फी मित्रासोबत वाट्याचं चतकोर आयुष्य मुठीत घट्ट पकडून चालते तेव्हाही गरज असते सोबतीची मी झाडांशी बोलते पाखरांशी गाते कोकरांच्या कानात गुपित सांगते मला आवडतात रंग हिरवे पिवळे गुलाबी निळे सावळे मोरपंखी आवडतात रंगात रंगणारी माणसंही एक लालबुंद ठिपका कधीकाळी गोंदवलाय कपाळावर नकळत्या वयात.....कौतुकाने आता तो विस्तारत पसरलाय सर्वत्र सीमारेषा बनून सीतेच्या अग्निदिव्यात अन् सती सावित्रीच्या त्यागात मला दिसताहेत  अलवानी छटा हिरवे पिवळे मनभावन रंग पार हद्दपार फार फार वर्षांपूर्वी आटपाट नगराच्या काळापासून त्यांनी बसवलेत सीसीटीव्ही कॅमेरे सर्वत्र मला परिघाबाहेर पाय टाकता येत नाही तरीही एक नटखट फुलपाखरू रुंजी घालतंय सभोवती बसतंय हळूच मधुवंती खांद्यावर या माझ्या मित्रासोबत पंखाशी थोडं रेलून काढायचाय सेल्फी कधीपासून पण... व्हायरल होण्याच्या भीतीने बटन क्लिक होत नाही अजून...                           -  श्यामसुंदर मिरजकर

वडसत्यवान

वडसत्यवान     मला हवा आहे वडसत्यवान  'पत्नीव्रता' व्रत धरणारा  मी सावित्री नव्या युगाची!   बाबांनी दिली अस्त्रे जीवनसंघर्षाची  आईने, संस्कार संसाराचे दुचाकीवर स्वार होणारी आणि त्याहून अधिक वेगवान संगणकावर  हुकूमत गाजवणारी मी  कर्ती करवती  कधी चुकून  कधी समजून उमजून  स्वीकारते राज्यभ्रष्ट, हतप्रभ अल्पायुषी सत्यवानाला  ठरवून मनाशी काही ठोकताळे मोठ्या हिमतीने घेते ताब्यात संसाररथाची सूत्रे  आधार देत घेत नेते यशोरेषेपार रथ  गतवैभव परत मिळविण्यासाठी मिळवून देते नवे राज्य सासू-सासऱ्यांना दृष्टी  परत आणते यमराजाच्या कडून प्राण, मान  मग पुन्हा मीच  का म्हणून व्रत धरावे सत्यवानासाठी? मातीचे घोडे बनविणाऱ्या जंगलातून कंदमुळे गोळा करून जगणाऱ्या सत्यवानाला  प्राण आणि राज्यही का म्हणून मिळवून द्यावे ? त्याला हवेच असेल गतवैभव तर किमान त्याला बनू द्या वडसत्यवान पत्नीव्रता!  सात जन्माचा घाट्यातला सौदा साफ नामंजूर !! मी सावित्री नव्या युगाची!!!                  ...

भावमुद्रा (कविता)

🦋🦋🦋 मी टिपल्या माझ्याच असंख्य भावमुद्रा जतन केल्या मोबाईल मधल्या गॅलरीत उत्साहाने दाखविल्या इतरांना अन्  स्वतःच पुनःपुन्हा पाहून खूश झाले  मी जपू पाहते एक अल्लड मुलगी  मला हसायचं आहे  टिकवायचाय उत्साह निरंतर नको असणारी अनेक 'चित्रं' आजूबाजूला मी डिलीट करते अनावश्यक बॅकग्राऊंड मी मलाच पाहते -दाखवते- जपते  वाऱ्याशी खेळणाऱ्या केसांची सैलसर बांधणी ओठातून डोकावणारी शुभ्र दंतपंक्ती  एक आपुलकीचं हसू  मुठीवर  रेललेली  कलती मान स्वतःचा शोध घेणारे डोळे...   कृपया  असं समजू नका  हलकासा मेक-अप करून  खोटं खोटं हसणारी एक फोटोजेनिक मॉडेल  खरे तर अजूनही खूप चित्रं आहेत माझीच असंख्य मूड मधली घरकामातली,  राबणारी चिंता वैताग टेन्शन आणि इतरही काहीबाही  त्याचंही एक सौंदर्य आहेच  जाणत्या समंजस डोळ्यांशिवाय ती कशी रुचतील?  मग कशाला त्याचे प्रदर्शन?  मी खूप काही आहे या डीपीच्या चित्राच्या पलीकडे...  मला इतकंच कळतं माझ्या अस्तित्वाचा दरवळ असतोच इथेतिथे  असतात तरंग हर्ष-खेदाचे  जे फोटोत पकडता येत...