पोस्ट्स

काव्यविमर्ष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कागदावर न लिहिलेल्या कविता

इमेज
* कागदावर न लिहिलेल्या कविता * "काढून ठेवा तुमचा पेन. तुरुंगात त्याचा काहीही उपयोग नाही. सुटलाच कधी तर देऊ परत किंवा तुमच्या कुटुंबीयांना देऊ, तुमच्या नंतर",  तुरुंगाधिकार्‍यानं सांगितलं.  तुरुंगात कवीने पेन वापरलाच नाही; कविता मात्र लिहिल्या- बुचाच्या फुलांच्या देठांनी.  भटारखान्याजवळच्या बुचाला खूप फुलं यायची. सगळ्या कैद्यांनी कंठस्थ केल्या त्या कागदांवर न लिहिलेल्या,  पेनाने न लिहिलेल्या कविता. कधी कधी शिपाई आणि क्वचितच पण तुरुंगाधिकारीही गुणगुणायचे त्या कविता  प्रेयसीला लिहिल्यासारख्या भासणार्‍या पण स्वातंत्र्यदेवतेसाठी लिहिलेल्या कविता.  एक दिवस, एक कैदी सुटला, तुरुंगाबाहेर पडला  आणि त्याच्यासोबतच बाहेर पडल्या त्या कविता.  हवेत अत्तर मिसळून जावे तशा मिसळून गेल्या कविता.  ढगांचा टिपूसही नसलेले आभाळ झाल्या कविता.  समुद्राच्या ओढीने धावत निघालेल्या नद्या झाल्या कविता.  दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा काळोख झाल्या कविता.  दऱ्या-खोऱ्यांतून निनादणारे गाणे झाल्या कविता.  इतकी वर्षे उलटून गेलीत पण अजूनही आपण गातच आहो...