चैत्रपालवीची शोभा (ललितबंध)
चैत्रपालवीची शोभा
मराठी नववर्ष म्हणजे चैत्रारंभाचा दिवस. वर्षाचा पहिलाच दिवस सणसमारंभासारखा साजरा करावा असे जनसामान्यांना वाटणे स्वाभाविकच. त्यामुळेच गुढीपाडव्याचा सण हा निसर्गाच्या सर्जनशीलतेचा, सृजनसोहळ्याचा म्हणून साजरा होत असला पाहिजे. निसर्गाच्या दृष्टीने विचार केल्यास हे दिवस चैत्रपालवीचे असतात. काही झाडं पानांत असतात, काही फुलांत, तर काही फळांत असतात. एकंदर हा नव्या बहराचा ऋतू असतो. शिशिर नुकताच संपला आहे आणि वसंताचे आगमन झाले आहे, असा हा कालखंड. निसर्गात घडणाऱ्या नवपरिवर्तनापासून आपली कालगणना सुरू करावी, अशी कल्पना ज्याच्या मनात सर्वप्रथम आली असेल, तो थोर पुरुषच म्हटला पाहिजे. या निसर्गात घडणाऱ्या सृजन सोहळ्यास पाहून माझ्या मनात कवितेच्या ओळी फेर धरू लागतात,
नव पल्लव नव आशा
बहरून ये दशदिशा
पानांतून तानांतून
गाण नवे अभिलाषा
मधुर गंध मंद मंद
गुंजारव भ्रमर छंद
बहरती फुले फळे
कोकीळ आनंदकंद
फुलारल्या तरुवेली
रंगगंधी माखल्या
फळभारी तरुशाखा
नम्र नम्र वाकल्या
रंगगंधाचा सोहळा साजरा करत नववर्षाचे आगमन झालेले असते. आंब्याचा मोहर सरलेला असतो आणि हा वृक्षराज फळांनी लगडलेला असतो. कच्च्या कैऱ्या मिठाबरोबर खाण्याची पोरासोरांची चैन चाललेली असते. करवंदीच्या जाळीतून हिरवी इटुकली फळे लदबदलेली असतात. कधी चटणीसाठी, कधी मिश्र लोणच्यासाठी हात ओरबाडत, काटे चुकवत ती गोळा केली जातात. कुठे काजूच्या झाडावर पिवळसर केशरी फळ पक्व होत असते. पक्षांनी उष्टावलेले असते आणि घसा धरणार, खवखवणार हे माहीत असूनही मीठ लावून काजू खायचा शौक मुले पूर्ण करत असतात. याच दिवसात आंबट चिंचा गाभूळलेल्या सापडतात. चिंचेच्या गाठी गाठीच्या झाडावर चढून खिसे भरणारी मुले-मुली इतरांसाठी हिरो ठरत असतात. गोरिंग चिंचेच्या काटेरी झाडांवर गोडसर चिंचा भरू लागतात. काट्यांचे ओरखडे चुकवत या चिंचा लांबवण्याच्या पराक्रमात काही वीर उन्हातान्हात हिंडत असतात. कधी देशी बोरांच्या काटेरी झाडाला गोलसर फळे आधी हिरवी, मग पोपटी, मग तपकिरी असा रंग पालटत असतात. पोरींचा जीव या इटुकल्या बोरांमध्ये गुंतलेला असतो.
याच चैत्रात पिंपळाला सुकुमार कोवळी पालवी येते. आधी तांबुस-गुलाबी, मग क्रमाने पोपटी, गर्द हिरवी वस्त्रे धारण करत पिंपळ सळसळत राहतो. कडुनिंबाने नवा तजेला धारण केलेला असतो. तो मोहरतो. अनेक कीटकांना, पक्ष्यांना आमंत्रित करतो. भल्या सकाळी किंवा सरत्या संध्याकाळी रस्त्याकडेला दुतर्फा उभ्या लिंबाच्या सावलीतून जाताना त्याचा मदधुंद गंध वेड लावतो. त्याचा औषधी, रोगप्रतिकारक, कीटकनाशक असण्याचा गुण त्या झाडाला हानिकारकच ठरतो. कारण गुढीपाडव्यापासून धान्य वाळवणापर्यंत अनेक वेळेला या लिंबाचा पाला खुडला जातो. अंघोळीसाठी, दात घासण्यासाठी, इतकेच नव्हे तर कामदेवास शांतवण्यासाठी हा लिंबच मदतीला धावून येतो.
चैत्राची खरी श्रीमंती दर्शवतात ते दोनच वृक्ष! एक म्हणजे गुलमोहर आणि दुसरा बहावा. कमीत कमी पाने आणि जास्तीत जास्त फुलांनी बहरलेला गुलमोहर अनेक दाहक अनुभवातूनही फुलणाऱ्या प्रेमाचा प्रतीक ठरतो. त्यामुळे गुलमोहराच्या झाडाजवळ किंवा त्याच्या पायाखाली अच्छादलेल्या पाकळ्यांत फोटो काढण्याचा मोह झाला नाही, तरच नवल!
दुसरा बहावा म्हणजे नजाकतीने फुललेल्या सौम्य पिवळ्या फुलांची झुंबरेच! बघणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटावे असे सौंदर्य! पानांचा हिरवट पोपटी रंग, खोड टणक आणि पिवळसर पांढरे. या फुलांच्या घोसाभोवती पंखांवर पिवळे ठिपके असणारे काळे टपोरे भुंगे अखंड गुंजारव करतात. फुलपाखरे पानामागे अंडी चिकटवण्याची लगबग करतात. काळे मुंगळे झाडांवर लगबगीने जात येत राहतात. तशातच सरड्यांचा झाडांवरचा वावर वाढतो. सरड्यांच्या मागावर असणारा भार्गवराम म्हणजेच भारद्वाज हा पक्षी झाडावर अधून-मधून दिसू लागतो. येणाऱ्या जाणाऱ्यांना वेड लावणारे, स्पर्श सुखाची आस लावणारे हे झाड तसे विरळच.
याच काळात पारिजातक, मोगरा, चाफा, सोनचाफा फुलून येतात. गंधाळतात. पाखरांची ऊठबस सुरू होते. जोडीदाराची निवड, घरट्यासाठी योग्य जागेचा शोध, रंगमहाल बांधण्याची लगबग सुरू होते. कोकीळ उंच झाडावर बसून तानांवर ताना देत राहतो. मुलं तशीच सुरावट काढतात आणि कोणी तरी स्पर्धक आला असे वाटून मूळचा कोकीळ अधिक दीर्घ आकर्षक स्वरलहरी निर्माण करतो. हे कोकीळगाण म्हणजे उद्याच्या समृद्ध पर्यावरणाची पहिली जाणीव असते. वसंताच्या आगमनाची सानंद ललकारी तो देतो. पानाफुलांचा, फळा पक्षांचा चैत्र गावोगावच्या जत्रा यात्रांचे आमंत्रण देत आपल्या दारात सुहास्यवदनाने आलेला असतो. नव्या वस्त्रांनी, डाळ लिंबाच्या, गुळ खोबऱ्याच्या प्रसादाने आणि पुरणपोळीने या चैत्रातील वसंत उत्सवाचे स्वागत झालेले असते. परंतु या अद्भुत निसर्ग सौंदर्याची जाणीव मोबाईलच्या भुलभुलैयात गुंतलेल्या अनेकांना होतच नाही. त्यासाठी पंचेंद्रिये खुली ठेवून भल्या सकाळी निसर्गाच्या रंगाची, गंधाची, स्पर्शाची, स्वादाची आणि पाखरांच्या आनंदगाणाची अनुभूती घ्यावी लागेल. आपण कराल ना हे?
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
कला, वाणिज्य महाविद्यालय, मायणी.
सर ,
उत्तर द्याहटवाकाजू आणि आंबट चिंचेचा हंगाम वेगवेगळा असतो तेवढा दुरुस्त व्हावा . बाकी लेख सुंदर जमला आहे .
हो सर. चिंचा लवकर येतात. लवकर पिकतात. चैत्रात म्हणजे एप्रिल-मे मध्ये गाभूळलेल्या चिंचा सहसा सापडत नाहीत. त्या पक्व झालेल्या सापडतात. मात्र काजू पिकू लागलेले सापडतात. मी मामाच्या शेतात अनेक वेळा झाडावर चढून तिथेच बसून काजू फळे खाल्ली आहेत.
हटवानिसर्ग चक्राचे अचूक शब्दात वर्णन, मनाला भावलं. प्रत्येक ऋतू अनुभवतोय असा भास झाला. प्रत्येक फळ चाखून झाली. गावाशी तुटलेली नाळ प्रकर्षाने जाणवली.
उत्तर द्याहटवादिवाळी निमित्ताने मेजवानी खूपच आवडली. अशी शब्दरूपी मेजवानी वारंवार मिळावी.
अप्रतिम...
उत्तर द्याहटवाखूप छान निरीक्षणे, चैत्रात सगळ्या सृष्टीचा नूर पालटून जातो...तो अनुभव दरवेळी घेताना अलौकिक आनंद वाटत असतो. खूप छान लिहिलंय.
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय .छोट्या छोट्या गोष्टींच्या टिप्पण्या छान आहेत.
उत्तर द्याहटवाओघवत्या, सहजसुंदर शैलीत मांडलेली चैत्रपालवीची शोभा मनाला स्पर्शून गेली.
उत्तर द्याहटवानिसर्गातील बदलांचे सौंदर्यपूर्ण जाणीवेतून केलेले हे वर्णन मनाला स्पर्शून जाते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या या लेखाने वाचक पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतो. सुरेख लेख !
उत्तर द्याहटवासर, नितांत सुंदर लेखन !
उत्तर द्याहटवारंगांच्या माध्यमातून मोहक सांजवेळ येते, मंतरलेले दिवस घर करून राहतात....
उत्तर द्याहटवागुलमोहर ठीक आहे, पण हे झाड परदेशी आहे.
उत्तर द्याहटवाना त्यावर पक्षी घरटी बांधतात ना त्यावर जास्त वेळ बसतात, बाकी ललितबंध उत्तम जमलाय...!
छान शैली.. साने गुरुजी वा दुर्गा भागवतांनी असं निसर्गवर्णन केलं आहे.
उत्तर द्याहटवासर, तुमच्या प्रतिभाशक्तिला सलाम 🙏
उत्तर द्याहटवानितांत सुंदर लेखन
उत्तर द्याहटवानिसर्ग वर्णन तर अप्रतिमच
छानच
सर,अप्रतिम ललितबंध. निसर्गात जाणवणाऱ्या बदलांचे वेचक,मनमोहक शब्दवण॔न .
उत्तर द्याहटवामला एकनाथ व तुमच्यासारखे लेखक मित्र मिळाले हे माझं भाग्य. आपल्या शब्दात एवढं सामर्थ्य आहे की प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात असल्याचे भासते
उत्तर द्याहटवाआस्वादक समीक्षेचा उत्कृष्ट नमुना आहे
हटवाअप्रतिम चित्रमय शैली हे या ललित बंधाचे वैशिष्ट्य आहे.वाचकाला ,वाचता वाचता निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती यावी असे प्रत्ययकारी सुरेख वर्णन..
उत्तर द्याहटवामराठी नववर्ष गुढीपाडव्यापासून चालू होत.त्यात झाडांना नवी पाने फुलतात . अन् फूला पानाना पाहून माणसाला व सर्वानाच चांगल वाटतंय. एवढेच नव्हे तर त्यात एक विलक्षण वातावरण पण होत . या सर्वाच दर्शन आपणास पुनः"चैत्रपालवीची शोभा" या आलेख मध्ये होत आहे.मला वाटतंय कि आता पान फूल आहे पण. ते विलक्षण आनंद कुठ तरी निघून गेल्यावानी वाटतय.
उत्तर द्याहटवाअप्रतिम!!खूपच छान!! "चैत्र पालवी, मनाला भावली"
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर आणि छान मांडणी झाली आहे सगळ्यात महत्त्वाचे भाषा अतिशय सोपी आणि शुद्ध आहे मला एवढेच म्हणायचे आहे की यामधे काही संदर्भ चुकीचे आलेले आहेत चिंचा अगोदरच पिकलेल्याअसतात त्यामुळे चिंचा गाभुळेल्या नसतात हा संदर्भ त्यामध्ये येऊ नये दुसरे ऋतुचक्र नावाचं पुस्तक आहे ते दुर्गाताई भागवत यांनी लिहिलेले आहे आणि ते पुस्तक वाचून हा लेख आणखी सुंदर करता येईल बाकी खूपच छान.
उत्तर द्याहटवादुरुस्ती करू सर! धन्यवाद।
हटवाशब्द सौंदर्यामुळे खूप अप्रतिम वाटतो हा लेख
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट शब्द सौन्दर्य.
उत्तर द्याहटवा