माय (कविता)

माय

माय कशी माय कशी
जसा खळाळता झरा
वासराला चाटताना
जशा सुटलेल्या धारा

माय कशी माय कशी
जसे भरले आभाळ
तिच्या पापण्यांची कूस
त्यात खेळतो ग बाळ

माय कशी माय कशी
जसे दरवळे फूल
तिची साद ऐकताच
रडे आवरेल मूल

माय कशी माय कशी
जसा तेवे नंदादीप
वीज वादळात म्हणे, 
लेका माणूसकी जप! 

माय कशी माय कशी
सात रांजण भरले
दुःख कोंडले तळाशी
सुख साऱ्याला वाटले

माय कशी माय कशी
जसे चंदन झिजावे
तिच्या पदराखालती
अवघे विश्व बाळ व्हावे

           - श्यामसुंदर मिरजकर

टिप्पण्या

  1. सुरेख... शेवट छान. जसा असायला हवा तसा...

    उत्तर द्याहटवा
  2. आईचे फारच वास्तव चित्रण मांडले आहे. मस्त

    उत्तर द्याहटवा
  3. कवितेत आईसंबंधी सुंदर विचार आहेत.अभिनंदन.
    १.तिची ऐकताच साद अशी दुरुस्ती
    २.रडे आवरेल मूल ऐवजी
    उदा.ऊरी बिलगेल मूल
    ३.अष्टाक्षरी चारोळी आहे.शेवटच्या अोळीतही ८ अक्षरसंख्या असावी.
    उदा.सारे विश्व बाळ व्हावे
    (अवघे-सारे)

    उत्तर द्याहटवा
  4. कविता अतिशय सुंदर आहे खूप खूप अर्थपूर्ण आहे.आशाच कविता पुढील काळात तयार व्हायला हवी.ही शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  5. मुळात आई शब्दांत व्यक्त करणे प्रतिभावान व्यक्तिमत्वाची खासियत !

    उत्तर द्याहटवा
  6. अतिशय सुंदर शब्दांत मांडणी केलेली आहे सर.

    उत्तर द्याहटवा
  7. छान, आई वर अनेक कविता आहेत तरीही ही वेगळीच वाटतेय.

    उत्तर द्याहटवा
  8. लोकगीताची लय अचूक पकडली आहे. सुरेख...

    उत्तर द्याहटवा
  9. वा..आईच्या अस्तित्वाचा सुंदर आलेख.तिची कर्तव्यशीलता मोजता येत नाही.

    उत्तर द्याहटवा
  10. माय मायेचा पाझर
    माय भरली घागर
    माय देहान नसली
    तरी तिचा सर्वांगा वावर

    ✍️उषा सचिन खोपडे, महाड

    सर आपल्या लेखणीतील धार अंत :करणाला चिरते

    उत्तर द्याहटवा
  11. खूप सुंदर कविता .सगळ्याच प्रतिमा योग्य व सुंदर .
    आई म्हणजे दैवतच.
    किती शब्दांत वर्णावे तिचे गुण?
    अपुरे पडते शब्दभांडार.

    उत्तर द्याहटवा
  12. प्रत्युत्तरे
    1. मित्रवर्य, डॉ.श्यामसुंदर मिरजकर आपण सृजनशील कवी आहात याची प्रचिती आपण एकत्र शिकत असतानाच आलेली होती.आईचा महिमा सांगणारी आपली कविता काळजाचा ठाव घेणारी आहे.

      हटवा
  13. अप्रतिम पहिले कडव्यापासूनच कविता लय पकडते

    उत्तर द्याहटवा
  14. माय कशी माय कशी
    किती सांगावी थोरवी.
    जिथे दिसे मज माय
    तीच माझी ग पंढरी
    खूप सुंदर वर्णन

    उत्तर द्याहटवा
  15. माय कशी माय कशी
    किती सांगावी थोरवी.
    जिथे दिसे मज माय
    तीच माझी ग पंढरी
    खूप सुंदर वर्णन
    खूप सुंदर कविता सर.
    💐💐💐💐
    आराधना गुरव vaduj

    उत्तर द्याहटवा
  16. प्रा श्यामसुंदर मिरजकर यांनी लिहलेली माय ही कविता प्रत्येकाच्या मनात दडून असलेल्या आईविषयीच्या भावनांना प्रतिबिंबित करणारी आहे मराठी मध्ये अनेक कवींनी आई या विषयावर अनेक कविता लिहिल्या आहेत तथापि मिरजकर यांनी लिहिलेली माय ही कविता मानवी मनाचा ठाव घेऊन आईविषयीच्या भावनांमध्ये गुंतवणारी कविता आहे त्यांनी यापूर्वी आई या विषयावर एक पुस्तकही लिहिले आहे एक संवेदनशील कवी असून त्यांच्या या कवितेचा मराठी साहित्याला आणि रसिकांना विचार करावाच लागेल किंबहुना प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय ती राहणार नाही

    उत्तर द्याहटवा
  17. सर,
    देवाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आईचंच रूप घेतलं आणि तो घराघरात पोहोचला.
    आईची महती अगदी यथायोग्य पद्धतीने आपण या काव्यबंधनात बांधण्याचा आणि मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र (लेख)