बीती ना बिताई रैना...
बीती ना बिताई रैना...
वेदना हे जीवनाचे अभिन्न अंग आहे. ज्या पद्धतीने जगावे असे वाटते, तसे जीवन वाट्याला येईल याची कोणतीच शाश्वती नसते. विशेषतः अगदी हृदयाजवळ असणारी प्रिय माणसे नेहमीच सोबत हवी असतात, परंतु काळ कठोर असतो. तो कधी कोणाला कोणत्या पद्धतीने आपल्यापासून दूर करेल, हे सांगता येत नाही. मग अशा दुरावलेल्या प्रियजनांच्या आठवणी शिल्लक राहतात. विरहाची कधीच न विझणारी वेदना अंत:करणात जळत राहते. आपले प्रिय म्हणजे जणू आपले प्राणच! हे प्राण निघून गेल्यानंतर उरते ते फक्त शरीर. या विरहकाळात दिवस कसाबसा निघून जातो, परंतु रात्र अधिक अंधारी होते. भिवविते. निराशेच्या खोल गर्तेत घेऊन जाऊ पाहते.
गुलजारजींनी 'परिचय'(१९७३) चित्रपटासाठी लिहिलेले प्रस्तुत गाणे म्हणजे वेदनेचा कातर करून सोडणारा स्वर आहे. शास्त्रीय संगीतात रममाण झालेला जमीनदाराचा मुलगा नीलेश (संजीव कुमार) आपला छंद हट्टाने जोपासतो. त्यासाठी त्याला वडिलांची हवेली सोडावी लागते. तो संगीत शिकतो आणि अकस्मात संगीतगुरूच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीशी (विणा) लग्न करतो. जमीनदार बाप त्यांना स्वीकारत नाही. मोठ्या हिमतीने मुलगा संसार करतो. सोळा वर्षांचा काळ उलटतो. पाच मुले होतात. दरम्यान नीलेशची पत्नी लवकर मरते. गंभीर आजारपणाने घेरलेला नीलेश एक एक दिवस पत्नीच्या विरहवेदनेत ढकलत राहतो. त्याने आपली मुलगी रमा (जया भादुरी) हिलाही शास्त्रीय संगीत शिकवलेले असते. तीच अत्यंत अार्त व्याकूळ स्वरात हे गाणे गात राहते. अर्थातच लताजींचा वेदनेने ओथंबलेला कातर स्वर आपल्याला ऐकू येऊ लागतो. नंतर भूपिंदरच्या गंभीर स्वरातून दुःखाची खोली व्यक्त होत राहते. आपलाच जीव पिळवटून जातो.
'परिचय' चित्रपट आठवला की सगळ्यात पहिल्यांदा आठवते सतार. दिग्दर्शकाने सतार वादनाच्या अत्यंत मधुर सुरावटी संपूर्ण चित्रपटात गाभ्यासारख्या वापरल्या आहेत. गाणे सुरू होते तेव्हा खिडकीच्या शेजारी बसलेली रमा स्वर लावते आहे. त्याचवेळी कॅमेरा भिंतीवरील वीणाच्या तसबीरीवर जातो. म्हणजेच ती आपल्या आईचा भाव व्यक्त करते आहे. गाण्याच्या माध्यमातून आईच्या आठवणी जागवते आहे.
लता :
बीती ना बिताई रैना, बिरहा की जाई रैना
भीगी हुई अँखियों ने लाख बुझाई रैना
रात्र गेली, पण जशी जायला हवी होती, तशी ती घालवता आलेली नाही. ही रात्र म्हणजे विरहाची जन्मदात्रीच आहे. अशा असंख्य विरहपूर्ण रात्री डोळ्यातील आसवांनी विझवून टाकलेल्या आहेत.
बीती हुयी बतियाँ कोई दोहराए
भूले हुए नामों से कोई तो बुलाये
भूपिंदर :
चाँद की बिंदी वाली, बिंदीवाली रतिया
जागी हुयी अँखियों में रात ना आयी रैना
या रात्रीच्या कातर वेळी कोणीतरी जुन्या गप्पांना पुन्हा स्पर्श करावा. विसरून गेलेल्या प्रेमळ नावांनी साद घालावी. चंद्ररुपी बिंदी कपाळावर लावलेली ही रात्र आहे. अशा वेळी जाग्या असलेल्या डोळ्यांत रात्र म्हणजे झोप येत नाही आणि रैना म्हणजे रात्रीचे मधुरभावही येत नाहीत.
भूपिंदर :
युग आते हैं, और युग जाए
छोटी छोटी यादों के पल नहीं जाए
दिवस, महिने, वर्षे येतात जातात, परंतु छोट्या छोट्या गोष्टींच्या आठवणींचे क्षण नष्ट होत नाहीत. ते मनाच्या गाभाऱ्यात जिवंतच असतात. अशावेळी ही विरहाची रात्र खोट्या ठरलेल्या अपेक्षेमुळे अधिकच काळी वाटू लागते. मग रुसलेले डोळे या रात्रीची लाख मनधरणी करू लागतात.
लता :
झूठ से काली लागे, लागे काली रतिया
रूठी हुयी अँखियों ने, लाख मनाई रैना
भूतकाळातील आठवणीत हरवलेला संजीवकुमार आपल्या समर्थ अभिनयाने मनाचा ठाव घेतो. आईच्या मृत्यूचे दुःख आणि वडिलांचे आजारपण यांनी दबून गेलेली रमा ही व्यक्तिरेखा जया भादुरी आपल्या अभिनयाने साक्षात जिवंत करते. बाप आणि लेक अशा दोघांच्याही मनात विरह वेदना आहे. पण तिचा पोत वेगळा आहे. तो अभिनयातून प्रवाहित होतो. खिडकीतून बाहेर जाणवणारी झाडांच्या पानांची सळसळ घरात नाही. केवळ दुःखाने व्यापून टाकलेला अवकाश सर्वत्र दिसत राहतो. गाण्याच्या चित्रिकरणा दरम्यान सेटवर इतकी व्याकूळता निर्माण झाली की संजीवकुमारच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, अशी आठवण जया भादुरीने एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. गाण्याबद्दल लता मंगेशकर यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राहुल देव बर्मन यांनी यमन आणि खमाज़ रागांच्या मिलाफातून बांधलेले हे गाणे पिढ्यान पिढ्या लोकप्रिय ठरले. सतार आणि तबल्याचा इतका सुंदर मेळ विरळाच. राहुल देव बर्मन म्हणजे पाश्चात्य संगीत हे समीकरण पुसले गेले. या गाण्याने अनेकांच्या मनातील भूतकालीन आठवणी जागवल्या. मन कातर झाले. डोळे पाणावले. दि साऊँड ऑफ़ म्युज़िक या इंग्रजी चित्रपटावर बेतलेला हा चित्रपट स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून गेला.
रैना = रात्र
जाई = जन्म देणारी
गाणे ऐकण्यासाठी खालील लिंक कॉपी करा
https://youtu.be/MjVRG2VV1kA?si=9Fk9q_Z8gfWwCsY6
अतिशय सुंदर
उत्तर द्याहटवाअनेक जुनी गाणी ऐकायला बरी वाटतात पण तुमच्यामुळे जुन्या गाण्यांचा अर्थ समजला. आणि हे कुठेतरी आपल्या पण जीवनात घडलेलं असेल किंवा घडू शकतं अशी खात्री वाटते .गाण्यांचा पूर्ण अर्थ समजून सांगितल्याबद्दल अभिनंदन.
उत्तर द्याहटवामानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या अनेक चित्रपटातील गीतांचा आपण अनुवाद केला ,त्याच्यावर भाष्य केलं त्याबद्दल श्री मिरजकर सर यांच्या अभिनंदन आणि तुमच्या लेखन कार्याला शुभेच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद सर
हटवाखूप छान विश्लेषण
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर विश्लेषण सर 👍👍💐💐
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाछान सर...
उत्तर द्याहटवाबहुत सुंदर रचना सरजी
उत्तर द्याहटवाखूपच छान व आशयघन गाणे आणि त्यावरील विवेचन खूप उत्तम शब्दात मांडलेले आहे....
उत्तर द्याहटवाअनिल गवळी
धन्यवाद सर जी!
हटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवाअप्रतिम सर
उत्तर द्याहटवाजुन्या गीतातील भावनांचा खोलवर असलेला ओलावा , शब्दांची नेमकी योजना , लताचे स्वर आणि हृदयाला भिडणारी भावना, मनस्वी कलावंताचं जगणं, या सगळ्यांचे नितांत सुंदर वर्णन आपण केले आहे. गीताच्या अर्थाकडे लक्ष न देता गीत गुणगुणणाऱ्या रसिकांना गीतातील अर्थाचा खजिना आपण खुला करून दिला आहे.
उत्तर द्याहटवा