रोज़ रोज़ आँखों तले
रोज़ रोज़ आँखों तले प्रेम नेमकं असतं तरी कुठं? समोरच्या व्यक्तीमध्ये की आपल्या मनात? सहचराची एक अंधुक कल्पना अगोदर जागी होते, मग कुणीतरी आपल्या आसपास डोकावतं. हळूहळू त्याचं/तिचं आसपास असणं आवडू लागतं. प्रेमाचा रासवट दरवळ सभोवती पसरतो. तो/ती जवळ असताना जग विसरावं आणि जवळ नसताना त्याची/तिची स्वप्ने पहावीत, असा रमणीय काळ सुरू होतो. यावेळची भावस्थिती वर्णन करणं तसं कठीणच! पण गुलजारजींनी ही किमया साधली आहे एका सुमधुर गीतातून. जिवा (१९८६) चित्रपटाचे संगीतकार होते आर. डी. बर्मन. १९८० नंतरच्या हिंदी चित्रपटांतून संगीताचं भावस्पर्शी माधुर्य संपत चाललं होतं. पण चांगलं गीत हाती लागलं, तर पंचमदा त्यावर मेहनत घेत होते. त्यामधूनच भावनेची कोवळीक व गहनता असणारं हे मधुर गाणं निर्माण झालंय. आशा भोसले आणि अमित कुमार यांनी या गाण्यात प्राण ओतलाय. त्यामुळेच चित्रपट विस्मरणात गेला असला तरी गाणं मात्र जिवंत राहिलंय. प्रेमाची अनुभूती ही नेहमीच थोडीशी गोडसर अन् थोडीशी तीक्ष्ण, अस्सल मधासारखी! प्रेम या शब्दात जीवनही आहे अन् मरणही. प्रेम म्हणजे चैतन्य, प्रेम म्हणज...