तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी...
तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी...
कवी गुलज़ारजींनी 'मासूम'(१९८३) चित्रपटासाठी एक अजरामर गीत लिहिले आहे, 'तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी... !' प्रत्येकाला कधी ना कधी भावलेले, स्वतःशी related वाटणारे हे गीत नसिरुद्दीन शाह व जुगल हंसराज वर चित्रित झालेले आहे. स्वतःच्या मुलाने विचारलेल्या निरागस प्रश्नांनी अस्वस्थ झालेला बाप या गाण्यामध्ये आहे. गाण्याचे चित्रपटातील संदर्भ वेगळे असतात, तर गाणे ऐकणाऱ्याच्या मनातील संदर्भ वेगळे असू शकतात.
आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल नाराज असणे योग्य नव्हे. आपण तसे नसतोही. परंतु कधी कधी जीवनात जे काही घडते त्यामुळे आपण हैराण होऊन जातो. आपल्या सरळमार्गी जीवनात नवीन वळणे येतात. नवे प्रश्न निर्माण होतात. साध्या आनंदी जीवनात उलथापालथ होते. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उपस्थित झालेले/विचारले गेलेले निरागस प्रश्न अस्वस्थ करतात. नकळत घडून गेलेल्या चुका, की ज्या टाळता आल्या असत्या; मुखातून जहरी बाणा प्रमाणे सुटलेले शब्द, की जे रोखता आले असते; त्याची खंत वाटू लागते. आपल्याला हे त्या त्या वेळेस का सुचले नाही? शक्य असूनही आपण समोरच्या व्यक्तीशी प्रेमाने, आपुलकीने का वागलो नाही? असे बरेच काही वाटत राहते. मग नकळतपणे ओठावर शब्द येतात...
तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी
हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से
परेशान हूँ मैं
जगताना याची जाणीव नव्हती, की काही भळभळणाऱ्या वेदनाही अंतःकरणात जपाव्या लागतील. आपण कधी आनंदनिर्भर होऊन हसलो, तर त्याचीही किंमत मोजावी लागेल. त्या हसण्याचेही एक कर्ज असेल, तेही कधी फेडावे लागेल. बेधुंद आनंदाचीही कधी ना कधी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे आता आनंदाचा क्षण जगताना असे वाटत राहते की आपल्या ओठांवर त्या निरागस हसण्याचे कर्ज बाकी आहे.
जीने के लिए सोचा ही नहीं
दर्द संभालने होंगे
मुस्कुराये तो मुस्कुराने के
क़र्ज़ उतारने होंगे
मुस्कुराऊं कभी तो लगता है
जैसे होंठों पे क़र्ज़ रखा है
तुझसे...
खरे तर जीवनात आलेल्या दुःखद क्षणांमुळे नात्यांचे (नातेवाईकांचे) खरे रंगरूप समजते. कारण गरजेच्या वेळी ते जवळ येत नाहीत. जीवनातील हवीशी वाटणारी थंडगार सावलीही याच दुःखाच्या काळात पुढे येते. होरपळवणाऱ्या दुःखात सावली म्हणून कोण धावून येते, तेही समजते.
ज़िन्दगी तेरे गम ने हमें
रिश्ते नए समझाए
मिले जो हमें धूप में मिले
छाँव के ठण्डे साये
तुझसे...
आज जर आभाळ/मन भरून आलेले असेल तर थेंबांची बरसात होणारच. कारण उद्या कोणासाठी डोळे तरसतील सांगता येणार नाही. अशा वेळी दुःख होईल, परंतु डोळ्यातून पाणी येणार नाही. कारण ते अश्रू अगोदरच कुठेतरी हरवलेले असतील. कदाचित वाट्यास आलेल्या अति दुःखाने रडणेच हरवले असेल.
आज अगर भर आई है
बूंदे बरस जाएगी
कल क्या पता किनके लिए
आँखें तरस जाएगी
जाने कब गुम हुआ, कहाँ खोया
इक आंसू छुपा के रखा था
तुझसे...
काही गाणी चित्रपटातील घटना प्रसंगांवर बेतलेली असतात. चित्रपटातील कथानकाचे संदर्भ घेऊन ही गाणी येतात. तर काही गाणी चित्रपटातील कथानकाच्या पलीकडे अर्थपूर्ण असतात. 'मासूम' चित्रपटासाठी गुलजारजींनी लिहिलेले हे गाणे त्याच पठडीतील आहे. मूळ चित्रपटातील संदर्भाशिवायही हे गाणे अर्थपूर्ण आहे. कारण घटना बदलतात, प्रसंग बदलतात परंतु मनात उमटलेले भावतरंग, विचाराची आवर्तने सारखीच असतात. पुन्हा पुन्हा आपण स्वतःच्या जीवनाला सांगू लागतो,
तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी
हैरान हूँ मैं
तेरे मासूम सवालों से
परेशान हूँ मैं!
संगीतकार आर. डी. बर्मन यांचे संगीत, अनूप घोषाल, लता मंगेशकर याचा स्वर यांनी सजलेले हे गाणे हृदयाच्या कप्प्यात जाऊन बसलेले आहे. मन सैरभैर झाले, थोडी निराशेची/दुःखाची चाहूल लागली की आपोआपच ओठांवर शब्द येतात, 'जीने के लिए सोचा ही नहीं/दर्द संभालने होंगे/मुस्कुराये तो मुस्कुराने के/क़र्ज़ उतारने होंगे... '
१९८४ च्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये गुलज़ारजींना या गाण्यासाठी सर्वश्रेष्ठ गीतकार म्हणून गौरविण्यात आले होते. तर आर. डी. बर्मन सर्वश्रेष्ठ संगीतकार ठरले होते. आजही हे गाणे अनेकांच्या मनावर अधिराज्य करते हाच या गाण्याचा बहुमोल सन्मान नव्हे काय!
गाणे पाहण्यासाठी खालील लिंक कॉपी करा
https://youtu.be/LZ_YUOr-tYw?si=X47ryUhmWf-I9Hbj
Ilikelt namaste
उत्तर द्याहटवाअप्रतिम रसग्रहण, खरंच प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात हे गाणं घर करून बसले आहे. आपल्या स्वतः शी हे गाणं relate होत राहतं.नेमक्या भावना आपण शब्द बद्ध केल्या आहेत.
उत्तर द्याहटवामाझ्या आयुष्यातील 2 नंबर चे आवडते गाणे आहे हे, आणि महत्त्वाचे हे गाणे माझे सर्व तोंडपाठ आहे.....
उत्तर द्याहटवाहे गाणे खूपच सुंदर आहे चित्रपट अप्रतिम तर आहेच पण त्याहीपेक्षा या गाण्याची व संगीताच जादू दीर्घकाळ स्मरणात राहील अशी आहे आणि बर्मन यांच्या अनेक गाण्यांपैकी एक अविट गाणे माझे खूप आवडते आहे
उत्तर द्याहटवा