फिर से आइयो बदरा बिदेसी

 फिर से आइयो बदरा बिदेसी     

      

      प्रेमभाव हा एकाच वेळी सर्जक आणि विध्वंसक देखील असतो. जेव्हा आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळतो आणि प्रेम परस्परांच्या अनुभूतीने साकार होते, तेव्हा प्रेम म्हणजे ऊर्जा-प्रेरणा-आनंद देणारे जीवनसंगीत ठरते. जीवनातील चांगुलपणावरचा विश्वास दुणावतो. याउलट जेव्हा प्रेमाला प्रतिसाद मिळत नाही, योग्य तो सन्मान मिळत नाही किंवा प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होते, तेव्हा प्रेम विध्वंसक होते. मनस्वी प्रेम करणारी व्यक्ती स्वतःच कोलमडून जाते, निराश होते, उध्वस्त होते. तिचे आयुष्य म्हणजे दुःखाचे वैराण वाळवंट बनते. एकाच प्रेम भावनेची ही दोन स्वरूपाची परिणती असते.
       खरे तर प्रत्येक संवेदनशील स्त्रीची अशी इच्छा असते की आपल्या सहचराने आपल्या भावभावना समजून घ्याव्यात. आपल्या इच्छा आकांक्षा सांगण्याची गरजच भासू नये. परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही. तो आपल्याच भावविश्वात इतका रममान झालेला असतो की त्याला तिच्या भावनांची दखल घ्यावी असे वाटत नाही. कधी कधी त्याला तिचे मन कळते, पण योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही. त्यावेळेला होणारी मनाची आर्त व्याकूळ अवस्था वेदनेत रूपांतरित होते. त्याची/त्याच्या प्रेमाची आस इतकी तीव्र असते की मानसिक संतुलन हरवते. अशा वेळी सावरता आले किंवा इतर कुणी सावरले तर बरे! अन्यथा विनाश अटळ!
       असा प्रेमातील आर्त व्याकूळ विरहभाव गुलजारजींनी एका गाण्यात नेमकेपणाने पकडला आहे. 'नमकीन' (१९८२) हा गुलजारजींनीच दिग्दर्शित केलेला चित्रपट. एक साठी ओलांडलेली वृद्धा ज्योती (वहिदा रहेमान), तिच्या तीन अविवाहित मुली थोरली निमकी (शर्मिला टागोर), मधली मिट्ठु (शबाना आज़मी) आणि छोटी चिनकी (किरण वैराले) हिमाचल प्रदेश मधील एका पर्वतीय खेड्यातील पडझड झालेल्या घरात राहत आहेत. तिथे एक ट्रक ड्रायव्हर गेरुलाल (संजीव कुमार) काही दिवसांसाठी भाडेकरू म्हणून येतो. तो सज्जन आणि परोपकारी आहे. त्याला थोरली निमकी आवडते, परंतु निमकीला वाटते त्याने मिट्ठूशी लग्न करावे. कारण मिट्ठूला गेरुलाल आवडतो. शिवाय मिट्ठू मुकी आहे. तिला मनःपूर्वक सांभाळणारा कुणीतरी हवा आहे.  निमकीचे लग्नाचे वयही उलटले आहे. परंतु गेरुलालने मिट्ठूचा विचारही केलेला नसतो. दरम्यान मुकादम त्याला दुसरीकडे कामासाठी जायला सांगतो. त्यावेळी घरातल्या तीनही मुली रडतात. त्याने आपला पत्ता एका वहीत लिहून दिलेला असतो. परंतु त्यावर प्रतिसाद येत नाही. इकडे मिट्ठू त्याची आर्तपणे वाट पाहते. आपल्या मनातील भाव एक गाणे लिहून व्यक्त करते. एका मुक्या/ अबोल मनातील व्याकूळता या गाण्यातील शब्दाशब्दांतून व्यक्त होत राहते.

फिर से आइयो बदरा बिदेसी
तेरे पंखों पे मोती जडूंगी
भर के जाइयो, हमारी तलैया
मैं तलैया किनारे मिलूंगी
तुझे मेरे काले कमलेवाले की सौं

       हे परदेशी आभाळा (जिवलगा) पुन्हा ये. मी तुझ्या पंखांवर मोती (पाण्याचे थेंब) जडावेन. आमच्या कोरड्या तहानलेल्या तलावाला भरून टाक. मी तळ्याकाठी तुला भेटेन. तुला काळ्या कमलीवाल्याची शपथ आहे. (प्रेमभावनेशिवाय कोरड्या आटत चाललेल्या तलावासारखी ती प्रेमाने भरलेल्या आभाळासारखा तो!)

तेरे जाने की रुत मैं जानती हूँ
मुड़ के आने की रीत है कि नहीं
काली दर्गा से पूछूँगी जा के
तेरे मन में भी प्रीत है कि नहीं
कच्ची पुलिया से हो के गुजरियो
कच्ची पुलिया किनारे मिलूंगी


     तुझ्या जाण्याची अटळ वेळ मला माहीत आहे, परंतु पुन्हा परत येण्याचा पद्धत आहे की नाही? म्हणजेच कामकाजासाठी तुला दूर जावं लागतंय हे समजू शकते, परंतु पुन्हा ओढीने मागे येण्याची चालरीत तुझ्याजवळ आहे की नाही? मी काली दर्गामध्ये जाऊन विचारते की तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे की नाही? (जर तीव्र प्रेमभाव असता तर तू नक्कीच परत आला असतास, हे गृहीत!) येताना तू कच्च्या पुलाजवळून ये. मी तुला कच्च्या पुलाच्या कडेला थांबलेली भेटेन.

तू जो रुक जाए मेरी अटरिया
मैं अटरिया पे झालर लगा दूँ
डालूँ चार ताबीज़ गले में
अपने काजल से बिन्दिया लगा दूँ
छू के जाइयो हमारे बगीची
मैं पीपल के आड़े मिलूंगी

       तू जर माझ्या घराच्या माळ्यावर राहशील, तर मी त्या माळ्याला झालर बांधेन. कुणाची बाधा होऊ नये म्हणून तुझ्या गळ्यात चार तावीज बांधेन. तुझ्या गालाला माझ्या डोळ्यातील काजळाची तीट लावेन. माझ्या वैराण होत चाललेल्या बागेला स्पर्शून जा. त्या प्रेमभावनेच्या बागेला संजीवनी दे. मग मी पिंपळाच्या पाठीमागे तुला भेटेन.
       एका निष्पाप निरागस मुलीचा प्रेमभाव! तो आपला प्रियकर आहे, असे तिने मनोमन ठरविले आहे. त्यामुळेच ती मोठ्या हक्काने त्याच्याशी संवाद साधते आहे. आपली विरह भावना व्यक्त करते आहे. 'छू के जाइयो हमारे बगीची', अशी मनधरणी करणारी ती 'तेरे जाने की रुत मैं जानती हूँ / मुड़ के आने की रीत है कि नहीं?' असा प्रश्न विचारते तेव्हा एक अस्सल स्त्रीभाव व्यक्त होतो. परंतु तिची ही अव्यक्त प्रतीक्षा तो समजून घेतो का? हाच खरा प्रश्न आहे.
(अटरिया = घराचा वरचा मजला/वरचा माळा)


गाणे पाहण्यासाठी खालील लिंक कॉपी करा.
https://youtu.be/hF-49WbNLDE?si=RBLJ9hBUWFfXN9rK

नमकीन (१९८२)
पटकथा, संवाद, गीतकार, दिग्दर्शक : गुलजार
संगीत : आर. डी. बर्मन
गायिका : आशा भोसले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र (लेख)