संत त्रिलोचन भक्ती परंपरांना जोडणारा दुवा
भक्ती ही द्रविडी परंपरा असून ती दक्षिणेकडून उत्तरेकडे गेली, असे मानले जाते. दक्षिण उत्तरेच्या मध्यावर पंढरपूर अर्थात वारकरी भक्तिपरंपरा आहे. मध्ययुगातील महत्त्वाचे जागते भक्तिकेंद्र म्हणून पंढरपूर उभे राहिले आणि येथे भक्तीचा मेळा जमला. वारकरी संतांनी दक्षिण व उत्तर भारतात यात्रा केल्या. आपल्या भक्तिमार्गाचा प्रचार प्रसार केला. भक्तीचे पसायदान ठिकठिकाणी वाटले. त्यातूनच नवे संत कवी पुढे आले. संत त्रिलोचन हे त्यापैकीच एक.
त्रिलोचन म्हणजे तीन डोळे असणारा. परंतु येथे त्रिलोचन म्हणजे त्रिकाल ज्ञानी! भूत, भविष्य आणि वर्तमानाचे लख्ख ज्ञान असणारा तो त्रिलोचन! संत त्रिलोचन यांचे लौकिक चरित्र उपलब्ध नाही. ते संत नामदेवांचे समकालीन होते. बाबा पूरणदास कृत 'श्री नामदेव चरित्रा'मध्ये त्रिलोचनाची कथा आलेली आहे. प्रियादासाने 'भक्तमाल' मध्ये त्यांच्यासंबंधी कथा नोंदवून त्यांना श्रेष्ठ भक्तांच्या पंगतीत बसविले आहे. श्री महिपती बुवा रचित 'संतलीलामृत' ग्रंथात सत्ताविसाव्या अध्यायात त्रिलोचन व बिर्तिया यांच्या संदर्भातील रसाळ कथा आलेली आहे. संत कबीरांनी नामदेव व त्रिलोचन यांच्यातील संवाद एका पदामध्ये व्यक्त केला आहे, त्यावरून त्यांचे मैत्रीपूर्ण नाते स्पष्ट होते. कृ. गो. वानखेडे यांच्या मते त्रिलोचन हे हरिद्वारा जवळ राहणारे वैश्य होते. त्यांनी 'संत नामदेव' पुस्तकात एक पद दिलेले आहे. त्यानुसार त्रिलोचन म्हणतो, "विठ्ठलाने मला हाताला धरून भक्तिमार्गाकडे वळविले आहे." उद्धव चिद्घन लिखित 'त्रिलोचन चरित्र' किंवा अनंतदास लिखित 'परचाई' मध्ये नामदेव व त्रिलोचन यांचा घनिष्ठ संबंध व्यक्त करण्यात आला आहे.
परशुराम चतुर्वेदी यांनी 'उत्तरी भारत की संत परंपरा' पुस्तकात त्रिलोचनांचा जन्म विक्रम १३२४ अर्थात इसवी सन १२६७ दिलेला आहे. बार्शी हे त्यांचे जन्मगाव सांगितले जाते, परंतु त्याला पुष्टी मिळत नाही. बहुतेक संत नामदेवांना उत्तर भारतात तीर्थयात्रा करीत असताना हा शिष्य मिळाला असावा. डॉ. कामत यांच्या मते त्रिलोचन हा राजस्थानचा असावा. तो नामदेवांचा शिष्य बनून महाराष्ट्रात पंढरपुरात आला असावा. त्याच्या हिंदी पदांवर मराठी भाषेचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो.
संत त्रिलोचन यांची चार पदे 'श्रीगुरुग्रंथसाहिब' या ग्रंथात समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे ही चारही पदे रागदारी मध्ये आहेत. त्यांचे शिख समुदायाकडून भक्तिपूर्वक गायन केले जाते. वारकरी आणि शिखपरंपरेला जोडणारा दुवा म्हणून संत त्रिलोचन यांच्याकडे पाहता येते. त्यांना दीर्घकाळ संत नामदेवांचा सहवास लाभलेला आहे. त्यांचे नाते मित्रत्वाचे आहे. विठ्ठल भक्तीचा संस्कार घेऊन त्यांनी आपली भक्तिधारणा दृढ केली. शीख तत्त्वज्ञान आणि मराठी संत या पुस्तकाचे अनुवादक प्रशांत तळणीकर म्हणतात, "एक मराठी संत त्रिलोचन यांनी धर्माचं अवडंबर माजवण्याला विरोध केला. बाह्य रूपापेक्षा आंतरिक शुद्धतेवर त्यांचा भर होता. केवळ विशिष्ट वेशभूषा आणि वस्तूंचा वापर करून कोणीही महान होत नाही, तर त्याचे विचार, त्याचा आचार महत्त्वाचे आहेत, अशी शिकवण त्यांनी दिली आहे."
महिपतीबुवा रचित कथामहिपती बुवा ताहराबादकर यांनी 'श्री संतलीलामृत' ग्रंथात अनेक संतांच्या चरित्र कथा दिलेल्या आहेत. त्यामध्ये २७ व्या अध्यायात संत त्रिलोचनांची कथा आली आहे. ती पुढील प्रमाणे :
देव हा भक्तीचा भुकेला आहे, तो अभक्ताच्या घरी पाणीही घेत नाही. परंतु भक्ताघरी जाऊन जे असेल ते खातो. राजा असणाऱ्या दुर्योधनाचा आदर सत्कार नाकारून विदुरा घरी त्याने कण्या खाल्ल्या, भिल्लिनीची उष्टी बोरे खाल्ली. हा त्याचा स्वभाव गुणच आहे. तशीच कथा महाजन सावकाराच्या घरी जन्मलेल्या त्रिलोचनाची आहे. त्याने आपल्या भक्तीने रुक्मिणीरमण वश केला होता. 'भक्तिज्ञान वैराग्य बळ। सर्वांभुती दया अढळ। भजन करीत सर्वकाळ। प्रपंच तळमळ निरसली।।'अशी त्याची वृत्ती होती. त्याच्याजवळ आपपर भाव नव्हता. साधू संत, वैष्णव भक्त पाहून त्याला आनंद होत होता. तो त्यांचा आदर सन्मान करत होता. अशा विख्यात परमभक्ताची सत्त्वपरीक्षा पाहण्यासाठी साक्षात वैकुंठनाथ तेथे आले. खांद्यावर कांबळ घेऊन गरीब अनाथाचे रूप धारण केले आणि सेवा चाकरी करण्याच्या इच्छेने ते त्रिलोचनाच्या द्वारी उभे ठाकले. स्वतः त्रिलोचनास नमस्कार केला. तेव्हा त्रिलोचनाने जवळ बसवून विचारपूस केली. यातिकूळ विचारले. 'मी तो याती कुळ विरहित, विजात आहे.' असे वैकुंठनाथाने सांगितले. याबरोबरच मात्या-पित्याची निश्चिती नाही. माझी वस्ती भक्तिभावाच्या ठिकाणी असते. मी कुठेही रहिवास करतो, अशा अनेक गोष्टी त्याने सांगितल्या. परंतु त्रिलोचनास ईश्वरी मायेमुळे ईश्वराचे बोल ओळखता आले नाहीत. त्यानंतर तू काय काय करू शकतोस, असे त्रिलोचनाने विचारले. त्यावर मला ६४ कला, चौदा विद्या, सामुद्रिक, शेती कुळवाडी, कुंभारकाम, शिवणकाम असे सगळे येते. माझे नाव बिर्तिया असे आहे. याशिवाय गायन, नृत्य, लेखन, व्यापार उदिम, शस्त्रविद्या असे सगळे येते. मी तुम्ही सांगाल ती चाकरी करीन, असे तो म्हणाला. परंतु माझ्या मध्ये एक दुर्गुण आहे. तो म्हणजे मी खूप खातो. माझी भूक खादाड आहे. जर गृहस्वामिनीने यामध्ये कंटाळा केला, तर मी तत्काळ तिथून निघून जातो, असेही तो म्हणाला. यावर त्रिलोचनाने त्याला घरी चाकर म्हणून ठेवून घेतले.
पत्नीस त्याला पोटभर अन्न देण्यास सांगितले. बिर्तिया जेवण्यास बसला तेव्हा त्याने नाना प्रकारचे सगळे अन्न भक्षण केले. भानोशा वरील सर्व जेवण संपले, तरी त्याची भूक भागली नाही. तूप साखर, खीर, वळवटे म्हणजेच शेवया, तिळगुळ, फुटाणे असे सगळे खाऊ घातले. तरीही त्याची भूक भागली नाही. घरस्वामिनीला तो राक्षसासारखा वाटू लागला. शेवटी तिने हिरवी डाळ आणून दिली. तीही त्याने खाल्ली तरीही त्याचे पोट भरले नाही. उदकासी नाही आधार, असे तो म्हणू लागला.
येथे महिपतींनी एक महत्त्वाची गोष्ट नोंदवली आहे. 'भक्तिभावें भुलला हरी। यातिकुळ न विचारी। सांडोनि महत्त्वाची थोरी। पोटावारी राहिला।।'
त्यानंतर बिर्तियाने काम विचारले, तेव्हा त्रिलोचनाच्या पत्नीने शेत पेरून येण्यास सांगितले. बिर्तिया आनंदाने गेला. सगळे शेत पेरले. ऋतू काळ नसताना देखील मेघ जमले. पाऊस पडला. अंकुर निघाले. धान्य सुद्धा लगडले. १८ धान्याने शेत पिकले. मग त्याने ते घरी आणून साठवले आणि आता मला वाढा, असे तो म्हणू लागला. त्यावेळी एक मण धान्य दळून तिने जेवण बनविले होते. बिर्तिया जेवणास बसला. तिने केलेला सगळा स्वयंपाक खाऊन फस्त केला. आजचे जेवण मिष्ठान्न होते. 'उदंड देखिल्या सुगरणी। परी तुज ऐसी कोणी नाही। साक्षात अन्नपूर्णा भवानी। मज लागून वाटते।।' असे तो म्हणाला.
त्यानंतर तिने बिर्तियाला पुढील काम सांगितले. ताबडतोब एक घर बांध. रानात जाऊन वैरण काडी घेऊन ये. जनावरे अरण्यात चार, घोडी स्वच्छ धुऊन पागेत आणून बांध. सगळे झाल्यानंतर मी तुला पुन्हा जेवण देते. यावर चक्रपाणिने सातखणी उंच असा वाडा बांधला. दारात लाकडाचा भारा आणून टाकला आणि जनावरे चारली. घोड्यांना धुवून पागेत बांधले. आणि पुन्हा जेवण दे म्हणून दारी आला. त्रिलोचनाच्या पत्नीने कसेबसे धान्य दळले आणि रोट्या करून वाढल्या. बिर्तिया सुक्या रोट्या आवडीने खाऊ लागला. तरी त्याचे पोट भरले नाही. त्याने अजून वाढ म्हटले, तेव्हा तिने त्याला दूरच्या पाहुण्यांचा समाचार घेऊन येण्यास सांगितले. जेथे जाऊन परत येण्यास इतर वार्तिकांना एक महिना लागतो, तेथून बिर्तिया थोड्याच वेळात परतला. त्याने पाहुण्यांचा समाचार सांगितला. आता मात्र हद्द झाली. त्याचवेळी एक शेजारीन तिच्याकडे आली आणि म्हणू लागली," खूप दिवस दिसली नाहीस, म्हणून आले आहे. चेहऱ्यावरचे तेज गेले आहे. कपडे खूप मळकट झाले आहेत. स्नान वेणी फणी नाही. याचे कारण काय, ते सांग." त्यावर तिने मैत्रिणीस घडला प्रकार सांगितला. "शंभर माणसांचे अन्न शिजविले तरी त्याची एकट्याची भूक भागत नाही. असा खादाड दुसरा कोणी पाहिला नाही. त्याला काही म्हणावे तर तो रुसून घर सोडून जाईल आणि मग माझा पती माझ्यावर रागवेल. हा बिर्तिया आला तेव्हापासून मी दिवस रात्र दळण कांडण करत आहे. नीट अन्न पाणी घेतले नाही. वेणी फणी स्नान या दूरच्या गोष्टी आहेत." हे दोघींचे बोलणे बिर्तियाने दारातून ऐकले आणि तो अदृश्य झाला.
काही वेळाने त्रिलोचनाने बिर्तिया कोणत्या कामास गेला म्हणून चौकशी केली. ती म्हणाली, मी कुठे पाठविले नाही. सगळ्या घरात शोधले, परंतु तो सापडला नाही. तेव्हा त्रिलोचनास मनी उमजले, की तो साक्षात कैवल्यदानी होता. मी त्याला ओळखले नाही. त्याच्याकडून सेवा करून घेतली. यावेळी दोघेही शोक करू लागले. त्याचा धावा करू लागले. तीक्ष्ण शस्त्राने स्वतःची शीर कापीन, असे म्हटले. तेव्हा 'कासे दिव्य पितांबर, कर्णी कुंडले मकराकार, सुहास्य वदन मनोहर' असा सावळा श्रीपती साक्षात उभा ठाकला. त्याचे समचरण पाहताच त्रिलोचनाने मिठी घातली. क्षेम आलिंगन देताना आनंद पोटात मावेना. तेव्हा त्रिलोचनाने विचारले, "तुला बिर्तिया नाव कोणी ठेवले?" त्यावर वैकुंठनाथ म्हणाला, "मी तो नाम रूपातीत, सगुण रूप धरी साक्षात, तुमचे मनोगत जाणून." अशाप्रकारे भक्त त्रिलोचनाची सत्त्वपरीक्षा रुक्मिणीरमणाने घेतली.
वरील चमत्कार कथेतून देव हा भक्तीने वश होणारा आहे, हे बिंबविले आहे. तसेच मूळचा निर्गुण निराकार असणारा हा परमेश्वर भक्ताच्या इच्छे खातर सगुण साकार रूप धारण करतो. त्याला एकविध भक्ती मिळाली, की तो भक्ताच्या घरी चाकरी करायला देखील तयार होतो. या कथेत रुक्मिणीरमणाचे खादाड असणे हे वास्तवातील खादाडपणाचे नाही, तर हा रुक्मिणीरमण सतत माझ्याकडे लक्ष द्या. एकविध भक्ती करा. मन इतरांचे दोष व्यक्त करण्यात घालू नका, तर दुसऱ्याच्या गुणांकडे लक्ष द्या, असे अप्रत्यक्षपणे सुचवितो आहे.
भक्ति जगत का चंद्रमा
'भक्तमाल' ग्रंथात कवी नाभाजींनी संत त्रिलोचन यांना उद्देशून 'भक्ति जगत का चंद्रमा' अशी अत्यंत सुंदर उपमा दिलेली आहे. कारण त्रिलोचन यांचे व्यक्तिमत्त्व इतके सौम्य व स्वागतशील होते, की त्यांच्याजवळ मनाची प्रसन्नता आपोआपच निर्माण होत असावी. 'भक्तमाल' ग्रंथाच्या माध्यमातून हिंदीमध्ये वरील चमत्कार कथा थोड्या वेगळ्या स्वरूपात आलेली आहे. त्यानुसार त्रिलोचन हे वैश्य आहेत. त्यामध्येही महाजन आहेत. महाजन म्हणजे वजन मापे तपासणारा अधिकारी. तसेच व्यापार उदीम विषयक नियम कायदे यांची अंमलबजावणी करणारा, तंटे बखेडे सोडविणारा, व्यापाऱ्यांकडून विशिष्ट वर्गणी वसूल करणारा अधिकारी होय. त्यांचा महाजनीचा उद्योग चांगला चालला होता. पोटी मुलबाळ नव्हते. तरीही ते दुःखी नव्हते. जशी भगवंताची इच्छा, असे त्यांचे मत होते. फक्त त्यांना एकच चिंता सतावत होती, आता वृद्धापकाळ सुरू झाला आहे. आपल्या हातून देवाची आणि घरी दारी येणाऱ्या संत भक्तांची सेवा कशी होणार? आणि म्हणूनच ते देवाला म्हणजेच ठाकूरजींना एक चांगला सेवक दे, अशी प्रार्थना करीत होते.
पंढरीनाथ भगवान अर्थात ठाकूरजी यांना आपल्या भक्ताचे हे दुःख पहावले नाही. त्यांनी स्वतः सेवक होण्याचा निर्णय घेतला आणि पंधरा-सोळा वर्षांच्या मुलाचे रूप घेऊन जुनी फाटकी कपडे घालून ते त्रिलोचनजींच्या दारी आले. हा मुलगा कुरळ्या केसांचा, सुंदर नेत्रांचा असला तरी आंघोळपाणी न केल्याने अस्वच्छ दिसत होता. तो दारी आला तेव्हा त्रिलोचनजी डोळे मिटून प्रार्थना करत होते. शेठजी म्हणून त्याने हाक मारली, तेव्हा त्यांनी या मुलाला पाहिले. अतिशय सुंदर दिसणारा परंतु अस्वच्छ असा मुलगा पाहून त्यांनी त्याचे नाव विचारले. तो म्हणाला, अंतर्यामी. राहतोस कोठे, असे विचारल्यावर तो म्हणाला, कुठेही. जिथे मला राहण्यास स्थान मिळेल तिथे. त्याच्या आई-वडिलांची चौकशी केल्यावर तो म्हणाला, ते असते तर माझी अशी हालत झाली असती का? मग तू असा का भटकतो आहेस, असे विचारल्यावर तो म्हणाला, काहीतरी काम मिळावे म्हणून भटकतो आहे. तेव्हा त्रिलोचनास या अनाथ मुलाची दया आली. त्यांनी विचारले तुला कोणता कामधंदा येतो? त्यावर त्रिलोचन म्हणाला, मला चारी वर्णाची व आश्रमांची मर्यादा माहिती आहे. कुणाशी कसे वागायचे व काय सेवा करायची ते माहीत आहे. त्रिलोचनजींनी विचारले साधू संतांची सेवा करणे जाणतोस काय? तेव्हा तो म्हणाला, त्यांची सेवा करण्यातच तर माझे आयुष्य गेले आहे. या १५-१६ वर्षाच्या मुलाचे हे उत्तर ऐकून त्रिलोचनजी हसले. मुलगा काही करो अथवा न करो, तो बोलतो तरी छान! असा विचार करून त्यांनी त्याला कामावर ठेवून घेण्याचे ठरविले. शेवटी त्रिलोचनजी यांनी विचारले, तुला इतका अनुभव आहे आणि तू सगळे काम करतोस तर तुला कोणी कामावर ठेवून का घेत नाही? निश्चितच तुझ्यामध्ये काहीतरी खोट असेल. तेव्हा अंतर्यामी म्हणाला, माझ्यामध्ये एक खोट जरूर आहे. मी काम करताना मागे सरत नाही, परंतु जर कोणी माझ्या विषयी तक्रार करू लागले, तर मी तिथे क्षणभरही राहत नाही. त्रिलोचनजींनी विचारले, लोक काय तक्रार करतात? तो म्हणाला, हा फार खातो असे म्हणतात. त्यांनी पुन्हा विचारले, तू किती खातोस? तो म्हणाला, पाच-सात शेर भोजन लागते. त्रिलोचनजी म्हणाले, तू दहा-बारा शेर खा. परंतु साधुसंतांच्या सेवेत कमी नाही झाली पाहिजे. अंतर्यामी म्हणाला, परंतु मला तुमच्या पत्नीनेच करून घातले पाहिजे. त्रिलोचनजींनी आपल्या पत्नीला सगळे सांगितले. ती साध्या सरळ स्वभावाची होती. ती म्हणाली, आपल्याला तरी कुठे मूलबाळ आहे. मी त्याला मुलग्यासारखा समजेन आणि खाऊ घालेन. त्रिलोचनजी म्हणाले, परंतु तो खूप खादाड आहे. त्याला त्याबद्दल बोल लावू नकोस. ती ठीक आहे म्हणाली.
अशाप्रकारे जवळ जवळ 13 महिने ठाकुरजी अंतर्यामी बनून तेथे राहिले. अंतर्यामी घरचे सगळे काम करत होता. सर्वांची सेवा करणे, स्वच्छता, साफसफाई, भांडी घासणे, कपडे धुणे, जेवण बनविणे, त्रिलोचनजींचे हात पाय रगडून देणे. असे सगळे काम अंतर्यामी करत होता. अंतर्यामी घरी आल्यापासून घरात रिद्धी सिद्धी वास करू लागल्या. नगरात त्रिलोचन यांच्या नावाचा जयजयकार सुरू झाला. साधुसंत मोठ्या प्रमाणात येऊ लागले.
एकदा त्रिलोचनजी यांची पत्नी शेजारणीच्या घरी गेली. तेव्हा तिथे काही महिला जमल्या होत्या. त्यांनी विचारले, तुमच्या घरी अंतर्यामी आला आहे, तर साक्षात ठाकूरजी आल्यासारखे झाले आहे. शेठजींच्या नावाचा डंका वाजतो आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तेज आले आहे. परंतु तू तर आहे तशीच दुबळी पतली राहिली आहेस. त्यावर माताजी म्हणाल्या, शेठजींना आता कामच काय उरले आहे. जपमाळ घेऊन नामस्मरण करतात. थोडेफार कामधंदा बघतात. अंतर्यामीची मोठी मदत होते. त्यावर शेजारणी म्हणाल्या, अंतर्यामीची तर तुलाही मदत होत असेल? माताजी म्हणाल्या, त्याची मलाही मदत होते. तो सगळ्यांची सेवा करतो. परंतु त्याची सेवा मला करावी लागते. शेजारणीने विचारले, इतकी काय सेवा करावी लागते. तेव्हा त्या बोलून गेल्या, रोज पाच सात शेर जेवण बनवावे लागते. इतका तो एकावेळी खातो. ज्या क्षणी हे शब्द तोंडून बाहेर पडले, त्या क्षणी अंतर्यामी अंतर्धान पावला. त्यानंतर पती-पत्नी दोघेही खूपच दुःखी झाले. आमचा अंतर्यामी कोणी पाहिला का, म्हणून घरोघरी चौकशी केली. शेवटी त्यांनी प्राण त्यागण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ठाकूरची साक्षात समोर आले आणि म्हणाले, मी तर संतांची सेवा करण्यास नेहमीच तयार असतो. मी तुमची सेवा करायला तयार आहे. त्यावर या पती-पत्नींना पश्चाताप झाला. आम्ही तुला नोकरासारखे वागविले म्हणून दुःख व्यक्त करू लागले. त्यावर ठाकुरजींनी त्यांना हृदयाशी धरले आणि म्हणाले, मी तुमच्यावर प्रसन्न आहे.
अशी कथा हिंदी भाषिकांमध्ये प्रचलित आहे. उत्तर भारतात देवाला प्रसाद म्हणून पाच सात शेर पक्वान्न बनवण्याची प्रथा आहे. त्याचा प्रभाव या कथेवर दिसून येतो. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हिंदी कथेमध्ये देखील त्रिलोचन यांचा ठाकूर म्हणजेच देव हा पंढरीनाथच दाखवला आहे. येथे एक गोष्ट स्पष्ट होते, ती अशी की त्रिलोचन यांची भक्ती ही संतसंगतीनंतर पंढरपुरातूनच सुरू झाली आहे. आणि ती सगुण रूपाची विठ्ठल भक्ती आहे. पुढे ते निर्गुणाकडे देखील जाताना दिसतात.
कहे त्रिलोचनु मित
संत नामदेवांच्या प्रभावाने भक्तिमार्गात आलेल्या त्रिलोचनांचा नामदेवांशी वादसंवाद होत होता. त्यांचे नाते गुरु शिष्याचे कमी आणि मित्रत्वाचे ज्यादा होते. संत कबीरांनी आपल्या एका दोह्यामध्ये या नात्याचे अत्यंत मनोज्ञ वर्णन केले आहे.
नामा माया मोहया कहै त्रिलोचनु मीत ।
काहे छिपहु छाइलै राम न लावहु चीत।।
नामा कहे त्रिलोचना मुख ते रामु संमालि।
हाथ पाउ करि कामु सभु चीतु निरंजन नालि। (१३७६, संत कबीर)
येथे त्रिलोचन म्हणत आहे, "नामा, तुला मायेने मोहित केले आहे. रामा मध्ये मन न लावता तू कशासाठी कपडे रंगवतो आहेस. (सांसारिक गोष्टीत गुंतून धूसर होतो आहेस.)" यावर नामदेव उत्तरतात, "त्रिलोचना, राम नाम सांभाळण्याचे काम मुख करते. हात पाय इतर सर्व कामे करतात. त्याचवेळी चित्त ईश्वराच्या निरंजन म्हणजेच निष्कलंक रूपात तल्लीन झालेले असते."
येथे नामदेवांची भूमिका संसार त्याग न करता भक्ती करण्याची आहे. नामदेवांनी दुसऱ्या एका अभंगात 'संसारी असावे, असोनी नसावे', असे म्हटले आहे. त्याच भूमिकेतून नामदेवांनी येथे वरील प्रत्युत्तर दिलेले दिसते. संसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या न सोडताही भक्ती करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ नामदेवांनी घालून दिला आहे. अर्थातच तो त्रिलोचनांनी देखील स्वीकारलेला दिसून येतो. हा एकप्रकारे कर्मयोग आहे.
या दोन संतांच्या संवादातील विचार पुढे जाऊन शिख संप्रदायाने आपल्या तत्त्वज्ञानात स्वीकारलेला दिसतो. 'कीरत करो, वंड छको, नाम जपो' ही त्रिसूत्री शीख धर्माची आधारस्तंभ आहे. 'कीरत करो' म्हणजे प्रामाणिकपणे व कष्ट करून स्वतःचा उदरनिर्वाह चालविणे. 'वंड छको' म्हणजे आपले धन व अन्न गरजूंसोबत वाटून खाणे. तर 'नाम जपो' म्हणजे निरंतर ईश्वराचे नामस्मरण करणे होय. त्यामुळेच संत कबीर लिखित वरील दोहा 'श्रीगुरुग्रंथसाहिब' मध्ये घेतला गेला असावा.
संत कबीर लिखित या संवादात हे दोन संत एकमेकांशी मित्रत्वाच्या नात्याने बोलत आहेत. त्यांचे बोलणे आध्यात्मिक पातळीवरचे आहे. विशेष करून नामदेवजी संत त्रिलोचन यांना भक्ती मधील कर्मयोग स्पष्ट करत आहेत, असे दिसते. हाच विचारांचा धागा कबीरांनी आपल्या पदांमधून पुढे नेलेला आहे.
जनमसाखी मधील त्रिलोचन
बावा पूर्णदास लिखित श्री नामदेव जी यांच्या 'जनमसाखी' मध्ये 'गुरु भाई त्रिलोचन को उपदेश' असे एक प्रकरण आले आहे. नामदेवांचा छोटा गुरुबंधू असणारा त्रिलोचन एके दिवशी नामदेवांच्या पायावर पुन्हा पुन्हा डोके ठेवतो आणि हात जोडून म्हणतो, की महाराज तुम्ही चिंता दूर करणारे आहात. माझ्या मनाला मोहाची काजळी लागली आहे. त्यामुळे हरी दिसत नाही. तुम्ही गुरुबंधू हे गुरु समान किंवा वडिलासमान आहात. तुम्ही हे नाते मानत असाल तर मी एक विनंती करतो. सद्गुरूंनी जे नाम ऐकवले त्यावर मी मन दृढ केले आहे. परंतु फक्त नाम मिळाले. ज्याचे नाम मी घेतो तो परमेश्वर मला भेटला नाही. त्याला मी पाहू इच्छितो.
त्यावर नामदेव उत्तरले, "तुझी विनंती माझ्या मनाला भावली. हरीचे रूप त्यालाच दिसते, ज्याने भक्ती प्रेमाचे अंजन डोळ्यात घातले आहे. मोह अहंकार हा नेत्ररोग दूर झाल्यावरच हरी सर्व ठिकाणी दिसू लागतो. हरी रूपासहित मनातच प्रगटतो. या जगात हरी शिवाय कोणतीच वस्तू नाही. हरी तुझ्यामध्ये आहे. सर्व जीवांमध्ये आहे. पशु प्राण्यांमध्ये आहे. वन, तृण, पक्षी, प्राणी, वारा, पाणी यांपैकी काहीही हरी शिवाय रिकामे नाही."
असा अनेक प्रकारचा उपदेश करून नामदेव म्हणाले, "सर्व प्राणिमात्रांमध्ये केवळ एक परमेश्वर आहे, अशा नजरेने तू पहा. म्हणजे तुला सर्वत्र हरी दिसेल. अशी नजर लाभण्यासाठी सत्संग कर. काम-क्रोधरुपी मळ राहू देऊ नकोस. कपट, दंभ, पाखंड असू नये. सत्संगती कर. अन्य उपाय नाही."
येथे नामदेवांनी चराचरात परमेश्वर आहे, परंतु त्याच्या अनुभवासाठी सत्संगती आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले आहे. अद्वैत सिद्धान्त मांडताना ते पुढील पदात म्हणतात,
जसे एका मण्यात एकच दोरा ओत-प्रोत भरलेला असतो, तसेच प्रभु सर्वांमध्ये भरलेला आहे. जसे पाणी आणि पाण्याची लाट, पाण्याचा फेस - हे पाण्याशिवाय वेगळे नाहीत. पाण्यात बुडबुडा झाला तरी तो पाण्याहून वेगळा नसतो. हे सगळे जग, प्रपंच हे परब्रह्माचीच लीला आहे. विणकर जसा सर्व कपड्यात असतो, तसा देव सर्वांमध्ये आहे. स्वप्न खोटे असते पण पाहणारा सत्य असतो, तसे जग मिथ्या भासते पण त्यातला हरि सत्य आहे. प्रत्येक शरीरात, प्रत्येकाच्या आत फक्त मुरारी म्हणजे कृष्णाचे एकच रूप आहे. अशी दृष्टी ठेवशील तर तुला सर्व ठिकाणी हरिच दिसेल. ही दृष्टी सत्संगतीने मिळते. सत्संगाने काम-क्रोध-मल, कपट-दंभ नष्ट होतात. सत्संगाशिवाय दुसरा उपाय नाही.
त्रिलोचनास उपदेश करताना ते पुढे म्हणतात, "अरे मना, तू विसरलास. हा संसार म्हणजे मायेचे जाळे, पिंजरा आहे. दिवसातून तीन वेळा काळ तुला गिळायला टपलेला आहे - म्हणजे जन्म-मृत्यूचा फेरा चालूच आहे. धन, रूप, तारुण्य बघून अरे मूर्खा, कशाला गर्व करतोस? कच्च्या मडक्यात पाणी भरल्यासारखे आहे हे शरीर. कधीही फुटेल, काहीच टिकणार नाही. जीव-रूपी हंस ही देह-रूपी हवेली सोडून निघून जाईल, शेवटी राखच राहील. आई-वडील, लक्ष्मी म्हणजे संपत्ती, मुलगा, परिवार हे सगळे जमवून शेवटी तू एकटाच जाणार आहेस, काहीच सोबत येणार नाही. म्हणून त्रिलोचना, गोविंदाचे गुण गा. तू चार दिवसांचा पाहुणा आहेस, पाण्यावरील बुडबुड्यासारखा क्षणभंगुर आहेस, हे ध्यानी धर."
हे ऐकून त्रिलोचनजी म्हणाले, "तीर्थस्नान केल्याने कोणते फळ मिळते? कोणते तीर्थ क्षेत्र श्रेष्ठ आहे, ते सांगा." त्यावर नामदेव उत्तरले,"माझ्या भावा, ऐक. सर्व तीर्थांपेक्षा 'सत्संगती' श्रेष्ठ आहे. तिची महिमा शब्दात वर्णन करता येत नाही.
जो माणूस निश्चयाने सत्संगतीरूपी तीर्थात स्नान करतो, त्याला त्याची मनोकामना मिळते. संतांचे दर्शन केल्याने पाप नष्ट होतात आणि पापांमुळे होणारे त्रिविध ताप_ - दैहिक, दैविक, भौतिक - मिटतात. ६८ तीर्थांच्या मध्ये सत्संगती आहे. जी सर्व पापांचे क्षालन करते. त्रिलोचन हे ऐकून काही दिवस स्वामींच्या बरोबर राहिले. रात्रंदिवस सत्संगत करू लागले आणि त्यामुळे त्याला नामाचा रंग चढला.
सुनि त्रिलोचन कुछक दिन, रहे स्वामी सङ्ग ।
निसि दिन सत्संगत करहिं, चढ़े नाम को रङ्ग ॥१५८॥
अशा अतिशय सुंदर शब्दांत पूर्णदासांनी त्यांचे वर्णन केले आहे. या संपूर्ण प्रकरणात नामदेव व त्रिलोचन यांच्यातील भावबंध स्पष्ट होतात.
शिख परंपरा आणि संत त्रिलोचनसुनो त्रिलोचन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा