वडसत्यवान
वडसत्यवान
मला हवा आहे वडसत्यवान
'पत्नीव्रता' व्रत धरणारा
मी सावित्री नव्या युगाची!
बाबांनी दिली अस्त्रे जीवनसंघर्षाची
आईने, संस्कार संसाराचे
दुचाकीवर स्वार होणारी आणि
त्याहून अधिक वेगवान संगणकावर
हुकूमत गाजवणारी मी
कर्ती करवती
कधी चुकून
कधी समजून उमजून
स्वीकारते राज्यभ्रष्ट, हतप्रभ अल्पायुषी सत्यवानाला
ठरवून मनाशी काही ठोकताळे
मोठ्या हिमतीने घेते ताब्यात संसाररथाची सूत्रे
आधार देत घेत नेते यशोरेषेपार रथ
गतवैभव परत मिळविण्यासाठी
मिळवून देते नवे राज्य
सासू-सासऱ्यांना दृष्टी
परत आणते यमराजाच्या कडून प्राण, मान
मग पुन्हा मीच
का म्हणून व्रत धरावे सत्यवानासाठी?
मातीचे घोडे बनविणाऱ्या
जंगलातून कंदमुळे गोळा करून जगणाऱ्या सत्यवानाला
प्राण आणि राज्यही का म्हणून मिळवून द्यावे ?
त्याला हवेच असेल गतवैभव
तर
किमान त्याला बनू द्या वडसत्यवान पत्नीव्रता!
सात जन्माचा घाट्यातला सौदा
साफ नामंजूर !!
मी सावित्री नव्या युगाची!!!
- श्यामसुंदर मिरजकर
नव्या युगाचे भान आणून देणारी
उत्तर द्याहटवानव समाज वास्तव व्यक्त करणारी
भविष्यातील आशावाद या कवितेतून जाणवते आहे
खूपच सुंदर
नव्या युगाच्या सावित्रीचे हार्दिक स्वागत....
उत्तर द्याहटवाअप्रतिम अभिव्यक्ति...
संगणक युगातल्या स्रीचे भावविश्व बोलके...विचारविश्व कालसापेक्ष.. वडसत्यवानाकडील अपेक्षाही रास्त.. स्रीपुरुष समतेची व्यवस्था सार्वकालीक व्यवस्था रुजली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करणारी अत्यंत सशक्त आणि विचारगर्भ कविता..!
उत्तर द्याहटवापुरूषप्रधान समाजात वास्तव मांडणारी कविता. लोकशाही प्रधान देशात न्याय मागणारी.स्त्री व पुरुष संसाररथाची दोन चाक आहेत. दोन्हींना समान मानायला शिकूया.परंपरागत पद्धतीने सण, उत्सव साजरे न करता वास्तव व्यवहाराने साजरे करूया.
उत्तर द्याहटवास्त्री पुरुष समानतेवर आधारित सुंदर कविता. एकतर्फी परंपरा योग्य नसून दोघांनी दोघांसाठी असायला हवं असं सांगणारी ..👍👌
उत्तर द्याहटवावाह.... सुंदर !!
उत्तर द्याहटवानारी कर्तृत्वाचा शोध हा या कवितेचा मूळ स्वर आहे असे मला वाटते
उत्तर द्याहटवाखरेच आहे सर कीआज स्त्रीचे कर्तृत्व सर्वांसमोर येत आहे. पण पुरुषांच्या मानसिकतेत जादा बदल हवा तसा तो स्त्रियांच्या मानसिकतेत व्हायला हवा.
हटवावस्तुतः या संदर्भात स्त्रियांनी व्यक्त होणे फार गरजेचे आहे. तिला काय वाटते हे फार महत्त्वाचे आहे. जोतीराव फुले यांनी सता - सती हे शब्द वापरून तो वेध घेतला आहे. ही कविता वाचून एखादी स्त्री व्यक्त झाली तर उत्तमच. 💐
उत्तर द्याहटवा