सत्यशोधकीय नियतकालिके


सत्यशोधकीय नियतकालिके - वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ

डॉ. श्यामसुंदर मिरजकर

All things must be examined, debated, investigated without exception and without regard for anyone's feelings.
- Denis Diderot

      फ्रेंच तत्त्वज्ञ आणि विश्वकोशाचा सहसंकल्पक डेनिस डिडेरॉट (1713-1784) यांचे वरील विधान बुद्धिप्रामाण्य आणि सत्यनिष्ठा यांना अधोरेखित करणारे आहे. भारतातही 'प्रत्यक्षम् एवम् प्रमाणम्।' म्हणणार्‍या चार्वाकांपासून ही चिकित्सा जबर किंमत मोजूनही अव्याहत चालू आहे. ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, परंपराप्रामाण्य यांना शह देण्याचा प्रयत्न मध्ययुगात नाथ-महानुभाव-लिंगायत-वारकरी यांनी केला. त्याला मर्यादित क्षेत्रात व ठरावीक कालखंडात यशही मिळाले. परंतु राजसत्ता ही सनातनी धर्मव्यवस्थेशी बांधील असल्याने या संप्रदायांना सामाजिक व्यवस्थेत मोठे फेरबदल घडवून आणता आले नाहीत.
      इंग्रज राजवटीत सनातन्यांचा अधिक्षेप सुरू झाला. त्रैवर्णिक पुरुषांपुरतेच मर्यादित असलेले ज्ञान काही प्रमाणात बहुजनांना खुले झाले. त्यातूनच सामाजिक क्रांतीचे प्रणेते जोतीराव फुलेंचा उदय झाला. सर्व अनर्थांचे मूळ अविद्या आहे, हे स्पष्ट करून जोतीराव फुलेंनी स्त्रीशिक्षण, प्रौढ शिक्षण, रूढिभंजन, धर्मचिकित्सा सुरू केली. परिणामी हजारो वर्षे गुलामीत खितपत पडलेल्या बहुजनांना समता व बंधुतेचा नवा मार्ग मिळाला. आत्मसन्मानाचे नवे पर्व सुरू झाले. त्यातूनच पुढे सत्यशोधक चळवळ आकारास आली.

      भारतात नेहमीच अभिजनांचे तत्त्वज्ञान, विचार हे मुख्यप्रवाही गणले गेले. त्यामुळे बहुजनांचे सगळे प्रयत्न, सगळ्या चळवळी दुर्लक्षित व वंचित राहिल्या. अत्यंत देदीप्यमान व संघर्षशील सत्यशोधक चळवळ हीदेखील दीर्घकाळ अंधारात राहिली. य. दि. फडके, हरी नरके, बाबा आढाव, सीताराम रायकर, धनंजय कीर अशा अभ्यासकांमुळे म. फुले, त्यांचे अनुयायी व चळवळ प्रकाशात आली. याच परंपरेत नव्या पिढीतील संशोधक डॉ. अरुण शिंदे यांची भर पडली आहे. ‘सत्यशोधक केशवराव विचारे’, ‘मुकुंदराव पाटील यांच्या कथा’ आणि ‘सत्यशोधकांचे शेतकरीविषयक विचार’ ही तीन महत्त्वपूर्ण संशोधने त्यांच्या नावावर आहेत. नुकताच त्यांचा ‘सत्यशोधकीय नियतकालिके’ हा बृहद संशोधन ग्रंथ प्रकाशित झाला आहे. " *Subaltern History of Marathi Periodicals'* असे या संशोधनाचे वर्णन करता येईल.

       ‘सत्यशोधक चळवळीच्या नियतकालिकांचा वाङ्मयीन अभ्यास (1877-1930)’ हा त्यांचा पीएच.डी. संशोधनाचा विषय होता. त्या संशोधनात मौलिक भर घालून आणि अनावश्यक भाग वगळून डॉ. अरुण शिंदे यांनी प्रस्तुत संशोधन ग्रंथ सिद्ध केला आहे. सप्त प्रकरणात्मक या संशोधनातील पहिले प्रकरण ‘म. फुले व सत्यशोधक चळवळ’ यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडणारे आहे. एकोणिसाव्या शतकात अनेक समाजसुधारणेच्या चळवळी पुढे आल्या. ‘ब्राह्मो समाज’ (1828), ‘प्रार्थना समाज’ (1867), ‘आर्य समाज’ (1875) यांचे प्रयत्न अल्पस्वल्प सुधारणांच्या व अभिजनांच्या पलीकडे गेले नाहीत. त्याचे एक कारण वेदप्रामाण्य मान्य असणारे हे समाज होते.

     म. फुल्यांचा वैचारिक पिंड हा धर्मचिकित्सेवर पोसला होता. थॉमस पेनच्या ‘राईट्स ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. फुल्यांनी जगाचा निर्माणकर्ता ‘निर्मिक’ मानला, परंतु मूर्तिपूजा व मध्यस्थ नाकारला. त्यामुळे त्यांचा थेट संघर्ष भटजी व शेटजींशी झाला. शेतकरी, कष्टकरी, शूद्र, अस्पृश्य व स्त्रिया यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न चळवळीत रूपांतरित झाला. स्त्रीशिक्षण, लेखन व प्रत्यक्ष चळवळ या सगळ्या कार्याचा सप्रमाण आढावा डॉ. अरुण शिंदे यांनी पहिल्या भागात घेतला आहे. ‘एकतर्फी ग्रंथातील मताभिमानाचा दांडगावा’ नाकारणे हे फुल्यांचे, पर्यायाने सत्यशोधक समाजाचे ब्रीद होते. तर ‘एकंदर सर्व मुलीमुलांस त्यांचे अधिकार समजण्यापुरती विद्या देण्यास... माझ्याने होईल तितकी मदत करणे’, हा सत्यशोधक समाजाचा नियम होता. त्यामुळेच ग्रंथलेखन, नियतकालिकांच्या माध्यमातून प्रबोधन व सभा-संमेलनांतून बहुजन समाजाचे बौद्धिक भरणपोषण असा तीन कलमी कार्यक्रम राबविला गेला.

       म. फुल्यांनंतर ही चळवळ संपली, असे काही अभ्यासकांनी नमूद केले होते. डॉ. अरुण शिंदे यांनी हे मत साधार खोडले आहे. भास्करराव जाधव, शास्त्री बाबाजी महाधट, शास्त्री धर्माजी रामजी डुंबरे, कृष्णराव भालेकर, भीमराव महामुनी, कृ. क. चौधरी, वि. रा. शिंदे, शाहू महाराज यांचे कार्य सत्यशोधक समाजाला ऊर्जितावस्था देणारे होते. याच दरम्यान ‘दीनबंधु’, ‘सत्सार’, ‘विश्वबंधु’, ‘जागृति’, ‘जागरूक’, ‘डेक्कन रयत’, ‘विजयी मराठा’, ‘गरिबांचा कैवारी’, ‘सत्यप्रकाश’, ‘राष्ट्रवीर’, ‘तरुण मराठा’, ‘श्री शिवस्मारक’, ‘मजूर’, ‘हंटर’, ‘ब्राह्मणेतर’, ‘नवयुग’, ‘सत्यवादी’, ‘कैवारी’ अशी अनेक नियतकालिके प्रकाशित झाली. त्याचा धांडोळा डॉ. अरुण शिंदे यांनी घेतला आहे. सत्यशोधकांचे कार्य शेतकरी, कामगार, अस्पृश्योद्धार व स्त्रीमुक्तीविषयक पातळीवर कसे कसे विस्तारले आणि शेवटी त्याला राजकीय चळवळीचे स्वरूप कसे प्राप्त झाले, याचा आढावा येथे आहे.
सत्यशोधकीय नियतकालिके म्हणजेच बहुजन संपादक-लेखकांनी चालवलेली नियतकालिके होय. रूढी-परंपरेच्या जोखडातून समाजाला मुक्त करणे आणि समता व सामाजिक न्यायाचे मूल्य प्रस्थापित करणे या हेतूने ही नियतकालिके चालविली गेली. आर्थिक विवंचना, वर्गणीदार वाढविण्यात येणार्‍या अडचणी, क्वचित प्रसंगी उमटलेले वादविवाद व खटले यांमुळे सत्यशोधकीय नियतकालिके सलग दीर्घकाळ चालू शकली नाहीत. परंतु त्यांमधून येणारे लेखन समाजाला नवी दिशा देणारे ठरत होते यामध्ये शंका नाही. असे असले तरी, रा. के. लेले यांच्या ‘मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या ग्रंथात सत्यशोधकीय नियतकालिकांचा फारसा उल्लेख नाही, हे आपण आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. डॉ. अरुण शिंदे यांनी ही उपेक्षा व उणीव दूर केली आहे. म. फुल्यांचे कार्य व विचार यांना समकालीन ब्राह्मणी वृत्तपत्रांत काहीच स्थान नव्हते. त्यामुळेच कृष्णराव भालेकर यांनी अत्यंत खटपट करून व पदरमोड करून ‘दीनबंधु’ हे पहिले सत्यशोधकीय नियतकालिक सुरू केले. पुढे जोतीराव फुल्यांचे ‘सत्सार’, गणपतराव पाटलांचे ‘दीनमित्र’, गुलाबसिंह कौशल्य यांचे ‘राघवभूषण’, नारायण नवलकरांचे ‘अंबालहरी’, दामोदर यंदे व रामजी आवटे यांचे ‘शेतकर्‍यांचा कैवारी’ यांशिवाय ‘मराठा दीनबंधु’, ‘विश्वबंधु’, ‘सत्योदय’, ‘जागरूक’, ‘जागृति’, ‘डेक्कन रयत’, ‘सत्यप्रकाश’, ‘विजयी मराठा’, ‘गरिबांचा कैवारी’, ‘भगवा झेंडा’, ‘तरुण मराठा’, ‘राष्ट्रवीर’, ‘प्रबोधन’, ‘संजीवन’, ‘नवयुग’, ‘हंटर’, ‘मजूर’, ‘कर्मवीर’, ‘सत्यवादी’ अशी अनेक पत्रे सुरू झाली. या सर्व नियतकालिकांच्या वैचारिक, वाङ्मयीन आर्थिक व संपादकीय स्वरूपाचा आढावा डॉ. शिंदे यांनी घेतला आहे. त्याचे सामाजिक जडणघडणीतील योगदानही अधोरेखित केले आहे.

      Ideas moves the society & not the people असे म्हटले जाते. वर्तनबदलाची पूर्वअट ही विचार परिवर्तन असते. सत्यशोधक चळवळ ही समाजव्यवस्था बदलाच्या हेतूने गतिमान झालेली असल्याने वैचारिक साहित्याची निर्मिती सत्यशोधकांनी प्राधान्याने केली. स्वतः म. फुल्यांनी ‘गुलामगिरी’, ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘शेतकर्‍याचा असूड’ आदी पुस्तिका लिहून ही नवी दिशा स्पष्ट केली होती. याच मार्गावर अनेक सत्यशोधक लेखक लिहिते झाले.

      डॉ. अरुण शिंदे यांनी ‘सत्यशोधकीय नियतकालिकांतील वैचारिक साहित्य’ या प्रकरणात त्याचा विस्तृत परामर्श घेतलाआहे. अर्थातच हे लेखन खंडनमंडन व तर्कशुद्ध मांडणी यांचा आधार घेणारे होते. या वैचारिक चर्चेत ग्रामव्यवस्था, रूढिपरंपरा, जत्रा-यात्रा, मूर्तिपूजा, नवस, सोवळे, दान, मंत्रतंत्र, अंगात येणे, विधी, तीर्थयात्रा व तीर्थक्षेत्रे, सत्यनारायण, सण, गणेशोत्सव, धर्म, धर्मग्रंथ, पुरोहित, भागवत धर्म, शेती, शेतकरी, शोषण, सावकारी, अज्ञान, स्त्रीयांचे प्रश्न यांवर विस्ताराने चर्चा झाली आहे. प्रारंभी स्फूट लेखन करणारे लेखक/लेखिका या नियतकालिकांमधून आढळतात. यांमधूनच मुकुंदराव पाटील, दिनकरराव जवळकर, रा. ना. चव्हाण, मुक्ता साळवे, तानुबाई बिर्जे, भाई माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे अशा अनेक लेखकांचा विकास झालेला आढळतो. अरुण शिंद्यांनी विविध सामाजिक प्रश्नांना वेगवेगळ्या नियतकालिकांत कसे स्थान मिळाले व त्या प्रश्नांवरील चर्चा कशी विस्तारत गेली याची मांडणी केली आहे. त्यामुळे खरे तर वेगवेगळ्या विषयांवर सत्यशोधकीय नियतकालिकांमध्ये त्या काळात कोणकोणतया विषयांवर चर्चा झाली होती, ते शोधण्याचा आधारग्रंथ म्हणून डॉ. शिंदे यांचा प्रस्तुत ग्रंथ मार्गदर्शक ठरणारा आहे.शिक्षणाचे महत्त्व, इतिहासाची नवी मांडणी, व्यक्तिवेध, अस्पृश्यता निवारण या महत्त्वाच्या विषयांवरही या नियतकालिकांमधून चर्चा झाली आहे. उदा. वारकरी संप्रदायावरील आक्षेपाचे खंडन, रामदासी विचारांतील न्युनत्व, पेशवाईचे गुण-दोष यांचा समाचार घेण्यात आला आहे.
सत्यशोधकीय कवितांचा स्वतंत्र उहापोह डॉ. अरुण शिंदे यांनी केला आहे.

      मराठी वाङ्मयाच्या इतिहासात अर्वाचीन मराठी कवितेचे जनक म्हणून कवी केशवसुतांचा गौरव केला जातो. केशवसुतांचे लेखन 1885 ते 1907 या काळातले. त्यांच्या पूर्वीच म. फुल्यांनी ‘अखंड’ लिहिले. अनेक सामाजिक विषय कवितेतून हाताळले. सावित्रीबाई फुल्यांचे काव्यही असेच प्रागतिक व भावमधुर आहे, कृष्णराव भालेकरांनी वास्तववादी काव्यलेखन केले. त्या लेखनाकडे वाङ्मयेतिहासकारांनी डोळेझाक केली आहे.

      सत्यशोधक कवींचे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी, शाहीर व लोकपरंपरेतील छंद स्वीकारून त्यांनी लेखन केले. अभंगाच्या रचना प्रकारातून व्यक्त होणारा सामाजिक आशय फुल्यांनी ‘अखंड’मधून, तर कृष्णराव भालेकरांनी ‘श्रीखंड’ म्हणून मांडला. त्या शिवाय पोवाडे, लावण्या, उपदेशपर कवन, कटाव यांचाही वापर केला. फुल्यांचा ‘शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा’, भालेकरांचा लोकल फंडाचा पवाडा’ यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. मुकुंदराव पाटलांनी लिहिलेल्या ‘कुलकर्णीलीलामृत’ व ‘शेटजीप्रताप’ या दोन खंडकाव्यांचा विस्तृत परामर्श डॉ. शिंद्यांनी घेतला आहे.

      मराठीतील ग्रामीण कादंबरी लेखनाचा कृष्णराव भालेकर यांच्या ‘बळीबा पाटील’ या लेखनास जातो. ही कादंबरी ही ‘दीनमित्र’मधून 1888 साली प्रकाशित झाली होती. मुकुंदराव पाटील यांच्या ‘ढढ्ढाशास्त्री परान्ने’, ‘होळीची पोळी’ या गाजलेल्या कादंबर्‍या ‘दीनमित्र’मधून प्रसिद्ध झाल्या. दत्तात्रय रणदिवे यांची ‘सत्यवादी’मधून क्रमशः प्रकाशित झालेली ‘तेजस्वी तारका’ हीदेखील महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. यांचा आढावा डॉ. शिंद्यांच्या लेखनात आला आहे.

      सत्यशोधकीय नियतकालिकांतून प्रकाशित कथा वेगळाच विषय मांडणार्‍या होत्या. ‘भटजीचे कारस्थान’, ‘ब्राह्मण आणि त्यातून सावकार’, ‘लगीन की धुळवड’, ‘आश्रिताचे फळ’ अशा कथांच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन झाले. ‘विसुभाऊंची कारवाई’, ‘संपाच्या वावटळीत’, ‘रूढीच्या वणव्यातून’ या कथाही लक्षणीय आहेत. अरुण शिंदे यांनी त्या सार्‍या लेखनाचा परिचय करून दिला आहे.

      याशिवाय एका स्वतंत्र प्रकरणात सत्यशोधकीय नाट्यरूप वाङ्मयाचे विवेचन आले आहे. मुकुंदराव पाटलांचे ‘राक्षसगण’ हे अपूर्ण नाटक आणि शेतकरी प्रश्न, स्त्रीप्रश्न आणि धार्मिक दंगली यांबाबतचे संवाद शिंदे यांनी चर्चेस घेतले आहेत. ‘बोका आणि सत्यनारायण’, ‘शिष्य आणि गुरू’, ‘चांदोबा आणि यात्रेकरू’, ‘महार व सोवळा’ अशा अनेक संवादांतून तत्कालीन सामाजिक प्रश्नांना हात घातला आहे. आजच्या श्रुतिकांशी नाते सांगू शकतील असे हे संवाद आहेत.

     एकंदर, डॉ. अरुण शिंदे यांनी एका दुर्लक्षित विषयावर संशोधन करून अत्यंत मौलिक माहिती आणि पुरोगामी दृष्टी ‘सत्यशोधक नियतकालिके या ग्रंथातून मांडली आहे. ग्रंथाच्या शेवटी असणारी संदर्भ ग्रंथसूची, व्यक्तिनाम सूची व विषयसूची पाहताच आपणांस सखोल संशोधन वृत्तीचा परिचय होतो. डॉ. अरुण शिंदे यांचे हे लेखन संशोधनाचे नवे विषय खुले करणारे व वाचकांच्या बौद्धिक जाणिवा विस्तारणारे आहे.


सत्यशोधकीय नियतकालिके

कृष्णा संशोधन व विकास अकादमी, मंगळवेढा, जि. सोलापूर 

प्रथमावृत्ती - 3 जानेवारी, 2019

पृष्ठे - 540, किंमत 500 रु./-
ग्रंथासाठी संपर्क : 9881035803

( प्रसिद्धी - दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जुलै ते सप्टेंबर २०१९ )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)