दिल ढूंढ़ता है

दिल ढूंढ़ता है


       प्रेम ही एक उत्कट सदाबहार अनुभूती आहे. प्रेम व्यक्त करायला आणि अनुभवायलाही वेळ द्यावा लागतो. एकमेकांसोबत तासन् तास, दिवसच्या दिवस फुरसतीत घालवावे लागतात. थोडे रुजू द्यावे लागते, थोडे मुरू द्यावे लागते. मग प्रेमानुभूतीत अंत:करणातली गोडी उतरत राहते. परस्परांच्या प्रेमात घालविलेले मधुर दिवस आणि जागवलेल्या रात्री यांची गोडी अवीट असते. माणसाच्या जीवनातील अनमोल ठेवा असतात या आठवणी! नंतर पुन्हा पुन्हा त्या जुन्या उत्कट आठवणीत मन रमून जाते. त्या आठवणींचे मोल, त्याची गोडी, त्याचे सौंदर्य फक्त ते अनुभवणाऱ्यालाच अधिक सखोलतेने जाणवत राहते. कधीच संपू नयेत असे हे अनमोल क्षण असतात. परंतु जीवनव्यवहारात इतरही जबाबदाऱ्या असतात. त्यामध्ये हे सोनेरी क्षण हरवून जातात. काळ भरभर पुढे सरकतो. मग  उरतात त्या फक्त आठवणी! भाव मधुर क्षणांच्या! जिवलग सहचरांच्या!
        कवी गुलजार यांनी एका सदाबहार गीतातून ही अनमोल अनुभूती पकडली आहे. उर्दूचे महाकवी मिर्झा गालिब हे गुलजारजींचे आवडते शायर आहेत. त्यांच्या एका शेरने प्रभावित होऊन त्यांनी 'मौसम'(१९७५) या चित्रपटासाठी एक गाणे लिहिले आहे. ते म्हणजे 'दिल धुंडता है...' कवी मिर्झा गालिब यांचा मूळ शेर असा होता,

जी ढूँढता है फिर वही फ़ुर्सत के रात दिन
बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए

      गुलजारजींनी किंचित बदल करून त्याचा मुखडा केला आणि पुढचे अंतरे अत्यंत सहज स्वाभाविकपणे रचले. विशेष म्हणजे चित्रपटात हे गाणे आनंदी व दुःखी अशा दोन्ही मूडमध्ये ऐकता येते. दोन्ही चाली तितक्याच सुंदर आहेत हे मदन मोहन यांचे कौशल्य आहे. 

दिल ढूंढ़ता है फिर वही फुर्सत के रात-दिन
बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किए हुए

         मन पुन्हा पुन्हा शोधतंय त्या निवांतपणे घालविलेल्या दिवस-रात्री. (त्या तर पुन्हा मिळत नाहीत.) मग प्रियवराच्या आठवणी मनात घोळत बसून रहावेसे वाटते. कारण ते जीवनातील सर्वात सुखद क्षण होते.

जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर
आँखों पे खींचकर तेरे आँचल के साये को
औंधे पड़े रहें, कभी करवट लिये हुए

   गुलाबी थंडीतलं कोवळ उबदार उन्ह आणि आपण अंगणात पडून होतो. तुझ्या पदराची सावली डोळ्यांवर ओढून घेतलेली. आणि कधी मी अधोमुख, कधी कुस बदलून तू! असे ते अविस्मरणीय क्षण!

या गर्मियों की रात जो पुरवाइयाँ चलें
ठंडे सफ़ेद बिस्तर पर जागें देर तक
तारों को देखते रहें छत पर पड़े हुए

किंवा उन्हाळ्यातील त्या रात्री जेव्हा पूर्वेकडून येणारा मंद वारा वाहायचा. थंड शुभ अंथरुणात आपण उशिरापर्यंत जागेच असायचो. कधी गच्चीवर आकाशातील तारे पहात पडून राहायचो.

बर्फ़ीली सर्दियों में किसी रात में कभी
वादी में गूँजती हुई ख़ामोशियाँ सुनें
आँखों में भीगे भीगे से लम्हे लिये हुए

बर्फाळ प्रदेशातील अत्यंत थंडीच्या त्या रात्री! खरे तर त्या निरव रात्री कोणताच आवाज नव्हता. नसतोच तो. परंतु असे वाटत होती की दरी मधून शांततेचाही प्रतिध्वनी निनादत आहे. ते प्रेमात भिजलेले क्षण डोळ्यात घेऊन आपण वावरलो होतो.
   अशा असंख्य अविस्मरणीय क्षणांची मालिका नजरेसमोर सुरू होते. ती थांबता थांबत नाही .आपण त्यात हरवून जातो. स्थळ काळाचे भान राहत नाही. नंतरच्या धावपळीच्या दिवसात तो निवांतपणा, ती मोकळीक आणि ती जवळीक सगळेच कुठेतरी हरवलेले असते. हृदयात मात्र आठवणींचा स्नेहस्निग्ध दीप अखंड जळत असतो.


तसव्वुर-ए-जानाँ = प्रिय व्यक्तीच्या आठवणींचे स्मरणरंजन
जाड़े = सुरुवातीची गुलाबी थंडी
सर्दी = कडाक्याची थंडी
औंधे पड़े = पालथे पडणे, अधोमुख
पुरवाइयाँ = पूर्वेकडील वारे


गाणे पाहण्यासाठी खालील लिंक कॉपी करा
https://youtu.be/fwqRf66ujAc?si=BXIjfsAdTQ5sXTc6

टिप्पण्या

  1. मौसम(१९७५)
    गीतकार व दिग्दर्शक - गुलजार
    प्रमुख भूमिका - संजीव कुमार शर्मिला टागोर
    संगीत - मदन मोहन
    गायक - भूपिंदर सिंग, लता मंगेशकर
    (A. J. Cronin यांच्या The Judas Tree कादंबरीवर आधारित)

    पुरस्कार
    २३वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
    १. सर्वश्रेष्ठ चित्रपट (द्वितीय) - मौसम
    २. सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - शर्मिला टागोर
    २४वा फिल्मफेअर पुरस्कार
    १. सर्वश्रेष्ठ चित्रपट - मौसम
    २. सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक - गुलजार

    उत्तर द्याहटवा
  2. डॉ विनोद गायकवाड बेळगाव२१ नोव्हेंबर, २०२३ रोजी ७:३४ AM

    अजरामर गाणे 👏

    उत्तर द्याहटवा
  3. डॉ रवींद्र श्रावस्ती२१ नोव्हेंबर, २०२३ रोजी ७:५२ AM

    मला गीत अतिशय आवडते. पण त्या गाण्याच्या अंतरंगात मी एवढा घुसलो नव्हतो. धन्यवाद 🌹

    उत्तर द्याहटवा
  4. सुरेख...
    सिनेमा पाहिलेला आहे, गाणं ओळखीचं आहे. त्यामुळे आणखी छान वाटलं..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. होय...
      कोणतंही गाणं घ्या... उत्कट भाव आणि वेगळा विचार यांची सुंदर सांगड जाणवते

      हटवा
  5. अरे व्वा...
    ग्रेट

    उत्तर द्याहटवा
  6. अतिशय सुंदर लेख...

    गुलजार+लता+भूपेंद्र+मदन मोहन
    जबरदस्त कॉम्बिनेशन

    उत्तर द्याहटवा
  7. छान🌷
    आवडतं गाणं..
    मदन मोहननी या गाण्यासाठी 4-5 चाली तयार केल्या होत्या .. सगळ्याच अप्रतिम.
    त्यातल्या न वापरलेल्या चाली पैकी एक चाल वीर जारा सिनेमातल्या एका गाण्यासाठी वापरली नंतर.

    उत्तर द्याहटवा
  8. गेल्या वर्षभरात खरे तर मन कोरडं होत होत, तुमच्यामुळे ते पुन्हा कुठेतरी आयुष्याला सकारात्मक बनवित आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. प्रदीप
      निराशेचे ढग हटतातच. थोडा धीर धरावा लागतो.

      हटवा
  9. गाणं खूपच सुंदर आहे आणि आपण त्याच्यावर लिहिलंयही छान.

    उत्तर द्याहटवा
  10. त्र्यंबकेश्वर मिरजकर२२ नोव्हेंबर, २०२३ रोजी ६:४९ PM

    हे आवडीचं गाणं. आपलं लेखन गाण्याकडे पाहण्याचं छानशी दृष्टी देतं.

    उत्तर द्याहटवा
  11. कविवर्य गुलजार यांची शब्दरचना, गीत
    त्यातील भावभावना
    गीत गुंजन सदर.
    गीताचे बोल आणि आपले रसग्रहण.
    शब्दांतील हळुवारपणा, नेमका आशय व्यक्त करणारा. सर्वांचा एकत्रित प्रभाव मनाला भावणारा. अचंबित करणारा. सदैव स्मरणात राहील असा एक अविस्मरणीय योग आपण जुळवून आणला आहे.
    धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)