दो नैना, एक कहानी...

दो नैना, एक कहानी...

     

     दुःखाचा स्वतःचा एक स्वर असतो. तो बोलला जात नाही, तरीही ऐकता जातो. वेदना लिहिली जात नाही, तरीही वाचली जाते. बहुसंख्य वेळेला ओठ काही बोलत नाहीत. पण डोळे? ते तर सगळंच सांगतात. आनंदही... दुःखही... ! खंतही... वेदनाही...! न बोलताही व्यक्त झालेली दुःखाची ही परिभाषा फक्त संवेदनशील जिवलग वाचू शकतो. समजू शकतो. आणि योग्य तो प्रतिसाद देऊ शकतो. स्त्रियांच्या वाट्याला अकल्पितपणे विविध स्वरूपात येणारे दुःख फार तीव्र स्वरूपाचे असते. परंतु बऱ्याच वेळेला ते नेमकेपणाने व्यक्त होत नाही, व्यक्त केले जाऊ शकत नाही. त्यांच्या दुःखाची कहाणी फक्त त्यांच्या डोळ्यातच वाचता येते. 
      कवी गुलजारजींनी 'मासूम' (१९८३) चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गीतात हाच स्त्रीदुःखाचा भाव नेमकेपणाने व्यक्त केला आहे. 

दो नैना, एक कहानी 
थोड़ा सा बादल, थोड़ा सा पानी
और एक कहानी

दोन डोळ्यांमधून एक दुःखाची कहाणी व्यक्त होतेय. कोठेतरी वेदनेचा एक ढग दाटून आलाय. पापण्यांच्या कडांवर अश्रू ओथंबलेत. त्यामागे एक दुःखभरी दास्तां दडली आहे. (इतके कसले दुःख तिच्या वाट्याला आले आहे? कारण तरी काय? कारणं अनेक असतात. अविश्वास, अप्रतिष्ठा, आत्मसन्मानास पोहोचवलेला धक्का, भेदभाव, फसवणूक, वंचना, अप्रामाणिकपणा यांपैकी कोणत्याही कारणाने हे दुःख वाट्याला येऊ शकते. प्रत्येकाने आठवून पहावे, आपल्याला कोणत्या गोष्टीचे तीव्र दुःख होते.)

छोटी सी दो झीलों में वो बहती रहती है
कोई सुने या ना सुने कहती रहती है
कुछ लिख के और कुछ ज़ुबानी

डोळे म्हणजे अंतरंगात पाणी साठवलेले दोन छोटे तलाव! त्यामधून ओघळणाऱ्या आसवांमधून ही दुःखाची कहाणी वाहते आहे. ती कहाणी कदाचित कोणी समजून घेईल, कोणी समजून घेणार नाही. तरीही व्यक्त होत आहे. इथे अश्रूच लिहिलेले किंवा बोललेले शब्द झाले आहेत. ज्यामध्ये खूप खोलवर असणारी व्यथा वेदना दडलेली आहे. 

ओ थोड़ी सी है जानी हुई थोड़ी सी नई
जहां रुके आंसू वहीं पुरी हो गई
है तो नई फिर भी है पुरानी

ही वेदनेची कहाणी थोडीशी चिरपरिचित, तर थोडीशी नवीन आहे. ती व्यक्त करता करता ज्या ठिकाणी सांगणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू थांबतात, तिथे ती पूर्ण होते. एका अर्थाने ही कहाणी नवीन आहे आणि त्याचवेळी जुनी देखील आहे. कारण पिढ्यान् पिढ्या हेच घडत आले आहे. 

एक ख़त्म हो तो दूसरी रात आ जाती है
होंठों पे फिर भूली हुई बात आ जाती है
दो नैनों की है ये कहानी

दुःखाची एक रात्र संपते न संपते, तोपर्यंत दुसरी रात्र सुरू होते. घटना बदलतात. प्रसंग बदलतात. पण दुःख बदलत नाही. त्यामुळे ओठ मिटून गिळून टाकलेले दुःखाचे सगळे संदर्भ पुन्हा जागे होतात. काही विसरून गेलेल्या गोष्टी पुन्हा आठवतात. ओठावर येतात. दुःखाची कडवट चव शब्दांत, मनात रेंगाळत राहते. अशी ही स्त्रीच्या दुःखाची नि:शब्द परंतु जीवाची घालमेल करणारी कहाणी आहे. 
       प्रत्यक्ष चित्रपटात ही इंदु मल्होत्रा(शबाना आझमी)ची कहाणी आहे. ती आपल्या दोन मुलींना - पिंकी (उर्मिला मातोंडकर), मिन्नी
(अाराधना श्रीवास्तव) - झोपवत असताना हे गाणे गाते. खरे तर हे अंगाई गीत नाही. स्वतःच्या मनातील खोल वेदनेला करून दिलेली वाट आहे. म्हटले तर ती तिची स्वतःची दुःखद वेदना आहे; म्हटले तर ती समस्त स्त्री वर्गाची व्यथा आहे. 
      पती देवेन्द्र कुमार उर्फ डी. के. (नसिरुद्दीन शाह) याच्या अप्रामाणिकपणामुळे ती दुःखावली गेली आहे. दहा वर्षांचा सुखाचा संसार झालाय. ७-९ वर्षांच्या दोन गोड मुली आहेत. पण अचानक एक धक्कादायक वास्तव पुढे येते. एका भावनिक क्षणी शालेय जीवनातील मैत्रीण भावनाशी डीकेचा एकदा शरीरसंबंध आलेला असतो. एकदाच. परंतु त्याची परिणती एका गोंडस मुलाच्या जन्मात झालेली असते. ते डीकेला माहीतही नसते. पुढे भावनाचा आकस्मित मृत्यू होतो. त्यामुळे डीकेला आपला मुलगा राहुलला (जुगल हंसराज) घरी घेऊन यावे लागते. अर्थात काय घडले होते ते इंदूला सांगावे लागते. हे तिच्यासाठी धक्कादायक असते. 
      अनेक विवाहित पुरुष परस्त्रीमध्ये गुंततात हे इंदूला माहीत असते. परंतु तेच आपल्याही वाट्याला येईल, असे तिला अजिबात वाटत नसते. ही प्रतारणा तिला सहन होत नाही. नऊ वर्षे ही गोष्ट आपल्यापासून लपविली गेली आहे, याचेही दुःख होते. विश्वासाला तडा जातो. एकनिष्ठेला, प्रामाणिकपणाला आणि जीव ओतून केलेल्या प्रेमाला अर्थ राहत नाही. ती आतून मोडून जाते. असुरक्षितता आणि शून्यता या भावनेने अस्वस्थ होते. एका अर्थाने तो तिला आपल्या स्त्रीत्वाचा अपमान आणि पराभवही वाटू लागतो. हे दुःख सांगायचे तरी कोणाला? त्यामुळेच तिची घुसमट होते. तिच्या या दुःखाला, वेदनेला गुलजारजी वरील प्रमाणे शब्दबद्ध करतात. 
       समग्र स्त्री जातीला वेढून राहिलेल्या दुःखाची कहाणी या गाण्यातून व्यक्त होते. ही कहाणी आजची आहे, तशीच कालचीही आहे. नवी आहे, तशीच जुनीही आहे. तिने ती हृदयात दडविली आहे. कारण तिच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचला आहे. कुणी संवेदनशीलतेने ही दुःखाची कहाणी समजून घेतली थोडे लढण्याला, थोडे जगण्याला बळ दिले, तरच हे डोळ्यातून वाहणारे पाणी थांबणार आहे. 
        आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले हे अर्थवाही गीत आरती मुखर्जी यांनी गायले आहे. त्यासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिकेचे फिल्मफेअर अवार्ड (१९८४) मिळाले आहे, हे विशेष!

गाणे पाहण्यासाठी लिंक 

https://youtu.be/ft_Bb9t3OfA?si=q2mjrRmY6_iZirbz

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रवण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास (लेख)

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

कथाकथी (Story Telling)